श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ वारस… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

“आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय जिल्हाधिकारी साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी उपस्थित सर्व मान्यवर,आजचे सत्कारार्थी आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक श्री.अरुण नाईक यांना विनंती करते की त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं” सुत्रसंचालिकेने अशी विनंती करताच अरुण, जिल्हा साहित्य संघाचे अध्यक्ष आणि कलेक्टर साहेबांसोबत व्यासपीठावर जाऊन बसला.समोरच्या प्रेक्षागृहाकडे त्याने पाहिलं.प्रेक्षागृह तुडुंब भरलं होतं.एकही खुर्ची रिकामी नव्हती.”हे सगळे खरोखरच पुस्तकप्रेमी आहेत की पत्रिकेत जेवायचंसुध्दा निमंत्रण आहे  म्हणून फक्त जेवायला आलेले लोक आहेत?” त्याच्या मनात विचार आला.मागे त्याने पुस्तक प्रकाशनाचे दोनतीन कार्यक्रम बघितले होते.फारच कमी उपस्थिती होती.त्याच्या स्वतःच्या दोन पुस्तकांच्या प्रकाशनावेळीही अगदी मोजकी डोकी हजर होती.अर्थात आजचा कार्यक्रम वेगळा होता.त्याच्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या जीवनावर आधारित कादंबरी “संघर्ष”ला साहित्य अकादमीचा राष्ट्रीय  पुरस्कार मिळाला होता.त्यानिमीत्त जिल्हा साहित्य संघातर्फे आज त्याचा सत्कार आणि मुलाखत असा दुहेरी कार्यक्रम होता.पुरस्कार मिळाल्याबद्दल नातेवाईक आणि मित्रपरीवार त्याला सतत पार्टी मागत होते.म्हणून मग अरुणने स्वखर्चाने कार्यक्रमाला येणाऱ्यांसाठी जेवणाचीही व्यवस्था केली होती.

या कादंबरीसाठी अरुणला खुप मेहनत करावी लागली होती.आदिवासींच्या जीवनाच्या अभ्यासासाठी त्याला गडचिरोलीच्या जंगलात कित्येक वेळा रजा घेऊन जावं लागलं होतं.बऱ्याचदा तर त्याला १५-२० दिवस जंगलातच मुक्काम करावा लागला होता.दोन वर्षाच्या अथक मेहनतीतून कादंबरी तयार तर झाली पण तिला पुण्यामुंबईतला कोणताही प्रकाशक छापायला तयार होईना.सध्याच्या व्हाॅटस्अप आणि फेसबुकच्या जमान्यात एवढी मोठी ३०० पानांची कादंबरी विकत घेऊन वाचणार कोण?हा त्यांचा प्रश्न होता आणि तो रास्तही होता.

त्याच्या स्वतःच्या घरात तो स्वतः सोडून कुणालाच पुस्तक वाचण्याची आवड नव्हती. एक लाखांहून जास्त रुपये किंमतीची पुस्तकं त्याच्या स्टडीरुममध्ये होती पण त्याची मुलं आणि बायको त्यांच्याकडे ढूंकूनही बघत नव्हती.मुलं व्हाॅटस्अप आणि फेसबुकमध्ये हरवून गेली होती तर बायकोला टिव्ही सिरीयल्सशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं.आपल्या पश्चात या बहुमोल खजिन्याचं काय होणार?त्याला वारस कुठून आणणार?की अशीच रद्दीमध्ये त्याची विल्हेवाट लागणार? याची अरुणला सतत काळजी लागलेली असायची.घरची ही परिस्थिती. बाहेरच्यांकडून काय अपेक्षा करणार?पण अरुण त्या कादंबरीने झपाटला होता. पुण्यामुंबईतल्या प्रकाशकांनी नकार दिल्यावर त्याने स्थानिक प्रकाशकांशी संपर्क साधला.बरीच फिरफिर केल्यानंतर एक प्रकाशक तयार झाला.मात्र अट ही होती की पुस्तक विक्रीला येईपर्यंतचा सगळा खर्च अरुणने स्वतः करायचा.नाईलाजास्तव पदरचे सत्तर हजार रुपये खर्च करुन अरुणने पुस्तक प्रकाशित केलं.योगायोग म्हणा,नशीब म्हणा की पुस्तकाचा उच्च दर्जा म्हणा,अरुणच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.

आपल्या देशात चमत्कार केल्याशिवाय कुणी नमस्कार करत नाही.या अगोदरही अरुणची दोन पुस्तकं प्रकाशित झाली होती.तीही चांगली दर्जेदार होती पण वाचक,समाज,मिडियाने त्यांना नगण्य प्रतिसाद दिला होता.पुस्तकांची विक्रीही यथातथाच झाली होती.त्यामुळे ती पुस्तकं छापण्याचा खर्चही अरुणच्याच बोकांडी बसला होता.मात्र “संघर्ष”ला पुरस्कार मिळाला आणि अरुण एकदम प्रकाशझोतात आला.अनेक पुस्तकं लिहुनही पुरस्कार मिळवू न शकणाऱ्या जुन्या लेखकांना या बातमीने जबरदस्त धक्का बसला तर नवीन लेखकांना हुरुप आला.”संघर्ष” वर चर्चा झडू लागल्या.बऱ्यावाईट प्रतिक्रिया मिळू लागल्या.खुप जणांना ते फालतू पुस्तक वाटलं तर काही जणांना वास्तव!पण पुरस्कार सगळयांची तोंड बंद करत असतो.शेवटी उशीरा का होईना अरुण नाईकचे सत्कार समारंभ सुरु झाले.आजचा सत्कार समारंभही जिल्हा साहित्य संघात बराच काथ्याकूट झाल्यानंतरच ठरला होता.कारण  अरुणसारख्या नवोदित लेखकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळावा हेच प्रस्थापित साहित्यिकांच्या पचनी पडलं नव्हतं.

वक्त्यांची भाषणं सुरु झाली.अरुणने पाहिलं समोरच्या सोफ्यावर बसलेला त्याचा मुलगा आणि मुलगी मोबाईलशी खेळण्यात गुंतून गेले होते.बापाच्या सत्कारसमारंभचं त्यांना सोयरसुतक नव्हतं.बायको जांभया देत बसली होती.अधुनमधुन तिचेही हात आणि डोळे मोबाईलमध्ये गुंतत होते.

बाहेरच्या बाजुला असलेल्या स्टाॅलवर प्रकाशनाच्या इतर पुस्तकांबरोबर अरुणचीही पुस्तकं होती.वाचक ती चाळत चर्चा करत होते.

“काय रे घेतोय का पुस्तक?”एकाने आपल्या मित्राला विचारलं

” नाही रे बाबा.फार महाग आहे”

“अरे महाग कसलं!फक्त पाचशे रुपयांचं आहे.शिवाय ४० टक्के डिस्काऊंट धरुन फक्त तीनशेला पडतंय ते पुस्तक!”

” अरे बाबा ते ठिक आहे पण तीनशे पानाचं पुस्तक वाचायला कुणाला इथं फुरसत आहे?व्हाॅटस्अप आणि फेसबुकवरचे मेसेजेस पहातापहाताच दिवस निघून जातो.शिवाय हे पुस्तक आदिवासींच्या जीवनावर आहे.आपला काय संबंध आदिवासींशी?”

” हो तर ते सिडने शेल्डन आणि आयर्विंग वँलेस यांची पुस्तकं तू नेहमी वाचायचास. त्यांच्याशी तुझा फार जवळचा संबंध आहे वाटतं?”समोरचा हसत म्हणाला ” आणि संबंध नाही म्हणतोयेस तर फोटो का काढतोय पुस्तकाचा?अरे!व्वा!मोबाईल नवीन घेतलास वाटतं!”

“हो मागच्याच आठवड्यात घेतलाय.तो मागचा मोबाईल होता ना त्याचा कॅमेरा इतका खास नव्हता”

“अच्छा!फक्त तेवढ्याच कारणाकरीता बदललास होय!कितीचा आहे?”

“फक्त पंचवीस हजाराचा.आणि फोटो याकरीता काढतोय की हे पुस्तक काही दिवसांनी लायब्ररीत येईलच त्यावेळी पुस्तकाचं नाव आठवावं म्हणून!म्हणजे पुस्तक खरेदी करायची गरज नाही.फुकट वाचता येईल.बरं आज तू कसा काय इकडे?”

“काही नाही रे.या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं.यायची इच्छा नव्हती.आपण कुठे एवढे पुस्तकप्रेमी!पण बायको म्हणाली जेवणही ठेवलंय म्हणून आलो तेवढीच बायकोला स्वयंपाकापासून फुरसत.तू कसा काय आलास?”

“माझंही तुझ्यासारखंच सेम सेम”

दोघांनी जोरात हसून एकमेकांना टाळी दिली.

वक्त्यांची भाषणं झाली.अरुणचा सपत्नीक सत्कारही झाला.प्रकट मुलाखतही संपण्यात आली होती.

“अरुणजी आता शेवटचा प्रश्न!”मुलाखतकार म्हणाले ” प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हंटल्या जातं.तुम्ही याबद्दल काय सांगाल?”

अरुण या प्रश्नासाठी तयार होता. क्षणभरात दोन वर्षाचा काळ त्याच्या डोळ्यासमोर तरळून गेला.या दोन वर्षात त्याच्या बायकोने या पुस्तकासाठी कसलीही मदत तर केली नव्हतीच उलट त्यात अडथळेच आणण्याचा प्रयत्न केला होता.तिला अरुणचं असं वारंवार गडचिरोलीला जाणं अजिबात पसंत नव्हतं.मुळात ती त्याच्या पुस्तक लेखनाला रिकामे उद्योग म्हणायची.या विषयावरुन तिने त्याच्याशी अनेकदा भांडणंही केली होती.त्यामुळे ती प्रेरणा असणं शक्यच नव्हतं.त्याच्या आईलाही त्याचं सदोदित पुस्तक वाचणं आवडायचं नाही.ती त्याला पुस्तकी किडा म्हणायची.त्याला प्रेरणा मिळाली होती त्याच्या वडिलांकडून.त्यांनीच त्याला पुस्तकांचं वेड लावलं होतं आणि लिहायला उद्युक्त केलं होतं.” मनातल्या भावना कागदावर उमटत गेल्या की सुचत जातं ” असं ते म्हणायचे.त्यांच्यामुळेच अरुण वर्तमानपत्रातून लेख,कथा लिहू लागला होता.

पण या भावना जगासमोर मांडणं शक्य नव्हतं.तशा त्या  मांडल्या तर तो समस्त  स्त्रीजातीचा अपमान ठरला असता.अनिच्छेने का होईना अरुणने जगरहाटीसोबत जायचं ठरवलं.

” अर्थातच माझी आई आणि माझी पत्नी यांनी सातत्याने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी लेखक होऊ शकलो.आज आई हयात नाही पण माझ्या पत्नीने तिची उणीव मला कधी जाणवू दिली नाही.तिचं सहकार्य आणि प्रोत्साहन यामुळेच आज हे पुस्तक पुर्ण होऊ शकलं.माझ्या या पुरस्काराची अर्धी वाटेकरी ती आहे”

सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर फोटोग्राफर्सचे फ्लँश चमकू लागले.बायको खुश झाली.अरुणला मात्र आपण वडिलांवर अन्याय केला असं प्रकर्षांने जाणवून गेलं.

कार्यक्रम संपला.सूत्रसंचालिकेने अरुणचं पुस्तक सभागृहाबाहेरच्या स्टाॅलवर सवलतीत उपलब्ध असल्याचं जाहीर केलं त्याचबरोबर जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय जावू नये अशी सुचनाही केली. ८०टक्के माणसं जेवणाच्या हाॅलकडे पळाली. ज्यांना जेवायला जागा मिळाली नाही अशी उरलेली २० टक्के बुकस्टाॅलकडे वळली.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments