श्री सुनील देशपांडे
विविधा
☆ सावरकर समजून घेताना ☆ श्री सुनील देशपांडे ☆
(निमित्त २८ मे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती)
(सावरकरांच्या बाबत यापूर्वी मी दोन लेख लिहिले आहेत. त्याच मालिकेतील हा तिसरा लेख.)
खरं म्हणजे सावरकरांचे चरित्र म्हणजे ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक(?). त्यातील अंदमानातील तुरुंगवास संपेपर्यंतच(?). कारण अनेकांनी तेवढंच वाचलंय. सावरकरांच्या चरित्राला अंदमानातल्या सुटकेचे कुंपण घालून तेवढ्यावरच त्यांचा उदो उदो करणाऱेच जास्त. त्यानंतर त्यांनी हिंदू समाजातील अनेक दुष्प्रथांवर प्रचंड कोरडे ओढणाऱ्या समाजकार्याबद्दल किती जणांनी सविस्तर जाणून घेतलंय? सावरकर ब्रिटिशांच्या स्थानबद्धतेमुळे आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामधील उपेक्षित जीवनामुळे काहीच करू शकले नाहीत (?) अशा प्रकारचा एक मतप्रवाह असणारेच अनेक. सावरकरांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि त्यांची प्रभावी विचारसरणी ही समजून घेताना, आपले वाचन अथवा ज्ञान ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकापुरते (आणि आता सावरकर सिनेमा पुरते) मर्यादित असता कामा नये असे माझे मत आहे. सावरकरांना टोकाचे हिंदुत्ववादी बनवून त्यांचा हिंदुत्ववाद समजूनही न घेता त्यांना ईश्वरवादी समजणाऱ्या माणसांची संख्याच जास्त आहे असे मला वाटते.
परमेश्वराच्या अस्तित्वाला नाकारा. भजन पूजन करू नका. देवळे बांधू नका. धार्मिक विधी करू नका. धार्मिक परंपरा धरू नका, रूढी या माणसाला नष्टचर्याकडे नेणाऱ्या आहेत. कोणतीही प्रथा काल सुसंगत आणि कालमान परिस्थितीनुसार बदलता आली पाहिजे. श्रुती आणि स्मृती संपूर्णपणे नाकारणारा आणि त्यांच्या विरोधात प्रचंड लेखन करणारा. जातीयवाद आणि अस्पृश्यता यांच्याबाबत समाजाशी प्रचंड संघर्ष करणारा. दारू अथवा मांसाहार या गोष्टी चुकीच्या आहेत असे न मानणारा, अर्थात व्यसनाधीन होऊ नका हेही सांगणारा. असा एक जबरदस्त आधुनिक विचारांचा नास्तिक माणूस. याला परंपरावादी लोक हिंदू म्हणून तरी स्वीकारणार आहेत काय हाच मुळातला प्रश्न आहे. हिंदुत्ववादी आणि हिंदूहृदयसम्राट अशी बिरुदावली ज्यांना अर्पण केली आहे त्या सावरकरांना सर्व बाजूंनी समजून घ्यायचे असेल तर, त्यांच्या या विचारांना सुद्धा हिंदुत्वाचे विचार म्हणून स्वीकारले पाहिजे. हे स्वीकारणार आहात काय ? खरे तर त्यांना राष्ट्रनिष्ठसम्राट असे म्हणणे हेच जास्त संयुक्तिक आहे असे वाटते. स्थानबद्धतेत असताना सावरकरांनी प्रचंड मोठे समाजकार्य केले आहे.
पु ल देशपांडे यांनी एक छान वाक्य त्यांच्याबद्दलच्या व्याख्यानात सांगितलं आहे की ‘सावरकरांनी माझ्यावर फार मोठे उपकार केले ते हे की, त्यांनी मला नास्तिक बनवलं’ ह्या विचारांशी किती जण सहमत होतील मला शंका आहे.
त्यांचा मुळात राग किंवा वाद हा वर्षानुवर्षे अन्याय व अत्याचार करणारे आणि वर्षानुवर्षे अन्याय व अत्याचार सहन करणारे यांच्यातला वाद होता. मुस्लिमांच्या विरोधात त्यांनी फक्त एखादी व्यक्ती मुस्लिम आहे म्हणून त्यांचा द्वेष करावा असे सांगितलेच नाही. ज्यांच्या निष्ठा इथल्या भूमीशी प्रामाणिक आहेत ते मुस्लिम असले तरी, त्यांना मी हिंदूच म्हणेन असे ते म्हणत. त्यांचा मुळात आक्षेप मुस्लिम समाजाच्या निष्ठा जर आपल्या देशाबाहेरील कुठल्यातरी दुसऱ्या देशात वा देशाशी जोडल्या गेल्या असतील तर ते राष्ट्रनिष्ठ होऊ शकत नाहीत. अशा राष्ट्रविरोधी विचारांच्या व्यक्तींना विरोध करा. वर्षानुवर्षे ज्यांनी एतद्देशियांवर अन्याय आणि अत्याचार केले त्यांचे समर्थन करणार असाल तर तुम्ही राष्ट्रनिष्ठ नाही. मग तुम्ही हिंदू असला आणि अस्पृश्यांवर अत्याचार केले असतील आणि त्याचे समर्थक असाल तरीही तुम्ही हिंदू म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही. एवढे त्यांचे हिंदुत्व वेगळ्या टोकाचे होते. हे किती जणांना पटणार किंवा पचणार आहे हाच मुळातला प्रश्न आहे. या देशात ब्रिटिशांचे राज्य नसते तर ते कांही हिंदूंच्या विरोधात सुद्धा लढले असते. सावरकरांच्या मते राष्ट्रवाद हाच हिंदुत्ववाद. परंतु त्यांच्याच काही समर्थकांनी हे वाक्य उलटे करून हिंदुत्ववाद हाच राष्ट्रवाद असे बनवले.
अल्लाउद्दीन खिलजी जेव्हा हिंदूंच्या महिलांवर अत्याचार करत होता हिंदूंची देवळे नष्ट करीत होता त्या जागी मशिदी बांधीत होता हजारो हिंदूंना बाटवून धर्मांतरित करीत होता त्यावेळी तुमचा विठोबा ज्ञानेश्वरांची भिंत चालवत होता? हे वाक्य किती जणांना पचणार आहे?
एके दिवशी सेनान्हाव्याला बादशहाकडे जायला उशीर झाला. तेव्हा विठोबाने सेना न्हाव्याचे रूप घेऊन बादशहाची दाढी केली या घटनेचा उपहास करताना ते म्हणतात ‘ विठोबाने त्याच वेळेला, हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या बादशहाची मान का छाटून टाकली नाही? गुलामांचा देवही गुलामच.’
अशा तऱ्हेने कपोल कल्पित संतांच्या कथांवर त्यांनी प्रखर विचारांचे आसूड ओढले. या कथांमधून किंवा या विचारांमधून लोकांची अन्याया विरोधी लढण्याची अस्मिताच नष्ट करून टाकली. गुलामगिरी पुढे समाज नतमस्तक होऊ लागला. समाज नेभळट बनला. स्वातंत्र्याची उर्मी समाजात निर्माण करण्यासाठी त्यानंतर खूप त्रास झाला. असे त्यांचे स्पष्ट मत होते.
‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’ ‘दोन शब्दात दोन संस्कृती’ हे निबंध किंवा एकूणच सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंधाचे दोनही भाग तसेच ‘क्ष किरणे’ वगैरे पुस्तके. हे वाचण्याची तसदी किती जणांनी घेतली असेल? ‘क्ष किरणे’ मध्ये श्रुती आणि स्मृतिंवर त्यांनी केलेली भाष्ये
ही मुळातच आपल्या मनातील धार्मिक परंपरांना उलटेपालटे करणारी आहेत. ‘गाय केवळ उपयुक्त पशू माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे’ हे त्यांच्या एका निबंधाचे शीर्षक आहे हे किती जण जाणतात आणि ते पटवून घेऊ शकतात?
परंपरावादी तथाकथित हिंदुत्ववादी व्यक्तींना न पटणारी, न पचणारी, न आवडणारी किंवा कानावरही पडायला नको वाटणारी अशी वाक्ये ठासून भरलेले सावरकरांचे वाङ्मय वाचताना अशा तथाकथित हिंदुत्ववाद्यांचे काय होईल?
स्वतःच्या सामाजिक विचारांशी सुसंगत अशा व्यक्ती त्यांना मोठ्या प्रमाणात जमवता न आल्यामुळे त्यांनीच स्थापन केलेल्या हिंदूमहासभेला त्यांना सोडचिठ्ठी द्यावी लागली असावी असे आज मला वाटते. स्वातंत्र्योत्तर काळातही त्यांना उपेक्षित जीवन जगावे लागले. कारण त्यांची काँग्रेसने केलेली उपेक्षा हे खरे असले तरी, त्या बरोबरच त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांशी पटवून न घेता आल्यामुळे तथाकथित हिंदूंनी सुद्धा त्यांची केलेली उपेक्षाही जास्त कारणीभूत आहे. सावरकरांना हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या लोकांनी सावरकरांचे हे विचार तसेच, ते विचार ज्यामध्ये आहेत ते वाङ्मय समाजात पसरूच दिले नाही. त्यांची खरी ओळख समाजाला होणे हे टाळण्यात हिंदुत्ववादी परंतु मनातून सावरकर विरोधी विचारांच्या तथाकथित विचारवंतांनी सावरकरांचे हे विचार समाजामध्ये मोठ्या प्रमाणात पसरवण्याचे टाळले.
त्याचप्रमाणे भाषाप्रेमी, साहित्यनिष्ठ आणि काव्यानंदात वेदना विसरणारे. आपली प्रखर विचारसरणी साहित्यिक आणि कलात्मक स्वरूपात समाजासमोर मांडू शकणारे. मराठीभाषाहृदयसम्राट सावरकर समजून घेणे हा सुद्धा खूप मोठा वैचारिक व्यायाम आहे.
सावरकरांमधील या साहित्यिक पैलूं बाबत सुद्धा फार कमी लिहिलं आणि बोललं गेलेलं आहे अर्थात त्याबाबत पुन्हा कधीतरी. झाला एवढा वैचारिक व्यायाम वाचकांना खूप झाला असे वाटते.
© श्री सुनील देशपांडे
२८ मे २०२४
पुणे, मो – 9657709640 ईमेल : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈