श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ उगवत्या सूर्याचे तेज लाभलेला वैराग्यवान योद्धा ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

 

लेफ्ट्नंट जनरल हनुतसिंग साहेब!

धर्मासाठी संसाराचा त्याग केलेल्या बैराग्यांनी धर्मासाठी, मातृभूमीसाठी शस्त्रे हाती घेऊन प्रसंगी प्राणांची बलिदाने दिल्याची उदाहरणे आपल्या इतिहासात निश्चितपणे आढळतात. नजीकच्या इतिहासात डोकावू जाता एकाच लढाईत थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल दोन हजार साधुंनी लढता लढता प्राणार्पण केल्याची नोंद आहे.

राजस्थानात चौदाव्या शतकात एक विवाहीत संतयोद्धा होऊन गेले….रावल मल्लिनाथ त्यांचे नाव. यांच्याच वंशात विसाव्या शतकात त्यांच्यासम कीर्ती प्राप्त करणारे एक योद्धे जन्मले. सैनिकी जीवनात युद्धभूमीवर आणि आध्यात्मिक जीवनात एक कठोर वैराग्यवान संत म्हणून त्यांची कामगिरी अजोड म्हणावी अशीच आहे. त्यांचं नाव होतं हनुत. हनुत म्हणजे उगवत्या सूर्यासमान तेजस्वी! हेच आपले लेफ्टनंट जनरल हनुतसिंग राठौर साहेब. १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धातले एक महानायक.

लेफ्टनंट कर्नल अर्जुनसिंग यांच्या पोटी ६ जुलै, १९३३ रोजी जन्म घेतलेल्या हनुत सिंग यांनी वडीलांच्या पावलावर पाऊल टाकत १९५२ मध्ये भारतीय सैन्याच्या १७, हॉर्स अर्थात पुना हॉर्स रेजिमेंट मध्ये अधिकारी म्हणून दिमाखात प्रवेश केला. याच रेजिमेंटच्या सर्वोच्च नेतेपदापर्यंत त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मजल मारली!  द पुना हॉर्स नावामागेही एक रंजक इतिहास दडलेला आहे. दुसरे बाजीराव पेशवे आणि लॉर्ड हॅस्टिंग यांच्यात १३ जून १८१७ या दिवशी एक लष्करी करार झाला होता. यानुसार दी पूना इररेग्युलर हॉर्स नावाचे अश्वदल उभारले गेले. या दलाचा सर्व खर्च दुस-या बाजीराव पेशव्यांनी करायचा आणि हे दल आणि हे दल पेशव्यांच्याच इलाख्यात राहील असे ठरले. पुण्यात करार झाल्याने या रेजिमेंटला पुणे हे नाव चिकटले. या रेजिमेंटमध्ये प्रामुख्याने उत्तम प्रजातींच्या अश्वांचा समावेश असे. पुढे काळानुसार स्वयंचलित वाहने, रणगाडे इत्यादी आधुनिक साधनांचा समावेश केला गेला. मात्र नाव तेच ठेवले गेले हॉर्स रेजिमेंट.

जमिनीवरच्या युद्धात रणगाड्यांचं महत्त्व आजही अपार मानले जाते. विशेषत: पाकिस्तानी सीमेला लागून असलेल्या राजस्थान सारख्या सपाट, वालुकामय प्रदेशातून पुढे मुसंडी मारायाची असेल तर रणगाड्यांना पर्याय नाही. म्हणूनच आजवर झालेल्या युद्धांत दोन्ही बाजूंनी रणगाड्यांचा वापर केला गेल्याचे दिसते. हे रणगाडे म्हणजे मरूभूमीवरचे अश्वच म्हणावेत! १९६५ च्या भारत-पाक युद्धापासून पुना हॉर्सकडे सेंचुरियन नावाचे रणगाडे होते. या युद्धात लेफ्ट्नंट कर्नल ए. बी. तारापोर यांनी प्रचंड कामगिरी करून पाकिसानचे ६० रणगाडे उध्वस्त केले होते. पण दुर्दैवाने तारापोर साहेबांच्या रणगाड्यावर तोफगोळा आदळून साहेब वीरगतीस प्राप्त झाले. त्यांना परमवीर चक्र मरणोत्तर दिले गेले. याच रेजिमेंटमध्ये हनुतसिंग साहेब पुढे सहभागी झाले होते.

१९७१ मध्ये पाकिस्तानशी युद्ध कधीही सुरू होईल अशी चिन्हे होती. आणि तत्कालीन सेनाप्रमुख फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांनी काळाची पावले ओळखून रणगाड्यांची व्युहरचना आधीच निश्चित करून सरावही सुरु केला होता….याला म्हणतात लष्करी नेतृत्व! आणि ही जबाबदारी पेलली होती हनुत सिंग साहेबांनी. पुढे सैन्य इतिहासात अमर झालेली बसंतरची लढाई होणार होती आणि या लढाईचे नायक असणार होते लेफ्टनंट कर्नल हनुतसिंग साहेब.

पाकिस्तानने आगळीक केल्यानंतर भारतानेही प्रतिआक्रमण केले. इंडियन फर्स्ट कोअरचे कमांडींग ऑफिसर लेफ्टनंट जनरल के. के. सिंग साहेबांनी पाकिस्तानी क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली. त्यांच्यासोबत ५४वी इन्फंट्री डिवीजन, १६वी आर्मर्ड ब्रिगेड होती. परंतू त्यांना पाकिस्तानच्या जोरदार प्रतिकाराला तोंड द्यावे लागले. विशेषत: शत्रूने युद्धक्षेत्रात हजारो भूसुरुंग पेरून ठेवलेले होते. भूसुरुंग निकामी करून रस्ता सुरक्षित केला गेल्यावरच सैन्याला पुढे सरकता येत होते आणि यात वेळ लागत होता. आणि युद्धात तर प्रत्येक क्षण मोलाचा!  

इकडे रस्त्यात भूसुरुंग आणि पाकिस्तान्यांचा बेफाम बॉम्बवर्षाव… परिस्थिती नाजूक होती. एका नदीच्या पुलाजवळ वेगाने पोहोचता आले तर रणगाडे आणि सैन्य पुढे जाऊ शकणार होते. आणि सुमारे सहाशे मीटर्समधील रस्त्यातले सुरुंग निकामी करण्याचे काम शिल्लक होते.

इथे हनुतसिंग साहेबांनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. यात धोका तर प्रचंड होता. जमिनीखाली मृत्यू टपून बसला होता. सरावाने आणि मनोबलाने पाकिस्तानच्याही पुढे दोन पावले असणा-या हनुत सिंग साहेबांच्या सैनिकांनी साहेबांचा शब्द खाली पडू दिला नाही. त्यांनी आपले रणगाडे त्या रस्त्यावरून पुढे हाकारले. कोणत्याही क्षणी सुरुंग फुटू शकला असता आणि रणगाड्याच्या चिथड्या उडाल्या असत्या. पण त्यादिवशी रणदेवता हनुत सिंग साहेबांवर प्रसन्न असावी. कर्तव्यावर असताना मनातल्या मनात अध्यात्मिक उपासना आणि फुरसतीच्या वेळी प्रत्यक्ष उपासना करणा-या हनुत सिंग साहेबांच्या पुण्याचे फळ म्हणावे हवं तर पण त्या दिवशी या रणगाड्यांच्या रस्त्यात एकही सुरुंग फुटला नाही. संपूर्ण दल नदीपर्यंत सुखरूप पोहोचले… एका महाधाडसी निर्णयाला दैवानेच आशीर्वाद दिला होता! दुस-याच दिवशी याच मार्गाने गेलेली आपली दोन लष्करी वाहने भुसुरुंगात नष्ट झाली. याला हनुतसिंग साहेबांनी देवाचा आशीर्वादाचा हात मानले. योगायोगाने पुना हॉर्सच्या मानचिन्हात उंचावलेल्या हाताची प्रतिमा आहे….हाच तो दैवी आशीर्वादाचा हात असावा! 

या कारवाईदरम्यान पाकिस्तान प्रचंड प्रमाणावर बॉम्बवर्षाव, गोळीबार करत होता. परंतू मरण वर्षावातूनही हनुत सिंग साहेब युद्धक्षेत्रात एका जागेवरून दुस-या जागेवर नीडरपणे आणि अतिशय चपळाईने फिरत होते. त्यांनी प्रशिक्षित केलेला प्रत्येक टॅंक कमांडर अर्थात रणगाडा प्रमुख त्यांना वैय्यक्तिकरीत्या माहित होता. प्रत्येक रणगाडा त्यांच्या जणू हाता खालून गेलेला होता. युद्धपूर्व काळात त्यांनी आपल्या रेजिमेंटमध्ये अतीव धैर्य, उत्साह आणि साहस जणू पेरून ठेवले होते… जसा एखादा निष्णात शेतकरी पावसाच्या आधी उत्तम बियाणे पेरून ठेवतो तसा. आणि इथे तर हे बियाणे उगवण्यास आणि फोफावण्यास अगदी उतावीळ होते. या रेजिमेंटमधील कुणालाही उन्हाची, धुळीची आणि जीवाची पर्वा नव्हती. शांतता काळात त्यांनी सरावात गाळलेले घामाचे थेंब युद्धात मोत्यांसारखे शोभून मातृभूमीच्या कंठात विजयमालेत शोभून दिसणार होते.

पुढे गेलेला रणगाडा एक इंचही मागे सरकता कामा नये असा हनुतसिंग साहेबांचा स्पष्ट आदेश होता. एखादा रणगाडा मागे फिरला म्हणजे आपला पराभव होतो आहे, असे सैन्याला वाटून मनोबल खालावू शकते, असा साहेबांचा विचार होता आणि तो योग्यही होता. निशाण पडले की सैन्याची पावलं डगमगू शकतात असा इतिहासही आहेच. अर्थात भारतीय सैनिक असे काहीही होऊ देणार नव्हते. त्यांनी पाकिस्तानी रणगाड्यांना मागे रेटीत रेटीत नेले आणि आपण ती लढाई जिंकलो. यात पाकिस्तानच्या अत्यंत शक्तिशाली १३, लान्सर्स ही रणगाडा दल तुकडी पुरती नेस्तनाबूत झाली होती. त्यांच्याकडे अमेरिकेतून आयात केलेले शक्तीशाली पॅटन रणगाडे होते. पण शस्त्रांमागची मनगटे आणि मने बलवान असावी लागतात. आणि भारतीयांची तशी असतातच हे सिद्ध झाले. खुद्द पाकिस्तानी सैन्याने आपल्या या पुना हॉर्स रेजिमेंटला ‘फक्र-ए-हिंद अर्थात ‘हिंदुस्थानचा अभिमान’ म्हणून गौरवले! 

हनुत सिंग साहेब अंगाने सडपातळ आणि उजळ वर्णाचे. नाक टोकदार. डोळे पाणीदार. रेजिमेंटमधील सर्वसामान्य सैनिकांसाठी भावाप्रमाणे, पित्याप्रमाणे वागणारे. पण शिस्तीत अतिशय नेमके आणि कडक. रेजिमेंटमधील कोणतीही गोष्ट त्यांच्या नजरतून सुटत नसे. आणि महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही अनावश्यक गोष्टीत त्यांना जराही रस नव्हता. मूर्खांसाठी त्यांच्याकडे वेळ नसे. सैन्यात कागदोपत्री कामेही भरपूर आणि महत्त्वाची असतात. पण या कामांमुळे मूळच्या कर्तव्याला पुरेसा वेळ देता येत नसेल तर त्याला काहीही अर्थ नाही, असे ते स्पष्टपणे बजावत असत. सैनिक कागदांत गुंडाळला गेला तर शस्त्रं कधी चालवणार असा त्यांचा खडा सवाल असे. स्वत: साहेबांनी १९५८ मध्ये इंग्लंड येथे सेंन्च्युरीयन रणगाडा अभ्यासक्रम विशेष श्रेणीत उत्तीर्ण केला होता. आणि यामुळेच त्यांना आपल्या महाराष्ट्रातील नगर येथील आर्मर्ड कोअर सेंटर अ‍ॅन्ड स्कूल येथे प्रशिक्षक म्हणून नेमले गेले होते. पायदळ ज्या तत्वावर युद्ध लढते ती तत्वे आणि स्वयंचलित वाहनांच्या साहाय्याने जी लढाई लढली जाते त्यात बराच फरक असतो हे त्यांनी ताडले. स्वयंचलित वाहनांचा लढाईत वापर जर्मनांनी खूप परिणामकारक रितीने केला होता. त्यांच्या पॅन्झर रणगाड्यांच्या व्युव्हरचनेचा हनुतसिंग साहेबांनी खूप बारकाईने अभ्यास केला. आणि भारतीय सैन्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शक साहित्य तयार केले. इथून हनुतसिंग साहेबांनी अनेक जबाबदारीच्या पदांवर नेमले गेले. १९७० मध्ये साहेबांना पुन्हा नगर मध्ये नेमले गेले. १९५८ मध्ये केलेल्या नोंदी त्यांनी जपून ठेवल्या होत्या. त्यांच्या साहाय्याने साहेबांनी पुन्हा नवे लेखी साहित्य तयार केले. त्यावर आधारीत युद्धाभ्यास करवून घेतला. मुख्य म्हणजे सैनिकांत नवा जोश भरला. १९७० मध्ये साहेबांना पुना हॉर्समध्ये नेमले गेले. १९७१ च्या युद्धात भारतीय रणगाड्यांनी आणि ते हाकणा-या बहाद्दरांनी जी कामगिरी बजावली ती जगजाहीर आहे. या लढाईत स्वर्गीय अरूण खेत्रपाल यांनी बजावलेली कामगिरी हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्याबद्दल पुढील लेखात लिहीनच.

एक वीर योद्धा, सैनिक प्रशासक, प्रशिक्षक म्हणून ख्यातकीर्त असलेल्या या महान व्यक्तीची दुसरी बाजू सुद्धा तितकीच वेगळी आहे. संसाराच्या जबाबदा-या सैनिक कर्तव्यात बाधा आणतील म्हणून हनुत सिंग साहेबांनी लग्न केले नाही. १९६८ मध्येच त्यांनी शिवबालयोगी नावाच्या विरक्त संतांचे अनुयायीत्व स्विकारले होते. आणि सैन्यजीवनातही अध्यात्मिक साधना सुरूच ठेवली होती. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात स्वत:ला अध्यात्मिक चिंतनात अधिक रममाण करून घेतले. एका सैन्याधिका-याच्या अंगावर आता साधुची वस्त्रे आली होती. आणि याही क्षेत्रात ते अभ्यासू, कडक शिस्तीचे आणि कठोर योगी म्हणून नावारूपास आले. सैनिक तो योगी हा त्यांचा प्रवास अनोखा आणि वंदनीय आहे. १० एप्रिल, २०१५ या दिवशी संत हनुतसिंग साहेबांनी समाधी घेऊन आपले जीवीतकार्य संपवले. समाधी अवस्थेत गेल्यानंतर तिस-या दिवशी त्यांचे प्राण पंचत्वात विलीन झाले. या तिन्ही दिवसांत त्यांचा देह, मुख अत्यंत तेजस्वी दिसत होते….. त्यांच्या नावाला साजेसे… हनुत म्हणजे उगवणा-या सुर्याचे तेज! 

भारतमातेच्या या सुपुत्रास साष्टांग दंडवत आणि श्रद्धांजली.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments