सुश्री शीला पतकी
परिचय
शिक्षण : बीएससी बीएड.
वडील नकलाकार पत्की म्हणून सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध त्यांच्याबरोबर वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत नकलांचे कार्यक्रम सादर केले जे लोकरंजनातून लोकशिक्षण देणारे होते अनेक नाटकात काम.. नाट्यछटा लिखाण एकांकिका आणि पथनाट्याचे लेखन कविता आणि नृत्य गीतांचे लेखन.. कवितांना पारितोषिके आणि नृत्य गीताना हमखास पहिला नंबर.
शास्त्र उपकरणे तयार करण्याची आवड– जवळपास दीडशे उपकरणे मी तयार केली असून दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला एकदा लखनऊ येथे माननीय राष्ट्रपती झैलसिंग यांच्या हस्ते व दुसऱ्यांदा जम्मू कश्मीर येथे माननीय राष्ट्रपती श्री व्यंकट रमण यांच्या हस्ते. नापास यांची शाळा हा माझा विशेष प्रकल्प मी गेले 32 वर्षे चालवत असून सुमारे 2000 विद्यार्थी दहावीपासून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले आहे स्त्रीमुक्तीचे कार्य केले आहे. महिलांसाठी अनेक उद्योगांची उभारणी. 38 वर्ष छंद वर्गाचे नियोजन सातत्याने केले आहे सुमारे 3000 विद्यार्थी याचा लाभ घेत असत.
साक्षरता अभियान यासाठी मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीने एक वर्ष डेप्युटेशनवर या प्रकल्पांतर्गत कार्यरत होते व त्यातून तीस हजार महिला आणि दहा हजार पुरुषांना साक्षर केले आहे. शैक्षणिक कार्य व महिलांची उन्नती यासाठी मी सतत कार्यरत राहिले आहे आजही वयाच्या 75 व्या वर्षी मी झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना लिहायला वाचायला शिकवण्यापासून त्यांची उत्तम तयारी करून घेते आणि नवोपक्रम या सर फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत मी केलेल्या तीन वर्षाच्या कामावर प्रोजेक्ट सबमिट केला आणि त्यासाठी मला राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला त्याचे वितरण जून मध्ये आहे आता अनेक विद्यार्थी शाळा संस्था यांना मदत मिळवून देण्याचे कार्य मी करीत आहे..
मनमंजुषेतून
☆ “गोष्ट एका आईची…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
साधारणपणे 2005 सालची गोष्ट होती. चौथीचे निकाल लागल्यावर आमच्याच प्राथमिक विभागाकडून ऍडमिशनसाठी पाचवीकडे दाखले पाठवले जातात.. हायस्कूल विभागाकडे. ते काम क्लार्कच्या मार्फत होत असतं. पण एका ऍडमिशनसाठी मात्र माझ्याकडे एक बाई आल्या आणि म्हणाल्या “ माझ्या मुलीचा प्रॉब्लेम आहे. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिला घरीच ठेवा असे सांगितले आहे किंवा बाईंचा सल्ला घ्या म्हणून मी तुमच्याकडे आले. ” मी म्हणाले “ का बरं पाचवीत तिला घरी का बसवून ठेवायचं तिचे शिक्षण बंद करण्याचा आपल्याला काय अधिकार?” त्यावर त्या म्हणाल्या, “ तिचे मेंदूच एक ऑपरेशन झाले आहे आणि त्यामध्ये एक छोटी ट्यूब आहे. तिला ट्यूमर झाला होता. तिला फारशी दगदग करायची नाही, खेळायचे नाही. तेव्हा मी आपल्याला विनंती करायला आलेय की तिच्याबरोबर मी शाळेत दिवसभर बसले तर चालेल का?” आता पाचवीतल्या मुलीसाठी आईने दिवसभर शाळेत बसून राहायचं मला जरा गमतीदार वाटत होतं. मी म्हणाले, “ पण काय गरज काय त्याची…” … “ नाही हो तिला इतर मुली खेळायला लागल्या की खेळावे उड्या माराव्या वाटतात पळाव वाटतं… पण या सगळ्याला तिला बंदी
आहे “ मी थोडी गप्पच झाले. “ दहा वर्षाच हसत खेळत उड्या मारणारे लेकरू त्यांनी गप्प बसून राहायचं.. खरंच अवघड होतं ते. ते तिने करता कामा नये म्हणून मला इथे थांबणे भाग आहे त्याशिवाय तिला अचानक काही त्रास झाला तर तुम्ही कुठे धावपळ करणार माझ्याकडे तिची औषधे असतात…!”
मी विचार केला आणि म्हणाले “ ठीक आहे तुम्ही वर्गाच्या बाहेर असलेल्या मैदानाच्या बाजूला बसू शकता…” जून महिन्यात शाळा सुरू झाली त्यानंतर त्या बाई येऊन वर्गाच्या बाहेर बसायला लागल्या आठ दहा दिवसांनी एक दोन शिक्षक आले आणि म्हणाले “ बाई त्या मुलीची आई त्या बाहेर बसतात आणि आम्हाला उगाचच डिस्टर्ब झाल्यासारखं होतं तिचा प्रॉब्लेम मोठा आहे उगाचच त्या मुलीची काळजी वाटते तिला काही झालं तर काय करायच…” मी त्यांना म्हणाले, “ काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं जमतं का बघा.. ” त्यांचं म्हणणं होतं की जोखीम आपण कशाला घ्यायची? मी म्हणलं “आपली मुलींची शाळा आहे मुलींच्या शिक्षणासाठी आपण प्रयत्न करतो आणि या मुलीला का आपण वंचित ठेवायचं आणि मला असं वाटतं की आपल्यापेक्षा जास्त काळजी इतर शाळेत कोणी घेणार नाही कारण आपण सगळ्या महिला आहोत मला एक मुलंबाळं नाहीत, पण तुम्ही तर आई आहात. तुम्ही त्याना खूप छान पद्धतीने समजून घेऊ शकाल.. विचार करा आपल्या पोटी असं पोर असतं तर आपण काय केलं असतं म्हणजे आपण आपल्या मुलाच्या बाबतीत जे केलं असतं तेच आपण त्यांच्यासाठी करू.. शाळेतनं कोणालाही काढणे शक्य नाही मला आपण त्या माऊलीला थोडी मदत करू!”
या पद्धतीने शिक्षण सुरू झालं. मधे मधे त्या मुलीला त्रास व्हायचा तिची एक दोन ऑपरेशनस झाली मुलगी खूप गोड होती. आनंदी होती तिला आपल्या गंभीर दुखण्याची जाणीव नव्हती त्यामुळे आईला अधिक काळजी घ्यावी लागत होती साधारण सात साली मी रिटायर झाले आणि मग मी माझ्या कामाला लागले मुलगी तो पावतो सातवीत गेलेली होती पुढे मी काही फारशी चौकशी केली नव्हती पण आमचे सगळे शिक्षक खूप छान होते मदत करणारे मायाळू त्यामुळे पुन्हा काही त्यांना सांगावं असं मला मुळीच वाटलं मुख्याध्यापिका ही चांगल्या होत्या बरेच वर्षानंतर म्हणजे साधारणपणे दहावीचा निकाल लागल्यावर.. मी आमच्या नापास शाळेच्या संस्थेमार्फत नापास झालेल्या नववी आणि दहावीच्या मुलांना आणि पालकांना समुपदेशन करीत असे एक मीटिंग त्यासाठी फक्त लावलेली होती पालक आले प्रत्येकाचे प्रश्न जाणून घेतले त्याप्रमाणे त्यांना उपाय सांगितले आणि एका मुलीच्या आई नंतर थांबून राहिल्या त्या मला भेटल्या आणि त्या त्याच मुलीची आई होत्या त्या म्हणाल्या तुमच्यामुळे ती दहावीपर्यंत आली पण आता नापास झाली आहे आणि दोन विषय राहिले आहेत तुमच्याकडे काही सोय होईल का? मी म्हणलं माझ्याकडे ऑक्टोबरची व्यवस्था नाही पण माझ्या शिक्षकाकडे जर तुम्ही पाठवलं तर ते तिची तयारी करून घेतील त्या म्हणाला हरकत नाही मी पाठवते आता ती एकटी जाणे येणे करू शकते ठीक आहे त्यानंतर त्या म्हणाल्या बाई मला फार काळजी आहे या मुलीची आता सातत्याने मदत करणे तिला मला फार अवघड होत आहे या मुलीच्या दुखण्यामुळे पैसाही खूप खर्च करावा लागला त्यांनी दुसऱ्या अपत्याचा विचारही केला नाही असं बरच काही त्या मला सांगत होत्या त्या शेवटी म्हणाल्या खरं सांगू बाई मी जगातली एक वेगळी आई असेल किंवा एकमेवच अशी आई असेल की रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावल्यानंतर आपल्या मुलीच्या मरणाची कामना देवापुढे करते मी रोज देवाला सांगते माझ्यासमोर हिला ने कारण आमच्या नंतर हिला इतकं समजून कोण घेणार आहे आता ती तरुण झालीये त्यामुळे जागोजागी मला सजग राहून तिची काळजी घ्यावी लागते तिच्या ट्यूमर मुळे काही वेळा थोडसं विस्मरण होतं अजून ते शंभर टक्के बरं झालेलं नाही मी त्याना म्हणाले असं करू नका देवाने प्रत्येकाला त्याचं त्याचे भाग्य दिले आहे तिचं जे नशीब असेल तेच होईल तुम्ही का काळजी करता त्यापेक्षा जमेल तेवढी काळजी घ्या मग मी आमच्या नापास शाळेतील दोन शिक्षकांवर तिचे जबाबदारी सोपवली मी त्या बाईंना सल्ला दिला खरा पण मी दिवसभर अस्वस्थ होते….. की एखादी आई आपल्या मुलीला परमेश्वरांन घेऊन जावे.. तिचे आयुष्य आपल्यासमोर संपावे यासाठी प्रार्थना करते आणि त्या पाठीमागेही आईचे प्रेम असावे.. यासारखे काय होतं दुसरं.. प्रेमाचा हा कोणता प्रकार ?.. हे असं सगळं फक्त आईच करू शकते तिच्या हातातले सगळे उपाय संपतात आणि समाजातले वेगळेच प्रश्न तिला भेडसावायला लागतात तेंव्हा ती तरी यापेक्षा दुसरं काय करणार.. ? त्यानंतर ऑक्टोबर मध्ये ती पास झाली पुढे माझा संपर्क संपला नंतर 17 साली मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून एक पाककला स्पर्धा ठेवली होती त्यामध्ये जवळपास 40 एक महिलांनी भाग घेतला होता संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त स्पर्धा होती सर्व महिलांची नोंदणी क्लार्क करून घेत होती मी अन्य कामांमध्ये होते !सर्वांनी आपापली पाककृती सजवून मांडली.. शिक्षकांचे परीक्षण झालं.. सर्वांना दरम्यानच्या काळात अल्पोपहार आणि चहा देण्यात आला आणि हॉलमध्ये एकत्र करून मी आमच्या संस्थेबद्दल सर्वांना माहिती देत होते नापास शाळा.. महिलांसाठी करत असलेले कार्य इत्यादी माहिती मी देत होते हे सगळं चालू असताना एक बाई उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या मी बोलू का… ?. माझ्या एकदम लक्षात आलं की ह्या त्याच मुलीची आहेत.. त्यांनी माईक हातात घेतला आणि त्या बोलू लागल्या…. माझी मुलगी बाईंमुळे दहावी झाली आणि माझ्याकडे वळून पाहत म्हणाल्या तुम्ही कामात होता त्यामुळे तुम्ही मला पाहिले नाही आणि कदाचित ओळखले नसेल पण शीला पत्की मॅडमने माझ्या मुलीसाठी खूप केले आहे या संस्थेमार्फत दोन शिक्षकानी तिची तयारी करून घेतली आणि ती दहावी झाली आणि बाई मला हे सांगायला अतिशय आनंद होतो कि आज माझी मुलगी बीए झाली आहे आणि आज ती या तुमच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आहे मग तिने सर्वांना आपल्या मुलीची कथा सांगितली तिची मुलगी उभी राहिली आणि पुढे आली.. खूप सुंदर दिसत होती मी तिला पंधरा वर्षाची पाहिलेले आता ती छान वयात आलेली… गोरी पान देखणी युवती झालेली होती सर्वात पुढचं वाक्य त्यांचे खूप छान होतं त्या म्हणाल्या बाई माझी मुलगी पूर्णपणे बरी झाली असून डॉक्टरांनी तिचा विवाह करायलाही परवानगी दिलेली आहे आता मेंदूचा म्हणून तिला कोणताही त्रास नाही तिचा ट्यूमर पूर्ण बरा झाला संपूर्ण सभागृहा ने टाळ्या वाजवल्या टाळ्यांच्या कडकडाटा त्या बाईंचा जणू आम्ही सत्कारच केला मी तर अचानक घडलेल्या प्रसंगाने भांबावून गेले होते डोळ्यातून पाणी वाहत होते.. मी भाषणाला उभी राहिली आणि एवढेच म्हणाले हेच आमच्या संस्थेचे कार्य आहे की एखाद्याला हात देऊन उभे करणे आणि मी सर्वांना हेही सांगितले देव कनवाळू आहेच पण तो कधीकधी आईचही ऐकत नाही ते खूप छान आहे या बाई रोज आपल्या मुलीसाठी देवाला प्रार्थना करीत होत्या की देवा माझ्या मुलीला माझ्या आधी घेऊन जा पण देवाने त्या प्रार्थनेतला अर्थ जाणून त्या मुलीला सक्षम करून सोडले मी जे चित्र पाहत होते त्याच्यावर माझाच विश्वास नव्हता…. !
माझ्या संस्थेचा वर्धापन दिन इतका फलदायी सुंदर साजरा होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं आजचा वर्धापन दिन काही वेगळाच होता खूप बळ देणारा आणि खूप प्रेरणा देणारा आणि माझी खात्री झाली की आईच्या प्रार्थनेत बळ असतं पण त्याहून अधिक तिच्या प्रेमात बळ असते हेच खरं…. !!!
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈