इंद्रधनुष्य
☆ “संत जनाबाई”… लेखिका : सुश्री अरुणा ढेरे – संग्राहक : श्री अनिल कुमकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
तुळशीचे बनी । जनी उकलिते वेणी
हाती घेउनिया लोणी । डोई चोळी चक्रपाणी
माझे जनीला नाही कोणी । म्हणूनी देव घाली पाणी
जनी सांगे सर्व लोकां । न्हाऊ घाली माझा सखा
…. यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेला जनाबाईचा हा अभंग ऐकला तेव्हा आतून अगदी हलून गेले. बाई म्हणून जनाबाईचा विचार तोपर्यंत इतका थेट, इतका स्पष्ट आणि इतका तीव्र असा मनात आला नव्हता. इतर संतांचे अभंग, तसे जनीचेही अभंग. ऐकता- वाचताना तिच्या स्त्रीत्वाची अशी झणझणून जाणीव नव्हती झाली.
हा अभंग ऐकताना डोळ्यांसमोर सहज आली ती एक तरुण मुलगी. निळ्यासावळ्या मंजिर्यांनी बहरलेल्या, हिरव्यागार पानांनी डवरलेल्या तुळशीच्या बनात उभी असलेली. तिच्या विठ्ठलाची आवडती तुळस. जनी त्या तुळसबनात आपली वेणी उकलून केस मोकळे करते आहे. लांब असतील का तिचे केस? आणि दाटही? की असतील लहानसर, पातळ आणि मऊशार? कुरळे असतील, का असतील सरळच? कोण जाणे ! पण तिचा विठू त्या केसांच्या मुळांना लोणी लावून चोळणार आहे. मग गरम पाण्यानं तिला न्हाऊ घालणार आहे. केवढा आनंद आहे जनीला त्या गोष्टीचा ! तिला तिचं असं कुणीच नाही जगात. पण विठू आहे. तो तिचाच आहे. अगदी तिचा. किती साधेपणानं सांगते आहे जनी, की माझा सखा मला न्हाऊ घालणार आहे.
जनीच्या या साधेपणानं मी हलून गेले. तुळशीचा असावा तसा तिच्या बाई असण्याचा वेगळाच दरवळ या अभंगातून आला. त्यानं मी हलून गेले. आणि त्याहीपेक्षा तिच्या आणि विठूच्या जगावेगळ्या जवळिकीनं हलून गेले.
जनाबाईचं महिपतींनी लिहिलेलं लौकिक चरित्र अगदी साधं आणि थोडकं आहे. ती मराठवाड्यातली- परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडची मुलगी. पाच-सात वर्षांची होती तेव्हा तिची आई वारली. पंढरपूरला नामदेवांच्या घरी तिच्या वडलांनी तिला नेऊन ठेवलं. पुढे तेही वारले. जनी नामदेवांच्या घरीच राहिली, वाढली. बस्स. इतकंच तर तिचं चरित्र !
पण माणसाचं जगणं अशा ढोबळ तपशिलांपुरतं थोडंच असतं? त्या पलीकडेच तर ते बहुतेककरून उरलेलं असतं. जनीची सगळी कविता म्हणजे तिचं आंतरचरित्र आहे. आणि मराठी कवितेच्या प्रारंभकाळात अशी धीट, कणखर, नि:संदिग्ध आणि जगण्यात घुसळून आलेली कविता एका बाईनं लिहिली आहे, हे अद्भुतही फार अभिमानाचं आहे.
जनीच्या पोरकेपणाची, अनाथपणाची जाणीव तिच्या अभंगांच्या मुळाशी सारखी उमळते आहे. अगदी एकटी आहे ती. तिला तिचं माणूस कोणी नाहीच. म्हणून तर तिचं विठूशी असलेलं नातं अनेकपदरी आणि दाट, गहिरं आहे.
‘तुजवीण बा विठ्ठला । कोणी नाही रे मजला’
– असं तिनं विठूला कळवळून सांगितलं आहे.
‘माय मेली, बाप मेला । आता सांभाळी विठ्ठला’
– असं स्वत:ला त्याच्यावर निरवलं आहे. आणि त्यानंही तिचा शब्द फुलासारखा झेलला आहे. आई, बाप, सखा, सहचर, मुलगा- तिला हव्या त्या नात्यांनी तो तिला भेटला आहे.
माणसाचं आयुष्य अर्थपूर्ण करणारी जी जी नाती आहेत, ती ती सगळी नाती जनीनं विठ्ठलाशी जोडली आहेत.
‘राना गेली शेणीसाठी । वेचू लागे विठो पाठी’
किंवा
‘पाणी रांजणात भरी । सडासारवण करी ।
धुणे धुऊनिया आणी । म्हणे नामयाची जनी ।’
– असे तिचे अभंग पहा. जनी जी जी कामं करते, ती ती सगळी तिच्याबरोबर तिच्यासाठी विठू करतो आहे. तिचा एक सुंदर अभंग आहे.
साळी कांडायासी काढी । चक्रपाणी उखळ झाडी
कांडिता कांडिता । शीण आला पंढरीनाथा
कांडिताना घाम आला । तेणे पीताम्बर भिजला
पायी पैंजण, हाती कडी । कोंडा पाखडोनी काढी
हाती आले असे फोड । जनी म्हणे, मुसळ सोड
देवच साळी कांडतो आहे. घामेजून जातो आहे. हाताला फोड आले आहेत. शेवटी जनीच म्हणते आहे की, ‘पुरे कर आता. मुसळ बाजूला ठेव.’
जनीला पडणारे कष्ट, तिची होणारी दमणूक, तिचे सोलवटून निघणारे हात- जनीच्या आंतरविश्वात त्या विठ्ठलानं तिचं सगळं दु:ख स्वत:वर ओढून घेतलं आहे. तोच दमला आहे. घामानं भिजला आहे. त्याच्या हातांना फोड आले आहेत. कष्टांचं, दु:खाचं, एकटेपणाचं हे रूपांतर विलक्षण थक्क करणारं आहे.
देवाच्या थोरवीची जाणीव जनीला आहे. अगदी स्पष्ट आहे. त्याच्या पीताम्बराचा, हातातल्या सोन्याच्या कड्याचा, पायातल्या पैजणांचा उल्लेख ती करतेच आहे ना ! पण तिच्यासाठी दोघांमध्ये द्वैत नाहीच आहे. गरीब आणि श्रीमंत, किंवा उपेक्षित, वंचित आणि सुपूजित, प्रतिष्ठित, इतकाच नव्हे तर माणूस आणि परमेश्वर हा भेदही त्यांच्या नात्यात सहज नाहीसा झालेला आहे. म्हणून विठूचं तिच्याबरोबर कष्ट करणं, तिच्यासोबत सतत असणं, हे तिच्यासाठी स्वाभाविकच आहे. ती त्याला इतकी बरोबरीच्या नात्यानं वागवते, इतकी सहज त्याला रागावते, त्याला जवळ घेते, त्याला सलगी देते, की अरूपाला रूप देण्याचं, निर्गुणाला सगुण केल्याचं किंवा अलौकिकाला लौकिकात साक्षात् केल्याचं तिनं जे अपूर्व साहस केलं आहे, त्याची जाणीवच आपल्याला होत नाही. चमत्काराच्या पातळीवर जनी विठूशी नातं सांगतच नाही; ती जणू वस्तुस्थितीचंच निवेदन करते.
पहा ना, तिच्या एका अभंगात- ती धुणं घेऊन नदीकडे निघाली आहे. उपाशी आहे. विठूवर रागावली आहे. तो मागे धावतो आहे. मला का टाळून चाललीस, म्हणून विचारतो आहे. ती फटकारते आहे त्याला. ‘कशाला मागे आलायस?’ म्हणून झिडकारते आहे. आणि तो बिचारा खाली मान घालून मुकाट तिच्यामागे चालतो आहे. इतर कुठे पाहिलं आहे असं दृश्य? फक्त जनीचाच हा अनुभव आहे.
अर्थात् हे तिला शक्य झालं आहे ते केवळ संतपुरुषांमुळेच. तिच्या बाईपणाचा अडसर तिच्या परमार्थाच्या वाटेतून त्यांनी दूर केला. त्यांनी तिच्यावरचं दडपण दूर केलं. आपण बाई आहोत म्हणून बंदिनी आहोत, क्षुद्र आहोत, असहाय आहोत आणि नीचतम आहोत, ही त्या काळात प्रत्येक बाईच्या मनात आणि जीवनात स्पष्ट जागी असणारी जाणीव संतांमुळे मालवली. संतांनी देवापाशी स्त्री-पुरुष भेद नाही, असं आश्वासन दिलं म्हणून जनीसारखीला आपलं स्त्रीपण स्वाभाविकपणे स्वीकारता आलं, ‘स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उदास’ अशी एक समजूत मिळाली.
या समजुतीनं जनीचं स्त्रीपण फार मनोज्ञ केलं आहे. तिच्या अभंगांमधून ते सारखं जाणवतं. असं वाटतं की, पुरुष जाणतो, पण ते बुद्धीनं जाणतो. बाई जाणते ती हृदयानं जाणते. जनीची प्रगल्भता आणि तिचं शहाणपण हे काही पुस्तकांतून आलेलं, शिक्षणातून आलेलं शहाणपण नव्हे. ते तिच्या जगण्यातून, तिच्या अनुभवांतून, तिच्या बाईपणातून आलेलं शहाणपण आहे.
ती एक शहाणी, बुद्धिमान, प्रतिभावंत आणि अनुभवी अशी बाई आहे. ती बाई आहे म्हणून विठ्ठलाला लेकुरवाळा झालेला पाहते. ती बाई आहे म्हणून त्याला ‘माझे अचडे बचडे’ म्हणून कौतुकानं कुरवाळते. ती बाई आहे म्हणून ‘विठ्या, अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या’ असं त्याला प्रेमानं रागे भरते. ती बाई आहे म्हणून रात्री शेज सजवून त्याची वाट पाहते. आणि ती बाई आहे म्हणून ‘पुरे पुरे रे विठ्ठला, जनीचा अंतरंग धाला’ असा तृप्तीचा उद्गार काढते.
तिच्या बाईपणाचा सर्वात उत्कृष्ट उद्गार मात्र विठूसाठी नाही. तो ज्ञानदेवांसाठी आहे. कदाचित ज्यांच्यासाठीच्या खर्याखुर्या कळवळ्यानं ज्ञानदेवांनी मराठी गीताभाष्याचा अट्टहास केला, त्या स्त्री-शूद्रांची ती प्रतिनिधी आहे म्हणून असेल, किंवा कदाचित त्या विलक्षण प्रज्ञावंताचं कोवळं वय तिच्यातल्या प्रौढ, जाणत्या बाईला विसरता येत नसेल, किंवा कदाचित- काय असेल सांगता येत नाही, पण ज्ञानदेवांविषयीची आपली आंतर-ओल व्यक्त करताना जनीनं लिहिलं आहे-
‘मरोनिया जावे । बा माझ्या पोटी यावे’
पुढच्या जन्मी माझ्या पोटी ये ज्ञानदेवा ! अविवाहित, एकट्या जनीचे हे विलक्षण उद्गार तिच्या बाईपणाच्या आंतरसालीमधला जो कोवळा गाभा प्रकट करतात, त्या गाभ्यातला तुळस मंजिर्यांसारखा निळासावळा अंधार मी इतर कुठे कधी पाहिलेलाच नाही.
(संपादित)
लेखिका : अरुणा ढेरे
संग्राहक : अनिल कुमकर
प्रस्तुती : मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈