? वाचताना वेचलेले ?

☆ खरी श्रीमंती – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

आमच्या लहानपणी इंग्रजीचं फॅड अजिबात नव्हतं.

ABCD …….XYZ याचा संबंध फक्त शाळेत गेल्यावर , ते ही इंग्रजीच्या तासालाच !

आणि आता

ABP माझा, CID, MRI, X-ray, Z-TV विचारूच नका .

आमच्या लहानपणी ,

This is Gopal . अन That is Seeta .ही दोन वाक्यं पाचवीत गेल्यावर वाचता आली,तरी जबरदस्त कौतुक व्हायचं !

आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुका घ्यायची. आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पहायची की त्या पोराला एकदम कंडक्टर झाल्या सारखंच वाटायचं !

 

अहो, कंडक्टर याच्यामुळे की …..आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने ,

“हं! काय रे बाळ मोठेपणी तू काय होणार ?” असा प्रश्न विचारला की ते पोट्टं हमखास म्हणायचं …..

“मी मोठेपणी कंडक्टर होणार किंवा पोलीस होणार !”

तुम्हाला खोटं वाटेल, मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला किती परसेंटेज मिळालं,असा प्रश्न कोणीही कुणाला विचारत नव्हतं.

फक्त एवढंच विचारायचे ….

“पहिल्या झटक्यात पास झालास ना ?”

आणि आपण “हो” म्हणताच अख्ख्या गावाला आनंद व्हायचा !

म्हणजे पहा सुखाच्या , आनंदाच्या , मोठं होण्याच्या कल्पना किती छोट्या होत्या !

लक्षात घ्या. ज्या ज्या गोष्टीचा विस्तार होतो , त्या त्या गोष्टीतून दुःखच होतं .

तुम्ही बघा. पूर्वी गाव

 छोटं , घर छोटं , घरात वस्तू कमी , पगार कमी , त्याच्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी.

उसनंपासनं केल्याशिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता. तरीही मजा खूप होती!

 

तुम्ही आठवून पहा. गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं !

उसनंपासनं करावंच लागायचं.

साखऱ्या , पत्ती , गोडेतेल , कणिक या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसन्या मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता.

त्यामुळे कोणाकडे ‘हात पसरणे’ म्हणजे काहीतरी गैर आहे, असं आम्हाला कधी वाटलंच नाही .

उलट या गोष्टींची इतकी सवय होती की कोणत्याच गोष्टीचा कमीपणा वाटत नव्हता.

डोकं दुखल्यावर शेजाऱ्याकडे अमृत अंजनचं एक बोट उसनं मागायलासुद्धा अजिबात लाज वाटली नाही .

घरातल्या वडील माणसासाठी 10 पैश्याच्या तीन मजूर बिड्या किंवा 15 पैशाचा सूरज छाप तंबाखूचा तोटा आणतानाही मान कशी ताठ असायची !

 

कोणतीच गोष्ट कोणापासून लपून रहातही नव्हती आणि तसा प्रयत्नही फारसा कुणी करत नव्हतं !

गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पहायला येणार, ही बातमी लपून राहूच शकत नव्हती.कारण शेजाऱ्या-पाजाऱ्याकडून पोह्याच्या प्लेट , चमचे , बेडशीट ,

 तक्के , उशा , दांडी असलेले कपं आदी साहित्य मागून आणल्याशिवाय ‘पोरगी दाखवायचा  कार्यक्रम ‘ होऊच शकत नव्हता !

आणि मित्र हो हीच खरी श्रीमंती होती , ते आत्ता कळतंय !

आणि हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं लग्न होऊन जातं, तरीही कळत नाही !

जेंव्हा Status वर डान्सचा व्हिडीओ येतो तेव्हा कळतं , अरे लग्न झालं वाटतं !

 

हे सगळं लिहिण्यामागचा एकच उद्देश आहे –

भेटत रहा , बोलत रहा , जाणे-येणे ठेवा , विचारपूस करा .

जेवलास का ?

झोपलास का ?

सुकलास का ?

काही दुखतंय का ? असे प्रश्न विचारताना लागलेला मायेचा , काळजीचा , आपुलकीचा कोमल     स्वरच जगण्याचं बळ देत असतो !

माणसाशिवाय ,    गाठीभेटीशिवाय , संवादाशिवाय काssssही खरं नाही !

कवी :अज्ञात

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments