सौ अंजली दिलीप गोखले
इंद्रधनुष्य
☆ इडलीकुमारीची कहाणी !! – लेखिका : सौ. माधवी जोशी माहुलकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
॥ अथश्री इडलीका कुमारी कथा आरंभस्य ॥
दक्षिण भारताचे मुख्य अन्न असलेली इडली ही आता संपूर्ण भारतातच नव्हे, तर पार सातासमुद्रापलीकडे आपल्या नावाचा डंका पिटते आहे. दक्षिण भारताची ही लाडकी इडली नावाची राजकुमारी भारतातील तमाम अन्नपदार्थांमध्ये आपल्या पौष्टिक घटकांमुळे मानाचे स्थान पटकावून बसली आहे. इडली हे नाव जितके नटखट आहे, तितकीच या इडलीकुमारीची कहाणी देखील मनोरंजक आहे बरं का! तुम्हाला जर सांगितले की इडली ही दक्षिण भारतीय पदार्थ नाही, तर तुमचा यावर विश्वास बसेल? नाही ना? माझा पण नव्हता बसला. परंतु मी जेव्हा इडलीच्या इतिहासाचा मागोवा घेतला, तेव्हा या इडलीकुमारीच्या ब-याच रंजक कथा समोर आल्या. तुम्हालाही ऐकायला आवडेल का या इडलीकुमारीची कथा? चला तर मग, सुरु करु या!
भारतीय खाद्य इतिहासकार के.टी.अचैय्या यांच्या अभ्यासानुसार कर्नाटकातील काही कवितांमधे इडलीचा उल्लेख आढळतो. ‘इडलीगा वा इडरीका’ असं संस्कृतमधे त्यांना म्हटलं गेलं आहे. इडली, दोसा, वडा सांबार, अप्पे, उतप्पम् अशा विविध पदार्थांची नावे ऐकली की, आपल्या डोळ्यासमोर लुंगीवाला साऊथ इंडीयन अण्णा उभा राहतो. भारताच्या कानाकोप-यात सकाळी सकाळी कपाळाला पांढरे गंध लावलेले हे लुंगीवाले अण्णा इडली, दोसा विकतांना दिसतात. कोणी सायकलवर, तर कोणी हातगाडीवर, आपापली दुकाने घेऊन फिरतांना दिसतात. किती तरी अण्णा लोक या पदार्थांचे हाॅटेल्स टाकून श्रीमंत झालेले दिसतात. कारण साऊथ इंडीयन पदार्थांनी समस्त भारतीयांना तशी भुरळच पाडलेली आहे. त्यातल्या त्यात पांढरी स्वच्छ, मऊ, लुसलुशीत इडली म्हणजे समस्त आबालवृद्ध लोकांच्या गळ्यातील ताईतच!
तर अशी ही सर्वांची लाडकी इडली मूळ रुपात आपल्या येथील नाहीच आहे. ही इडलीकुमारी आली आहे इंडोनेशियामधून. तुम्ही म्हणाल की, काहीही सांगते. वर्षानुवर्षं आपल्या आहारात असलेली इडली इंडोनेशियाची कशी बरं असेल? परंतु हे खरं आहे. कन्नड खाद्य इतिहासकार श्री. के.टी.अचैय्या यांनी त्यांच्या पुस्तकात इडलीबद्दल लिहीतांना हे सांगितले आहे की, इडली ही दक्षिण भारतीय पदार्थ नाही, तर ती इंडोनेशियामधून भारतात आली आहे. वडा सांबार, दोसा यांना दोन हजार वर्षांपूर्वीचा भारी भक्कम इतिहास आहे. परंतु इडलीला इतका प्राचीन इतिहास नाही. फार पूर्वीपासूनच इंडोनेशिया, चीनमधे वाफवलेले पदार्थ तयार करण्याची परंपरा आहे. आपल्या देशात इडलीसारखा पदार्थ, जो आंबवून व वाफवून तयार केला जातो, हे त्या वेळेस कोणालाच माहीत नसावं आणि त्याच कारणामुळे जेव्हा सातव्या शतकामधे ह्युआन त्सांग नावाचा चीनी बौद्ध भिक्कू प्रवासाकरता भारतामधे आला होता, तेव्हा त्याला पदार्थ वाफवण्याचे भांडे आपल्या देशात कुठेही आढळले नव्हते, हे त्याने आपल्या प्रवास-वर्णनामधे नमूद करुन ठेवले आहे. अचैय्या यांच्या मतानुसार इंडोनेशियातील बल्लवाचार्यांनी पदार्थ वाफवून तयार करण्याची प्रक्रिया भारतात आणली असावी. इडली ही तांदूळ + उडीद डाळ यांना सात आठ तास भिजवून, नंतर रवाळ वाटून व परत सात आठ तास फर्मेंट करुन ज्याला ‘किण्वन’ही म्हटले जाते, अशा पद्धतीने तयार केली जाते.
इ.स. ९२०च्या शतकातील शिवाकोटाचार्य यांच्या लेखामधे इडलीचा उल्लेख आढळतो. ते असे लिहीतात की, दक्षिण भारतातील एका स्त्रीकडे एकदा एक ब्रम्हचारी अतिथी म्हणून आला असतांना, तिने बनवलेल्या अठरा प्रकारच्या व्यंजनांमधे ही इडली होती. इ.स. १०२० मधील एक कवी श्री चामुंडा राय यांच्या एका विवरणामधे इडली बनवण्याची प्रक्रिया अशा प्रकारे होती की, ज्यामधे तांदळाचा उपयोग नव्हता केला व ती किण्वन म्हणजे आंबवलेली सुद्धा नव्हती. तर ही इडली म्हणजे फक्त उडीद डाळ ताकामधे भिजवून, नंतर ती बारीक करुन त्यामधे दह्याचे वरचे ताजे पाणी, काळी मिरी पावडर, हिंग, मीठ व कोथींबीर एकत्र करुन हवा तसा आकार देऊन तयार केलेला पदार्थ होता, जो इडलीसारखा दिसत होता, परंतु ती इडली नव्हती.
तांदूळ व उडीद डाळीपासून इडली फक्त इंडोनेशियात बनवली जात होती. तिला त्या देशात ‘केडली’ या नावाने संबोधले जात होते. आहे की नाही मजेशीर? आपल्याला इडलीची जुळी बहीण केडली, जी कुंभमेळ्यात हरवली होती, हे माहितीच नव्हतं.
इ.स. ८०० ते १२०० च्या शतकांमधे काही इंडोनेशियन राजे आपल्या भारतातील नातेवाईंकाकडे त्यांच्या गाठीभेटींकरता, लग्न समारंभांकरता, तसेच हे राजे वधू संशोधनाकरता देखील यायचे, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे मुदपाकखान्यातील भारतीय आचारीदेखील ते सोबत आणत असत, जे आपापल्या शाही परिवारांच्या जेवणाकरता त्यांचे पारंपरीक पदार्थ तयार करत असत. त्यामधे या तांदूळ व उडीद डाळीचा किण्वन केलेला हा ‘इडली’ नावाचा पदार्थ होता. किण्वन म्हणजे आंबवलेला किंवा इंग्रजीत फर्मेंट केलेला पदार्थ असा अर्थ होतो. पदार्थ आंबवून म्हणजे किण्वन करुन व वाफवून करण्याची कला ही चीन, इंडोनेशिया, थायलंड, म्यानमार या देशांमधे जास्त प्रचलित होती. कारण तांदूळ उत्पादनामधे हे देश पहिल्यापासून अग्रेसर आहेत व तांदळाच्या पिठापासून किंवा तांदळापासून अनेक वाफवलेले पदार्थ तयार करता येतात, हे त्यांना माहीत असावं. म्हणून वाफवलेल्या पदार्थांचा त्यांच्या आहारात जास्त समावेश असावा. इंडोनेशियातील राजपरिवारांच्या भारतीय मूळ असलेल्या आचा-यांनी तयार केलेला ‘केडली’ नावाचा हा पदार्थ भारतीय आचा-यांनी पण शिकून घेतला असावा.
हे आचारी जेव्हा भारतात राहिले, तेव्हा त्यांनीच तांदूळ व उडीद डाळ मिसळून लुसलुशीत पांढरी स्वच्छ इडली तयार करण्याचा आविष्कार केला असेल, जो संपूर्णपणे भारतीय असावा व केवळ त्यामुळेच इंडोनेशियाच्या केडलीच्या या जुळ्या बहीणीचा म्हणजे इडलीचा भारतीयांच्या मनात आदरयुक्त भाव निर्माण झाला असावा. इंडोनेशियाच्या केडलीने आपली जुळी बहीण इडलीला भारतीयांच्या मनामधे स्थान मिळवून दिले व स्वतः केडली इंडोनेशियातच राहिली.
आपल्या भारतीय बल्लवाचार्यांनी या इडलीची अनेक बाळंतपणे करुन तिची नवनवीन रुपे जन्माला घातली. जुन्या इडलीकुमारीचा जन्म फक्त तांदूळ व उडीद डाळ यांचे मीलन झाले तरच शक्य होता, परंतु ही इडलीकुमारी भारतात आली व तिची अनेक रुपे तयार झाली. भारतामधे तांदळाचे लग्न फक्त उडीद डाळीसोबत न लावता – मूग डाळ, काळे उडीद यांचेसोबत लावून तिला नव्याने जन्माला घातले गेले. तिरुपती बालाजीला गेलात तर तिथे आजही काही ठिकाणी काळे उडीद वापरुन तयार केलेली काळी इडली मिळते.
आता तर या आधुनिक काळात इडलीची किती तरी रुपे पहायला मिळतात, जी इंडोनेशियातील लोकांनाही माहीत नसतील. यामधे दक्षिण भारत नेहमीच पुढे राहीला आहे. आता २१ व्या शतकामधे थट्टे इडली, मिनी इडली, पोडी इडली, रागी इडली, रवा इडली, मूग डाळ इडली, मिलेट्सची इडली, स्टफ इडली, बटर इडली, इत्यादी नवनवीन खानपानानुसार बनलेल्या इडलीने आपले जग व्यापून गेले आहे. मी तर असेही ऐकले आहे की आमच्या नागपूरमधे मिळणा-या काळ्या इडलीने खवयेगिरी करणा-या लोकांची उत्कंठा वाढीस लावली आहे. एम.टी.आर. व कांचीपूरम इडलीने तर आता लोकप्रियतेचा कळस गाठला आहे. आज इंडोनेशियाच्या केडलीपेक्षा तिच्या या भारतीय जुळ्या बहीणीचा, जिचे ‘नाव एक परंतु रुपे अनेक’ असे वैशिष्ट्य आहे, अशा इडलीचा दबदबा सर्व जगात पसरला आहे. तांदळापासून वाफवलेले इतके सारे पदार्थ बनू शकतात, हे आपण जगाला दाखवून दिले आहे. भारतामधे आजमितीला तांदळाचे दोन लाख वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
भारताच्या मध्य भागात जर आपण उभे राहीलो, तर उत्तरेकडे विविध प्रकारचे पराठे, छोले भटुरे, कुलछे असे पदार्थ आपले चित्त विचलीत करतात. तर दक्षिणेकडचे वडा सांबार, इडली सांबार, मसाला दोसा हे पदार्थ मुखामधे लाळेची त्सुनामी आणतात. आपल्या देशात विविध प्रांतांनुसार चटपटीत व्यंजनेसुद्धा आपापल्या रंगारुपाने, चवीने विविधतेत एकता साधून आहेत. आपल्या सहिष्णु वृत्तीमुळेच इंडोनेशियातील केडलीला आपण इडलीची नानाविध रुपे देऊन भारतीय खाद्यसंस्कृतीमधे मानाचे स्थान देऊन अजरामर केले आहे. इडलीसारखे असे किती तरी पदार्थ आज भारतीयांच्या आहारात “मिले सूर मेरा तु्म्हारा, तो सूर बने हमारा” असे म्हणत हिंदुस्थानच्या घराघरात विराजमान झाले असतील. कोणालाही “अतिथी देवो भव” म्हणण्याची परंपरा, मग ते परकीय पदार्थ का असेनात, भारतीय लोकांनी परकीय खाद्यसंस्कृतीचे स्वागत करुन व तिला आपलेसे करुन कायम जपलेली आढळते. अशी गरमागरम, मऊ, लुसलुशीत पांढरी स्वच्छ जाळीदार हलकी इडली जेव्हा सांबारच्या आंबटगोड वाटीरुपी तळ्यात डुबक्या मारुन आपल्या जिभेवर विराजमान होते ना, तेव्हा तो स्वर्गीय अनुभव काय वर्णावा? या इडली सांबारासोबत ओल्या नारळाची चटणी खाल्ली की, ब्रम्हानंदी टाळी लागलीच समजा!
“अहाहा!!! क्या कहना इडली राजकुमारी, तुम्हारी तारीफ करते करते जबान थकती नही!”
आपली ही खाद्ययात्रा पुढेही अशीच चालू ठेवत, मी इथे इडलीकुमारीची कहाणी संपवते. खाद्यपरंपरेत अशीच एक नवीन पदार्थाची कथा मी तुम्हाला पुढील भागात सांगेन. तोपर्यंत अशी नवीन कथा वाचण्याची तुमची उत्कंठा वाढीस लागू द्या.
॥ इतिश्री इडरीगा कहाणी सुफल संपूर्णम् ॥
© सौ. माधवी जोशी माहुलकर
संग्रहिका : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈