श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आयुष्यात कोणतेही प्रसंग कोणत्याही घटना कधीच विनाकारण घडत नसतात. त्याला कांही एक कार्यकारणभाव असतोच.माझी बहिण आणि मेव्हणे दोघांनीही मला एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधे नाव नोंदवायला प्रवृत्त करणंही याला अपवाद नव्हतं याचा थक्क करणारा प्रत्यय मला लवकरच येणार होता!)

खरंतर अशा विशिष्ट कार्यकारणभाव असणाऱ्या पण त्या त्या क्षणी चकवा देत अकल्पितपणे घडत रहाणाऱ्या प्रसंगांनीच आयुष्य आकाराला येत असतं.ते सगळे क्षण आपण नेमके कसे स्विकारतो यावरच आपलं हेलपाटणं किंवा सावरणं अवलंबून असतं.मी त्याक्षणी आयुष्यात अशा वळणावर उभा होतो,की एखादीही नकारात्मक घटना स्विकारण्याची माझी मानसिक तयारीच नव्हती.पण अगदी कोणत्याही क्षणी घडू शकतील असे माझ्या ‘त्या’च्यावरील श्रद्धेची कसोटी पहाणारे अनेक प्रसंग मात्र वाटेत दबा धरुन बसलेले होतेच.मला ते ज्ञात नसल्यामुळेच केवळ मी अज्ञानातल्या सुखात निश्चिंत होतो!

दुसऱ्या दिवशी बहीण आणि मेव्हण्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी दोन दिवस उन्हात हेलपाटे घालून मुंबईतल्या एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधे नाव नोंदवलं. फॉर्म भरताना पत्रव्यवहाराचा पत्ता अर्थातच बहिणीचा दादरचाच दिला होता.

मुंबईतल्या कडक उन्हात मी दोन दिवस घातलेल्या त्या हेलपाट्यांमुळे किंवा मुंबईतल्या बदललेल्या हवापाण्यामुळेही असेल मला अचानक खूप ताप भरला. सलग तीन दिवस डाॅक्टरांचं औषध घेतल्यानंतर तो हळूहळू उतरला तरी अशक्तपणा जाणवत होताच.मन तर मरगळूनच गेलं होतं. अगदी बहिण झाली तरी तिच्यावर असं ओझं बनून पडून रहाणं मला नको वाटतं होतं.एखादा चमत्कार घडावा तसा मनात भरुन राहिलेला तो अंधार अचानक नाहीसा होऊन लख्ख प्रकाश जाणवला तो माझ्या मोठ्या भावाकडून आलेल्या अनपेक्षित टेलिग्राममुळे!

इस्लामपूरला भावाच्या बि-हाडी स्टेटबॅंकेने पाठवलेलं माझं अपाॅईंटमेंट लेटर येऊन पडलं होतं.त्यानुसार जाॅईन व्हायला पंधरा दिवसांची मुदत होती.भावाने तत्परतेने ते काॅललेटर रजिस्टर पोस्टाने दादरच्या पत्त्यावर पाठवून दिल्याची ती तार होती!

माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही.नकारात्मक विचारांनी मलूल झालेलं मन एकदम उल्हसित झालं.पिसासारखं हलकं होऊन हवेत तरंगू लागलं.मनाच्या उभारीमुळे अंगातला अशक्तपणा कुठल्याकुठे पळून गेला.

मी मुंबईला यायला निघाल्यापासूनच्या काळात घडलेली ही पहिलीच सुखद घटना न् तीही अशी अनपेक्षित. त्यामुळे ती मनाला उभारी देत होती आणि मला पूर्णत: निश्चिंतता!

भावाने पाठवलेलं रजिस्टर मिळालं त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यातलं काॅल लेटर घेऊन मी स्टेट-बँकेच्या स्टाफ डिपार्टमेंटमधे जाऊन भेटलो तो ‘गुरुवार’ होता!हा योगायोग मला दिलासा देत मनावरचं अनामिक दडपण थोडं दूर करणाराच होता.बॅंकेच्या मेडिकल आॅफीसरना ऍड्रेस केलेलं माझ्या मेडिकल टेस्टसाठीचं पत्र आणि स्टेट बॅंकेच्या वरळी ब्रॅंचला जॉईन होण्यासाठीचं कॉल लेटर तयार होईपर्यंत मला बसायला सांगण्यात आलं.ती दहाएक मिनिटं मी खूप रिलॅक्स होतो. आई-बाबा,भाऊ सगळ्यांची अतिशय तिव्रतेने आठवण झाली.  आणि त्यांना हे सगळं सांगण्यासाठी मी आतूर होऊन गेलो.मोबाईल खूप दूरची गोष्ट,तेव्हा घरोघरी टेलिफोनही नसायचे.पत्र हे एकच संपर्काचं साधन. त्यामुळे घरच्या आठवणींसोबत उलटसुलट विचार मनात गर्दी करीत होते.भावाचा विचार मनात आला आणि आठवण झाली ती त्याने पूर्वी याच विषयीच्या गप्पांच्या ओघात मला सांगून ठेवलेल्या एका गोष्टीची. ती आठवताच मी क्षणभर साशंक झालो. इथले मेडिकल ऑफिसर कुणी ख्रिश्चन डॉक्टर होते. ते अतिशय स्ट्रीक्टच नव्हे फक्त तर खडूसच होते म्हणे. त्यांना व्यवस्थित फेस करणं महत्त्वाचं होतं. मी याच सगळ्या विचारात दंग असतानाच माझ्या हातात माझ्या मेडिकल टेस्टसाठीचं आणि माझं पोस्टींगचं अशी दोन्ही पत्रे देण्यात आली. मेडिकल टेस्टचं पत्र पाहिलं आणि मला आश्चर्यचा धक्काच बसला. पत्र त्या कुणा ख्रिश्चन मेडिकल आॅफीसरच्या नावे नव्हतं तर चक्क ‘डॉ.आनंद लिमये’ यांना ऍड्रेस केलेलं होतं! नेहमीचे ते खडूस मेडिकल-ऑफिसर रजेवर होते म्हणे.म्हणून त्यांच्या जागी  पॅनलवर नाव असणारे हे  डॉ.आनंद लिमये त्यांचा तात्पुरता कार्यभार सांभाळत होते!मला माझ्या मेडिकल टेस्टसाठी त्यांच्याच क्लिनिकमधे जायचं होतं.माझ्या मोठ्या भावाचं नावही आनंद लिमयेच. मनाला थक्क करणारा हा योगायोग निदान त्याक्षणी तरी मला एक शुभसंकेतच वाटला होता! मेडिकल टेस्टचं दडपण क्षणार्धात विरूनच गेलं.आता यापुढं आयुष्यात हवं ते मिळवण्यापासून मला कुणीही रोखू शकत नाही ही कल्पनाच अतिशय सुखकारक होती.मी लगेचच डॉ.आनंद लिमये यांना भेटलो.तो शुक्रवार होता.मेडिकल टेस्ट फॉरमॅलिटीज् पूर्ण होऊन मी संध्याकाळी उशिरा घरी परत आलो.माझं पोस्टींग वरळी ब्रॅंचला झालेलं असल्याने मेडिकल रिपोर्ट ते दुसऱ्या दिवशी  परस्पर वरळी ब्रँचलाच पाठवणार होते जिथे मला सोमवारी जॉईन व्हायचं होतं !

दुसऱ्या दिवशीचा रविवार हा माझ्या आयुष्यातला आरामाचा अखेरचा दिवस ही कल्पनाच उत्साहाला उधाण आणणारी होती.त्यानंतर माझं अतिशय धावपळीचं, जबाबदारीचं नवं आयुष्य सुरु होणार होतं!मुंबईला येण्यासाठी घर सोडतानाची अस्वस्थता आणि अनिश्चितता यांचा लवलेशही आता मनात नव्हता.सगळा संघर्ष संपला होता आणि मी जणूकाही प्रशस्त

प्रकाशवाटेच्या उंबरठ्यावर उभा!तो उंबरठा ओलांडून त्या वाटेवर पहिलं पाऊल टाकणंच काय ते बाकी होतं!आता घरची जबाबदारी मी उचलू शकणार होतो.मोठ्या भावाच्या डोईवरचं ओझं मला हलकं करता येणार होतं.सर्वार्थानं  सर्वानाच दिलासा देणारं हे अनोखं वळण माझ्यासाठी ‘त्या’नं मला दिलेलं वरदानच होतं जसं कांही. आयुष्य इतकं सरळ सोपं असू शकतं याचा असा आनंददायी  अनुभव मी आयुष्यात प्रथमच घेत होतो. मनात होता फक्त आनंद,उत्साह आणि नवं कार्यक्षेत्र,तिथली माणसं,कार्यपध्दती,नवा अनुभव या सगळ्याबद्दलची आतूर उत्सुकता..! पण…? पण हे सगळं माझ्यासाठी अळवावरचं पाणीच ठरणार आहे अशी पुसटशी शंकाही तेव्हा माझ्या मनात आलेली नव्हती!आयुष्य इतकं सरळ सोपं नसतं याचा धक्कादायक प्रत्यय माझ्यावर आघात करायला टपून बसला होता हे हातून सगळं निसटून गेल्यानंतरच मला समजणार होतं.अगदी होत्याचं नव्हतं झाल्यानंतर!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments