? वाचताना वेचलेले ?

☆ “डिफॉल्ट मोड म्हणजे काय ?” – लेखक : डॉ. यश वेलणकर ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

तुम्ही तुमच्या बोक्याला, कुत्र्याला किंवा बैलाला मधुमेह, हायपरटेन्शन किंवा थायरॉइडचा त्रास होतो आहे, असे पाहिले आहे का?

तशी शक्यता खूप कमी आहे. माणसात मात्र हे आजार खूप वेगाने वाढत आहेत. त्याचे एक कारण आहे. आपल्या मेंदूतील एक ठरावीक भाग सतत काम करीत असतो. माणूस शांत बसलेला असतानादेखील हा भाग शांत होत नाही. हे सतत मनात येणारे विचार आपल्याला युद्धस्थितीत ठेवीत असतात. त्यामुळेच मानसिक तणाव वाढतो आणि आपल्याला वरील सर्व आजार होतात.

आपण शांत बसलेले असतानादेखील मेंदूतील जो भाग काम करीत असतो, त्याला शास्त्रज्ञांनी ‘डिफॉल्ट मोड नेटवर्क’असे नाव दिले आहे.

कॉम्प्युटर सुरू केला, की याच मोडमध्ये तो सुरू होतो. माणसाचा मेंदू हा सुपर कॉम्प्युटर आहे. त्यामध्येही ठरावीक भाग असा असतो, जो आपण गाढ झोपेतून जागे झाल्याक्षणी काम सुरू करतो.

डिफॉल्ट मोड नेटवर्क हा शब्द २००१ साली प्रथम वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉ. मार्कस राय्चल यांनी वापरला. माणूस कोणतीही कृती करीत नसताना, विचारात मग्न असताना मेंदूतील हा भाग सक्रिय असतो; पण तो एखादी कृती लक्षपूर्वक करू लागला की, या भागातील सक्रियता कमी होते, असे त्यांनीच दाखवून दिले.

आपण कोणतेही शारीरिक काम करीत नसतो किंवा एखादे काम यांत्रिकतेने करीत असतो, त्यावेळी मेंदू विचारांच्या आवर्तात बुडालेला असतो. एका विचारातून दुसरा विचार अशी ही साखळी चालू राहते, शरीर स्थिर असले तरी मन इतस्तत: भटकत असते.

आपला मेंदू भूतकाळातील आठवणीत किंवा दिवास्वप्ने पाहण्यात गुंतलेला असतो. त्यासाठीच मेंदूत ऊर्जा वापरली जात असते. विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे महत्त्वाचे काम आहे; पण ते काम सतत होत राहिले तर मेंदू थकतो, कंटाळतो, नैराश्याचा शिकार होतो.

मेंदूतील या भागाला विश्रांती कधी मिळते, माहीत आहे?

माणूस एखादी शरीर कृती लक्ष देऊन करू लागतो किंवा तो शरीराने काम करीत नसला तरी माइंडफुल असतो, सजग असतो त्यावेळी मात्र हा भाग शांत होतो आणि टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क (टीपीएन)सक्रिय होते. श्रमजीवी माणसात ज्यावेळी त्यांचे त्यांच्या कामावर पूर्ण लक्ष असते. त्यावेळी डिफॉल्ट मोड नेटवर्कला थोडी विश्रांती मिळते.

कुंभार त्याचे मडके तयार करीत असतो, त्यावेळी त्याच्या मेंदूतील हा मोड बदलला जात असतो. कारण मडके करण्याच्या कृतीवर त्याला एकाग्र व्हावे लागते.

बुद्धिजीवी माणसात मात्र असे होत नाही. शिकवताना, हिशेब करीत असताना किंवा कॉम्प्युटरवर काम करीत असताना मेंदूत विचार असतातच. किंवा तुम्ही मिक्सरमध्ये चटणी वाटत असता, त्यावेळी मेंदूतील विचार चालूच राहतात आणि डिफॉल्ट मोड काम करीतच राहतो. मग त्याला विश्रांती कशी मिळेल?

सजगतेने आपण ज्यावेळी श्वासामुळे होणारी छाती किंवा पोटाची हालचाल जाणतो किंवा त्याक्षणी येणाऱ्या बाह्य आवाजावर लक्ष केंद्रित करतो, त्यावेळी डिफॉल्ट मोड शांत होतो. माणूस श्वासाचा स्पर्श जाणू लागतो, त्यावेळी त्याच्या मेंदूतील टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क काम करू लागते.

आपल्या मेंदूच्या लॅटरल प्रीफ्रन्टल कॉरटेक्समध्ये लक्ष केंद्रित करणारे केंद्र असते, ते यामुळे सक्रिय होते. श्वासामुळे होणारी छातीची किंवा पोटाची हालचाल तुम्ही जाणत असता, त्यावेळी मेंदूतील इन्सूला नावाचा भाग सक्रिय होतो आणि डिफॉल्ट मोड शांत होतो. मन काही क्षण वर्तमानात राहते, त्यावेळी मेंदूतील विचार करणाऱ्या भागाला विश्रांती मिळते.

विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे वैशिष्ट्य आहे; पण सतत येणारे विचार मेंदूला थकवतात. तो थकवा दूर करण्यासाठी काही काळ हा ‘डिफॉल्ट मोड’ बदलणे आवश्यक आहे.

त्यासाठीचा एक साधा उपाय हे करून पहा:

शांत बसा. एक हात छातीवर, दुसरा पोटावर ठेवा. तुम्ही काहीही करीत नसलात तरी तुमचे शरीर श्वासोच्छ्वास करते आहे. त्यामुळे छाती किंवा पोट हलते आहे. तुमचे सर्व लक्ष तुमच्या हातांवर ठेवा आणि नैसर्गिक श्वासामुळे छाती अधिक हलते आहे की पोट हे जाणा.

ज्यावेळी ही हालचाल समजते, त्यावेळी तुमच्या मेंदूतील डिफॉल्ट मोड शांत झालेला असतो, त्याला विश्रांती मिळत असते. जो श्वास तुम्हाला समजतो, तो चांगला श्वास, गुड ब्रेथ.

असा गुड ब्रेथ मेंदूला ताजेतवाने करतो. दिवसभरात किमान तीन-चार वेळा श्वासाची हालचाल जाणायची असे ठरवता येईल?

अर्धा मिनिट, एक मिनिट, पाच – दहा श्वास, त्यावर लक्ष केंद्रित केलेत, की मेंदूतील डिफॉल्ट मोडला विश्रांती मिळून तुम्ही ताजेतवाने व्हाल. किती साधा आणि सोपा उपाय आहे!

फक्त त्याची आठवण होणे थोडेसे अवघड आहे. दर दोन तासांनी काही सजग श्वास घ्यायचे असा संकल्प करून त्यासाठी प्रयत्न करून पहा…

लेखक :डॉ. यश वेलणकर

प्रस्तुती :श्रीमती राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments