श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ आणखी एक कोवळा अभिमन्यू ! – भाग-१ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
परमवीर अरूण खेतरपाल !
सेना सीमेवर युद्धावर जायला सज्ज आहे. युद्ध तर निश्चितच होणार आणि घनघोर होणार ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेघच जणू. सैनिकाच्या आयुष्यात युद्ध म्हणजे एक महोत्सवच. आणि हा महोत्सव काही नेहमी नेहमी येत नाही. प्रत्येक सच्च्या सैनिकाला हा अनुभव घ्यायचा असतोच….’अॅक्शन’ पहायची असते….मर्दुमकी गाजवायची असते. आणि हे करताना धारातीर्थीही पडायची तयारी असते. सेकंड लेफ़्टनंट अरूण खेतरपाल साहेब (१७,हॉर्स रेजिमेंट) सुद्धा याला अपवाद नव्हते.
सैनिकी प्रशिक्षण संपवून अरूण नुकतेच या रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते. वर्ष १९७१. प्रशिक्षणत अव्वल दर्जा प्राप्त केलेला असला तरी प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव नव्हता आणि असणार तरी कसा?
सेकंड लेफ्टनंट अरूण यांना आपली रेजिमेंट युद्धाला निघाली आहे आणि आपल्याला मात्र सोबत नेले जाणार नाही, याचं फार मोठं दु:ख झालं. पण लष्करी नियम होता. अनुनभवी अधिका-याला थेट सीमेवर तैनात करणं म्हणजे प्रत्यक्ष मोहिमेला आणि त्या अधिका-यासोबतच त्याच्या नेतृत्वाखालील सैनिकांच्या जिवितालाही धोकाच की!
म्हणूनच सेनापतींनी या नव्या अधिकारी तरूणास काही महिन्यांच्या उच्चतर प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील अहमदनगर (रणगाडा प्रशिक्षण केंद्र) येथे पाठवायचा आदेश दिला होता..अन्य अशाच अधिका-यांसोबत.
सेकंड लेफ्टनंट त्यांचे कमांडींग ऑफिसर लेफ्टनंट जनरल हनुत सिंग साहेबांच्या समोर उभे राहिले. डोळ्यांत पाणी. चेह-यावर अत्यंत अजीजीचे भाव. म्हणाले,”साहेब, आपली रेजिमेंट युद्धला निघालीये. आणि मला सोबत नेले जात नाहीये. युद्धाची ही संधी माझ्या संपूर्ण कारकीर्दीत पुन्हा येईल,याची खात्री नाही. साहेब,मला युद्धावर जायचे आहे….नाही म्हणू नका!”
सेनापतींनी अरूण यांना परोपरीने समजावून सांगितले. पण अरूण यांच्या डोळ्यांतील भाव,देशसेवेची प्रचंड भावना पाहून ते ही नरमले. पण त्यांनी एक अट घातली. रेजिमेंट सीमेवर जाण्यास आणखी काही दिवसांचा अवधी होता. ज्या उच्चतर प्रशिक्षणासाठी अरूण यांना पाठवण्यात यायचे होते, त्या प्रशिक्षणातील एक अल्पकालीन नमुना अभ्यासक्रम त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखवायचा होता. अरूण यांच्यासाठी एक खास प्रशिक्षण सत्र आयोजित केले. अरूण यांनी जीवाचे रान करून हे प्रशिक्षण पूर्ण केले. महाभारतात अभिमन्यूने असा हट्ट केला होता. स्वत: सेनापतींनी, लेफ्टनंट जनरल हनुतसिंग साहेबांनी अरूण त्यांची कसून परीक्षा घेतली…..सेकंड लेफ्टनंट अरूण खेतरपाल या परीक्षेत उच्च श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले…..आणि त्यांची युद्धावर जाण्यासाठी निवड झाली…..एका आधुनिक अभिमन्यूचा हट्ट असा प्रत्यक्षात उतरत होता….१९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाचं महाभारत पुढं घडणार होतं…आणि हा अभिमन्यू कौरवांचं चक्रव्यूह भेदणार होता!
क्षेत्रपाल या शब्दाचं अपभ्रंशित रूप म्हणजे खेतरपाल. भूमीचे रक्षण करणारे असा या शब्दाचा शब्द्श: अर्थ घेता येईल. प्रभु श्रीरामाशी नाते सांगणा-या आणि खेतरपाल असं आडनाव लावणा-या एका वंशात हे आडनाव सार्थ करणारा एक वीर जन्माला आला….अरूण त्याचं नाव. १४,ऑक्टोबर,१९५० रोजी पुण्यात ब्रिगेडीअर एम.एल.खेतरपाल साहेबांच्या पोटी अरूण यांचा जन्म झाला. आणि १३ जून, १९७१ रोजी त्यांची १७,पुना हॉर्स रेजिमेंट मध्ये सेकंड लेफ्टनंट या पदावर नियुक्ती झाली. ही रेजिमेंट रणगाडा युद्धासाठी जगप्रसिद्ध आहे.
पाकिस्तानकडे त्यावेळचे अत्यंत बलशाली पॅटन रणगाडे होते. त्यांचं रणगाडा युद्धदळही अतिशय आक्रमक होते. १९६५च्या लढाईत त्याची चुणूक दिसली होती. पाकिस्तान हे रणगाडे भारतीय हद्दीत घुसवण्याच्या पूर्ण तयारीनिशी युद्धात उतरल्याची कुणकुण भारतीय सैन्याधिका-यांना होतीच. पाकिस्तानला रोकलं गेलं नसतं तर युद्धाचं पारडं निश्चितपणे पाकिस्तानच्या बाजूने झुकलं असतं आणि ते भारताला परवडणारं नव्हतं. आणि भारतीय सेना असं काही होऊ देणार नव्हती…भले त्यासाठी कितीही मोठी किंमत द्यावी लागली तरी!
सीमेवरील शकरगढ येथील बसंतर नदीच्या पुलापर्यंत पोहोचण्यासाठी व त्यावरून रणगाडे पलीकडे नेण्यासाठी एक मोठा भराव टाकण्याचे आदेश पायदळाच्या ब्रिगेडला देण्यात आले….त्यांच्यासोबत १७,पुना हॉर्स रेजिमेंटही होतीच. १५ डिसेंबर,१९७१च्या रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत पायदळाने आपले काम चोख पूर्ण केले. आता शत्रूने रस्त्यात पेरलेले भूसुरुंग शोधून ते निकामी करण्याची जबाबदारी इंजिनिअर्स दलाकडे सोपवली गेली. पण हे काम अत्यंत काळजीपूर्वक करत पुढे जावे लागते. अर्थात यातील धोका लक्षात घेता वेळ हा लागतोच. पण तरीही त्वरा करावी लागत होती…पाकिस्तानी रणगाडे या पुलापर्यंत कोणत्याही क्षणी पोहोचणार होते…त्यांच्या आधी आपले रणगाडे त्यांना सामोरे जाणे गरजेचे होते. आणि भूसुरुंग निकामी करण्याचे काम तर अजून तसे निम्मंच झालं होतं. आता थांबायला वेळ नव्हता…कमांडींग ऑफिसर लेफ्टनंट जनरल हनुतसिंग साहेबांनी त्या भुसुरुंगांनी भरलेल्या रस्त्यातून आपल्या सैन्याला पुढे चाल करण्याचे आदेश दिले…यात सेकंड लेफ्टनंट यांच्या नेतृत्वातील एक रणगाडा तुकडीही होतीच. सुमारे सहाशे मीटर्सचा हा प्रवास. जीवावर उदार होऊन सैन्य पुढे निघाले….आणि दैवाची कमाल म्हणावी…एकही भुसुरुंग उडाला नाही! त्यारात्री सर्व तुकडी पुलापर्यंत सुरक्षित पोहोचली! आता प्रतीक्षा होती ती शत्रूने आडवं येण्याची.
१६ डिसेंबर,१९७१..सकाळचे आठ वाजलेले आहेत….युद्धभूमी तशी शांत भासते आहे खरी पण ही तर वादळाआधीची भयाण शांतता. पाकिस्तानकडून तोफांचा भडीमार होऊ लागला…..आणि तोफगोळ्यांनी उडवलेल्या मातीच्या धुरळ्याच्या आडोशांनी पाकिस्तानी रणगाडे पुढे सरसावलेही!
रणगाडे भारतीय सैन्यावर तुफान हल्ला चढवू लागले. त्यांना जारपाल या ठिकाणी काहीही करून पोहोचायचं होतं…आणि यात जर ते यशस्वी झाले असते तर भारतीय सैन्य मोठ्या संकटात सापडणार होतं…कदाचित युद्धाचा निकालच इथे स्पष्ट झाला असता!
भारताची बी स्क्वाड्रन या चकमकीत संख्येने कमी पडू लागली…पाकिस्तानी संख्येने खूपच जास्त होते. बी स्क्वाड्रनने मागे असलेल्या इतर तुकड्यांना मदतीसाठी येण्याचं आव्हान केलं. हे आव्हान कानी पडताच आपले दोन रणगाडे आणि सैनिक-तुकडी घेऊन अरूण खेतरपाल युद्धभूमीकडे आवेशात धावले. प्रचंड गोळीबाराच्या वर्षावातही अरूण खेतरपाल शत्रूवर थेट समोरासमोर चालून गेले. पाकिस्तानने उभारलेल्या तोफ चौक्यांवरून गोळीबार होत होता..त्याच चौक्या अरूण साहेबांनी पादाक्रांत केल्या…त्यांची शस्त्रं ताब्यात घेतली….पिस्तुलाच्या धाकावर पाकिस्तानी सैनिक कैद केले! या चकमकीत अरूण साहेबांच्या रणगाड्याचा कमांडर हुतात्मा झाला…असे असूनही अरूण साहेबांनी एकट्याने प्रतिहल्ला जारीच ठेवला. पाकिस्तानी रणगाडे माघारी पळू लागले…अरूण साहेबांनी त्यांचा पाठलाग सुरुच ठेवला…पळून जाणारा एक रणगाडा अरूण साहेबांनी अचूक उध्वस्त केला!
अरूण साहेबांच्या अंगात वीरश्रीचा संचार झाला होता…त्यांना कशचीही पर्वा नव्हती राहिली. त्यांच्या वरीष्ठांनी मोठ्या मुश्किलीने त्यांना पुढे जाण्यापासून परावृत्त केले. या मोठ्या युद्धातील एक चकमक आपण जिंकली होती…युद्ध अजून बाकी होतंच. शत्रू त्याच्या सवयीनुसार आधी शेपूट घालून पलायन करतो आणि संधी साधून पुन्हा माघारी येतो…हा आजवरचा इतिहास!
शत्रू पुन्हा आला…मोठ्या तयारीनिशी. आता त्यांचे लक्ष्य होते ते अरूण खेतरपाल साहेब आणि इतर दोन अधिकारी यांच्या तुकड्या. कारण भारतीय हद्दीत घुसण्यात त्यांच्यासमोर हेच मोठे अडथळे होते.
रणगाडे एकमेकांवर आग ओकू लागले. भारताने पाकिस्तानचे दहा रणगाडे अचूक टिपले..त्यातील चार तर एकट्या अरूण साहेबांनी उडवले होते.
आपल्या तीन रणगाड्यांपैकी दोन रणगाडे निकामी झाले होते…एकावर मोठा रणगाडा-तोफगोळा आदळला होता तर एक रणगाडा नादुरूस्त झाला होता. अरूण साहेबांच्या रणगाड्याला तर आगीने वेढले होते. पण हाच एकमेव रणगाडा होता जो शत्रूला रोखू शकणार होता.
तोफ नादुरूस्त झालेल्या रणगाड्याच्या प्रमुखांनी कॅप्टन मल्होत्रा साहेबांनी कमांडींग ऑफिसर हनुतसिंग साहेबांकडे हा रणगाडा दुरूस्तीसाठी माघारी आणण्याची परवानगी मागितली. पण युद्धक्षेत्रातून आपला रणगाडा मागे सरतो आहे, हे दृश्य मागील सर्व सैनिकांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम करणारे ठरले असते. आणि लढाईत सर्वांत महत्त्वाचे असते ते सैनिकांचे मनोबल….शस्त्रांपेक्षा ती शस्त्रे चालवणारी मने मजबूत असावी लागतात.
– क्रमशः भाग पहिला
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈