कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 222 – विजय साहित्य
☆ विश्व सुमनांचे…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
पानगळ ओसरली
लागे वसंताची आस
बाळलेणी लेवुनीया
नटे पालवी झकास… ! १
*
नटे पालवी झकास
मोहरले आम्रतरू
ऋतू राज घाली साद
कसे मनाला सावरू.. ? २
*
कसे मनाला सावरू
वासंतिक फुल पान
मनांगणी चितारले
भाव भावनांचे गान… ! ३
*
भाव भावनांचे गान
चैत्र पाडवा दारात
वर्षारंभ जीवनाचा
सृष्टी चैतन्य श्वासात… ! ४
*
सृष्टी चैतन्य श्वासात
चैत्र गौर आली घरा
डाळ पन्हे खिरपुरी
प्रासादिक ओटी भरा… ! ५
*
प्रासादिक ओटी भरा
फळे मधुर रसाळ
राम जन्माचा सोहळा
जपे आठवांची नाळ… !६
*
जपे आठवांची नाळ
गंधपुष्पे बहरली
सृजनाच्या आरशात
वनराई मोहरली… !७
*
वनराई मोहरली
विश्व सुमनांचे खरे
जत्रा मेळा उरूसात
गावोगावी यात्रा भरे… ! ८
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈