डॉ. माधुरी जोशी
कवितेचा उत्सव
☆ कवितेला…. 🖋️✍️अ ते ज्ञ🎼 ☆ डॉ. माधुरी जोशी ☆
कुठे मनात शब्द साठतात
सहज सुंदर सजत राहतात
हातात हात घालून ओळ करतात
आणि पेनातून झर झर झरतात
कधीतरी काहीतरी वाचलेलं
कधीतरी काहीतरी अनुभवलेलं
अचानक उसळी मारत वर येतं
आणि मनात रिंगण धरतं
कसे शब्द ओळीनं चपखल बसतात
आपली आपली जागा ठरवतात
त्यांना आपसूक कळतात वृत्त,छंद
माझ्या नकळत सुंदर व्यक्त होतात
मी काहीच ठरवलेलं नसतं
मी खूप काही अभ्यासलेलंही नसतं
तरी शब्द कुठूनअचानक सामोरे येतात
सुंदर कवितेची वस्त्र पांघरतात
वाचणारे म्हणतात
तुम्ही छान कविता करता
देवाला हात आपोआप जोडले जातात
© डॉ.माधुरी जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈