श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ अंतर दृष्टिकोनातलं ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
हिंदीमध्ये ‘ दृष्टिकोन ‘ या मराठी शब्दासाठी ‘ नजरिया ‘ असा एक छान शब्द आहे. नजर आणि नजरिया यात फरक आहे. नजर म्हणजे दृष्टी आणि नजरिया म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन किंवा विचार करण्याची दिशा. त्यावरून एक सुंदर आणि प्रेरणादायी वाक्य आहे. ‘ नजर बदलो, नजारे बदल जायेंगे, सोच बदलो सितारे बदल जायेंगे, कश्तियाँ बदलने की जरुरत नहीं, दिशा बदलो, किनारे खुद-ब-खुद बदल जायेंगे. ‘
या वाक्याची आठवण येण्याचं कारण म्हणजे दोन वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन करत असताना, त्यातील काही प्रसंग वाचून मनात उठलेली विचारांची वादळं. त्या दोन गोष्टींनी मनाला अगदी हलवून सोडलं. व पु काळेंचं ‘ माझं माझ्यापाशी ‘ या नावाचं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. ते वेळ मिळाला की मी अधूनमधून वाचत असतो. या पुस्तकात ‘ अमर चित्रपट ‘ या नावाचा एक लेख आहे. त्यात ‘ प्रभात ‘ चित्रपट निर्मित १९३७ सालच्या ‘ कुंकू ‘ चित्रपटाबद्दल अतिशय मूलभूत विचार वपुंनी मांडले आहेत. दुसरं पुस्तक मी सध्या वाचतो आहे त्याचं नाव आहे ‘ आश्रम नावाचं घर : कहाणी श्रद्धानंद महिलाश्रमाची ‘. अचला जोशी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. आधी या दोन घटना कोणत्या ते जाणून घेऊ या.
आजच्या काळात बालाजरठ विवाह होत नाही पण काही वर्षांपूर्वी असे विवाह सर्रास होत असत. बालाजरठ विवाह म्हणजे एखाद्या अगदी कोवळ्या लहान मुलीचे लग्न साठ सत्तर वर्षाच्या वृद्धाशी लावणे. नाटककार गो ब देवल यांचं ‘ संगीत शारदा ‘ हे नाटक याच विषयावर आधारित आहे. ‘ कुंकू ‘ या व्ही शांताराम दिग्दर्शित चित्रपटात हाच विषय हाताळला आहे पण जरा वेगळ्या पद्धतीने. ‘ कुंकू ‘ चित्रपटाची सुरुवातच लहान मुले नाटकाचा खेळ खेळतात आणि त्यात एक सात आठ वर्षांची मुलगी संगीत शारदा मधील शारदा बनते. एक दहा बारा वर्षांचा मुलगा दाढी मिशा लावून वृद्ध बनतो. शारदेचा विवाह या वृद्धाशी लावून देण्याचा प्रसंग येतो, तेव्हा ही चिमुरडी मुलगी मी म्हाताऱ्याशी लग्न करणार नाही असं ठणकावून सांगते. तिला मग इतर मुलं सांगतात की अगं, हे नाटक आहे. नाटकापुरती भूमिका करायची. पण नाटक म्हणून सुद्धा ती वृद्धाशी लग्न करायला सुद्धा नकार देते. मग पुढे चित्रपटातील कथा सुरु होते. चित्रपटातील नीरा नावाच्या नायिकेचा विवाह तिचा दारिद्र्याने गांजलेला आणि पैशाचा लोभी असलेला मामा वकील असलेल्या आणि ज्यांना सगळे काकासाहेब असे संबोधतात अशा एका वृद्धाशी लावून देतो.
नीरासुद्धा आपल्या मनाविरुद्ध झालेल्या या लग्नाबद्दल जणू बंड करून उठते. ती ग्रुप फोटो काढायच्या वेळी सुद्धा येत नाही. त्यावेळी तिचा मामा तिला म्हणतो, ‘ फोटोला सुद्धा आली नाहीस. तुला जराही लाज वाटली नाही का ? ‘ तेव्हा ती त्या मामांना, मामीला आणि ज्यांच्याशी लग्न झाले त्यांना खडे बोल सुनावते. ती म्हणते, ‘ एका लहान तरुण मुलीचा वृद्धाशी विवाह करताना, गरीब गायीला कसायाच्या गळ्यात बांधताना तुम्हाला लाज नाही वाटली ? ‘ ती आपल्या नवऱ्याला, काकासाहेबांना म्हणते, ‘ तुमच्या मुलीच्या\नातीच्या वयाच्या मुलीशी लग्न करताना तुम्हाला लाज नाही वाटली ? लाज तर तुम्हाला वाटायला हवी. ‘
ती आपल्या पतीच्या खोलीत त्याच्याबरोबर झोपायला जात नाही. घरातील मोठ्या बायकांचं सांगणं ऐकत नाही. तिचा तिच्या मनाशी आणि या सगळ्यांशी उघड संघर्ष सुरु आहे. त्या घरात पूर्वीच्या काळातील षट्कोनी आकाराचे एक टोल देणारे लंबकाचे घड्याळ दाखवले आहे. ते घड्याळ एकदा बंद पडलेले असते. तेव्हा काकासाहेब आपल्या वृद्ध नोकराला घड्याळाला चाबी दिली नाहीस का असे विचारतात. तो नोकर म्हणतो, ‘ मालक, ते घड्याळ बी आता माझ्यासारखंच म्हातारं झालं आहे. कितीबी चाबी द्या, कव्हा बंद पडंल त्याचा नेम न्हायी. ‘ हे वाक्य तो बोलतो स्वतःसाठी पण ते झोंबतात मात्र काकासाहेबांना. हे घड्याळ म्हणजे जणू काकासाहेबांच्या वृद्धत्वाचे प्रतीक.
चित्रपटात एक क्षण असा येतो की काकासाहेबांना आपल्या वागण्याचा पश्चाताप होतो. ते नीरेचं कुंकू आपल्या हातानं पुसतात. त्यावेळी नीरा देखील वाघिणीसारखी चवताळून उठते. आता कुंकू लावीन तर काकासाहेबांच्या हातूनच असा निश्चय ती करते. एखाद्याचं हृदयपरिवर्तन, विचारपरिवर्तन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तीच या चित्रपटात दाखवली आहे आणि तेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. शेवटी काकासाहेब नीरेच्या कपाळी कुंकू लावतात पण ते पित्याच्या मायेनं. मनातली वासना नष्ट झालेली असते. यावेळी समाज काय म्हणेल असा विचार करत असलेल्या नीरेला ते म्हणतात, ‘ कसला विचार करतेस या जगाचा ? ज्या जगाला एका तरुणीचा एका म्हाताऱ्याशी विवाह लावून देताना काही वाटलं नाही अशा जगाचा काय विचार करायचा ! पित्याच्या जागी असलेल्या वृद्धानं आपल्या तरुण बायकोला मुलगी समजून शुद्ध भावनेनं कुंकू लावलं हे जर चालणार नसेल तर अशा समाजाची काय पर्वा करायची ?
चित्रपटात शेवटी काकासाहेबांना आत्महत्या करताना दाखवलं आहे. मृत्यूपूर्वी ते आपल्या तरुण पत्नीला लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘ बाळ, माझ्या मृत्यूशिवाय तुझी सुटका होणं शक्य नाही हे मी जाणून आहे. माझ्या मृत्यूनंतर तो पुनर्विवाह करावास, तुला भरपूर संसारसुख मिळावं अशी माझी इच्छा आहे. त्याशिवाय माझ्या आत्म्याला शांतता मिळणार नाही. तुझा प्रेमळ पिता. ‘ इथे खरं तर चित्रपट संपतो पण खरा चित्रपट सुरु होतो तो आपल्या मनात. मनाला आतून हलवून टाकण्याची ताकद या चित्रपटातील घटनात आहे. व्ही शांताराम यांचं दिग्दर्शन तर अप्रतिम. वपुंनी या चित्रपटाबद्दल फार सुंदर आणि सविस्तर लिहिलं आहे. ते मुळातूनच वाचावं. ते वाचून मी हा चित्रपट आवर्जून पाहिला.
दुसरी घटना आहे ‘ आश्रम नावाचं घर ‘ या पुस्तकातली. श्रद्धानंद महिलाश्रमाची ही कहाणी आहे. या आश्रमाने अनेक निराधार स्त्रिया, विधवा, अन्याय, अत्याचाराने होरपळलेल्या स्त्रियांना आधार दिला आहे. अशा अनेक स्त्रियांच्या कहाण्या या पुस्तकात वाचायला मिळतात. त्यातीलच एक कृष्णाबाई. तिची कहाणी वाचून मी अस्वस्थ झालो आणि वाईटही वाटले. न कळत्या वयात म्हणजे वयाच्या केवळ नवव्या वर्षी कृष्णीचं लग्न एका मोठ्या एकत्र कुटुंबातील मुलाशी झालं. कृष्णेला न्हाण येण्यापूर्वीच मुदतीच्या तापानं तिचा नवरा वारला. माहेरची वाट बंदच होती. सासरच्यांनी तिच्यावर अनेक बंधनं लादली. तिला बाहेर जायलाच काय पण बाहेरच्या घरातही यायला बंदी केली. पण कृष्णी जसजशी वयात येऊ लागली,तशी घरातल्या कर्त्या पुरुषांनी तिच्यावर वाईट नजरेनं पाहायला सुरुवात केली. कधी सासूबाई चार दिवस बाहेरच्याला बसल्या तर सासरे तिला पाय चेपायला बोलावू लागले. एके दिवशी पाय चेपता चेपता त्यांनी दार बंद करून घेतलं. नंतर चुलत सासऱ्यांनी हाच कित्ता गिरवला. कृष्णीला सुरुवातीला जरा वेगळं वाटलं. अर्थात बरं वाईट कळण्याचं तिचं फारसं वय नव्हतं आणि जे काही घडत होतं त्यात तिचा दोषही नव्हता. पण तिने आपल्या सासूबाईंच्या कानावर ही गोष्ट घातली. पण घरातील कर्त्या पुरुषांसमोर बोलण्याची त्यांची प्राज्ञा नव्हती. पुरुष जे काही आपल्याला देतात ते मुकाट्यानं घ्यायचं असं त्यांनी कृष्णीला सांगितलं. तीस माणसांच्या एकत्र कुटुंबात ही गोष्ट कर्णोपकर्णी व्हायला कितीसा वेळ लागणार ? दिरांनीही तिचा फायदा घायला सुरुवात केली. लवकरच ती घरातल्या सर्वांची हक्काची मत्ता झाली. अशातच तिला दिवस राहिले. मग तिच्या सासऱ्यांनी तिला आश्रमात आणून सोडले. तेव्हा तिला नववा महिना लागला होता. बाळंत झाल्यावर मुलाला आश्रमातच सोडून सासरी परत यायला तिला सासऱ्यांनी बजावले होते.
आश्रमातील बाईंना तिची ही अवस्था पाहून वाईट वाटले. त्यांनी तिला समजावून सांगितले की बाळ तू इथेच निर्धास्तपणे राहा. इथे कोणीही तुला त्रास द्यायला येणार नाही. पण कृष्णीचा मनात परत जायचे होते. तिला त्या जीवनाची चटक लागली होती. बाईंनी तिला सांगितलं की तुझं रूप, वय साथ देतं आहे, तोपर्यंतच तुला सासरी विचारतील. एकदा का वय सरलं की मग तुझे हाल कुत्राही खाणार नाही. एके दिवशी कृष्णी प्रसूत झाली. तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. एका सकाळी कोणाला नकळत त्या बाळाला तिथेच टाकून कृष्णी पुन्हा आपल्या सासरी निघून गेली.
तसं पाहिलं तर या दोन घटनांचा परस्पर संबंध काही नाही. ‘ कुंकू ‘ चित्रपटातील नीरा आणि या महिलाश्रमात आलेली कृष्णी या दोघीही परिस्थितीच्या बळी ठरल्या. पण दोघींच्या आयुष्याला नंतर जे वळण मिळालं त्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. निराला बऱ्यावाईटाची जाण आहे. ती परिस्थितीचा बळी ठरली तरी आहे त्या परिस्थितीत जगण्याचे ती नाकारते. परिस्थितीविरुद्ध बंड करून उठते. तिच्या वागण्याने काकासाहेबांना सुद्धा आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. तिने पुन्हा लग्न करून तिचा संसार भविष्यात फुलावा यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचे समर्पण केलं. याउलट गोष्ट कृष्णीची आहे. ती जरी परिस्थितीची बळी ठरली आणि जे काही घडले त्यात तिचा दोष नसला, तरी मुळातच त्या नरकात आपले आयुष्य वाया घालवण्यापेक्षा काही वेगळा विचार ती करू शकली असती. तिला उर्वरित आयुष्य महिलाश्रमात घालवून स्वतःची प्रगती साधता आली असती. पुढे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहता आले असते. पण अशा प्रकारची उर्मीच तिच्या मनात उठत नाही. हा दृष्टिकोनातला फरक नीरा आणि कृष्णी यांच्यात आपल्याला दिसतो.
आहे त्या परिस्थितीत तसेच जगणे किंवा कसेबसे दिवस काढणे याला जगणं म्हणता येणार नाही. परिस्थितीशी संघर्ष तर सगळ्यांच्या नशिबी असतो. पण मी आहे त्याच परिस्थितीत राहणार नाही. स्वकष्टाने, प्रयत्नाने, बुद्धीने, जिद्दीने मी पुढे जायचा प्रयत्न करीन यातच मानवी जीवनाचे साफल्य आहे. मी जे कोणते काम करतो, ज्या कोणत्या पदावर आहे, त्यापेक्षा आणखी काही वर्षांनी मी नक्कीच पुढे गेलेलो असेन, मी काहीतरी नवीन शिकेन. ज्या परिस्थितीत मी जन्मलो, जगलो त्याच परिस्थितीत नक्कीच निवृत्त होणार नाही, त्याच परिस्थितीत नक्कीच मरणार नाही अशा प्रकारची दुर्दम्य आशा आणि जिद्द जो मनात बाळगतो, त्याच्या आयुष्याचे सोने होते. यातील आहे त्याच परिस्थितीत खितपत राहून आनंद मानणाऱ्या व्यक्तींची प्रतिनिधी कृष्णी आहे तर प्राप्त परिस्थितीशी संघर्ष करून पुढचं प्रगतीचं पाऊल टाकू पाहणाऱ्या व्यक्तींची प्रतिनिधी नीरा आहे. हा दृष्टिकोनातला फरक आहे. म्हणून त्या प्रसिद्ध हिंदी ओळी पुन्हा आठवतात. ‘ नजर बदलो, नजारे बदल जायेंगे, सोच बदलो सितारे बदल जायेंगे, कश्तीया बदलने की जरुरत नहीं, दिशा बदलो, किनारे खुद-ब-खुद बदल जायेंगे.’
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈