सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ “जत्रेतील नाटक —” ☆ सुश्री शीला पतकी ☆
माझ्या गावी हन्नूर अक्कलकोट तालुका जिल्हा सोलापूर या ठिकाणी अक्षतृतीयानंतर गावची जत्रा भरत असे आमच्या या छोट्या गावाचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर त्या शिवाय गावात मुस्लिम वसाहत भरपूर त्यामुळे त्यांचा देव लगीनशा वली तसेच गावात भुताळसिद्धाचे आणि पांडुरंगाचे देऊळ नदीच्या उतारावरून जाण्यापूर्वी चावडीच्या शेजारी दोन पीर…. ही साधारणपणे माथा टेकण्याची देवळे… 1974 सालापासून सिद्धेश्वर आणि लगीनशा वली यांची जत्रा अक्षय तृतीया नंतर येणाऱ्या गुरुवारी भरते ती साधारणपणे तीन दिवस असते गुरुवार शुक्रवार शनिवार जत्रेसाठी बरीच मंडळी एकत्र येतात. नातेवाईक येतात आसपासच्या गावचे लोक येतात ..एकूण वातावरण सणाप्रमाणे असते. गावांमध्ये त्यावेळी असलेल्या तरुण मुलांमध्ये आत्ताचे तडफदार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे वडील पंचप्पा कल्याण शेट्टी हे गावाच्या विकासासाठी धडपडत असत त्यांनी जत्रेमध्ये नाटक बसवण्याची कल्पना मांडली ती सर्वांनी उचलून धरली त्या काळात नाटकांमध्ये स्त्रिया काम करत नसत खेडेगावातन तर नाहीच ! मग पुरुष पार्टीतीलच काही लोकांना स्त्री पार्टी बनवले जायचे
तिसऱ्या दिवशी हा नाटकाचा कार्यक्रम असे. हिंदू मुस्लिम सर्वच जत्रेमध्ये आनंदाने सहभागी होत असत पांडुरंगाच्या सप्त्याला बाशा मुल्ला सरपंच पुढे होऊन सर्व कार्य पार पाडीत तर कित्येक हिंदू घरामधून पिराला नैवेद्य जाई असे हिंदू मुस्लिम ऐक्याचे सुंदर गाव… दीड दोन हजार लोकसंख्या.. गावाला सुंदर देखणी स्वच्छ हरणा नदी वाहत असे …गाव सुखात होत! माणसाचे नाते सुखाशी असले की मग ती रसिक होतात आणि कलांकडे वळतात तसं या गावातल्या मंडळींनी नाट्यकलेकडे आपला मोर्चा वळवला .गावातील हौशी कलावंतांनी यात भाग घेतला होता नाटकाचे नाव होते भगवा झेंडा योगायोगाने मी सेवासदन येथे नुकतीच शिक्षिका म्हणून रुजू झाले होते आपल्या गावची मुलगी शिक्षिका झाली याचा अभिमान होता त्यांनी मला अध्यक्ष म्हणून बोलवले आमचे घरच तेथे होते त्यामुळे काही प्रश्नच नव्हता माझे काका श्री रामचंद्र पत्की हे तेथे वास्तव्याला होते मोठा वाडा होता शेती होती त्यामुळे आमचे हन्नूर ला येणे जाणे भरपूर होते मी तात्काळ निमंत्रण स्वीकारले सकाळी गावाला पोहोचले काकू ने बनवलेल्या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला स्टेज आमच्या घराच्या जवळच होते स्टेजच्या पाठीमागे रंगपट होता तिथेच मेकअप वगैरे कपडे बदलणे अशा सोयी होत्या आमच्या घरातून हे सगळं दिसत होतं साधारणपणे तीन चार वाजताच रंगपटाची पूजा होऊन आत मध्ये स्त्री पार्टी जे आहेत त्या पुरुषांचे केस कमी करणे दाढीकटिंग मिशा काढण्यासाठी न्हावी हजर झाला ..तो कार्यक्रम झाल्यानंतर आपण कसे दिसतोय ते वारंवार आरशात पाहत होते… त्यानंतर तोंड रंगवणे हो हो अगदी रंगवणेच असते भुवया कोळशाने कोरून काळ्या करणे ओठाला लाल करण्यासाठी हिंगूळ लावणे त्याचेच पावडरमध्ये मिश्रण करून गालावर लाली आणणे आता काळ्या रंगाला गोरं करून त्यावर लाली म्हणजे मेकअप मनचे कौशल्य होते… त्यानंतर नाटक ऐतिहासिक असल्यामुळे त्या प्रकारची ड्रेपरी परिधान करणे शिवाजी महाराजांची दाढी.. मिशा ..टोप अंगरखा तलवारी मावळे हे सगळे तयार झाले… इथं पर्यंत सात वाजले सात नंतर स्टेजची पूजा माननीय सरपंच यांच्या हस्ते झाली स्टेजच्या दोन्ही बाजूला असलेल्या खांबांना एकीकडे भगवा झेंडा तर दुसरीकडे हिरवा झेंडा लावलेला होता खऱ्या अर्थाने सद्भावना होती ती राष्ट्रीय एकात्मतेची …!त्यानंतर बत्त्यांची सोय झाली बत्त्या अडकवण्यात आल्या समोरच्या मैदानावर पाली टाकल्या गेल्या मधल्या वयाची तरणी पोर मेकअपच्या पाली असलेल्या खोलीला भोकं पाडून पाडून आत डोकावत होती स्त्री पार्टी कशा दिसतात याची सगळ्यांनाच उत्सुकता होती नाटकासाठी संगीत म्हणून एक पाय पेटी शेजारी असलेल्या वागदरी या गावांमधून डोक्यावरून चालत उचलून आणावी लागायची ती तशी आणली कारण एसटीमध्ये आणली तर तिच्या पट्ट्या निखळण्याची शक्यता असते ही पायपीट सुद्धा अनेक तरुण करतात ती पेटी आणि डग्गे आणि तबला झांज यावर सर्व म्युझिक अवलंबून होते…
तयारी जय्यत झाली नाटकाची अनाऊन्समेंट झाली नावे घोषित झाली प्रत्येक नावाला प्रचंड टाळ्यांचा कडकडाट आणि नंतर नाटकाचा पडदा उघडला मागे दरबाराचा सीन बागेचा सीन दऱ्याखोऱ्याचा सीन असे पडदे होते ते वरून सोडण्याची व्यवस्था होती नाटकाच्या कथानका प्रमाणे सिन पुढे जात होते स्त्री पार्टीचे आगमन झाले की लोकांच्या शिट्ट्या आणि टाळ्या….. छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन झाले की…. जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा असे पिटातल्या नाटकासारखे लोक नाटक एन्जॉय करत होते…. युद्धाचा प्रसंग चालू झाला की मागे पायपेटी आणि तबला डग्गा याच्यावरती सगळे आवाज काढले जायचे घोड्याचे टापाचे आवाज डग्यावर वाजवले जायचे एखादा शिवाजी महाराजांचा सरदार मुस्लिम सरदाराच्या छाताडावर वर पाय रोवून तलवारीने त्याची मान उडवतो अशी एक्शन करी त्या वेळेला झांज वगैरे जोरात वाजायची…. प्रेक्षकांमध्ये टाळ्या शिट्ट्या आणि घोषणा …वाद्याचे आवाज दुपटीने वाढायचे आणि तो सीन तिथे थांबायचा. प्रेक्षकांमधून त्या प्रसंगाला वन्स मोअर यायचा आणि वेगवेगळ्या नावाने बक्षीस पुकारले जायचे बक्षीस साधारणपणे एक रुपयापासून पाच रुपये पर्यंत असे हा कार्यक्रम साधारणपणे दर पंधरा मिनिटांनी होत होता बक्षीस देणारा माणूस प्रत्यक्ष स्टेजवर येऊन बक्षीस देत असे मागे पुन्हा वाद्य आणि समोर टाळ्या साधारण नाटक एक तासभर पुढे गेलं की ते थांबत असे आणि स्त्री पार्टी करणाऱ्या पात्राला त्याच्या सासुरवाडीकडून पूर्ण आहेर व्हायचा म्हणजे त्याच्या ओरिजिनल बायकोला शेजारी बसवायचे, स्टेजवर पाट टाकले जायचे, मग सासूरवाडीची मंडळी नवरा बायकोला आहेर करायचे गंमत म्हणजे स्टेजवर पाटावर बसलेली दोन्ही मंडळी साडी या वेषातच असे. टॉवेल टोपी धोतर सदरा, त्याच्या बायकोला उत्तम लुगडे म्हणजे साडीचोळी असा आहेर व्हायचा काही हौशी अर्ध्या तोळ्याची अंगठी सुद्धा घालत असत जावयाला कारण त्याने नाटकात स्त्री पार्ट केला आहे म्हणून. अशा पद्धतीने आहेर बक्षीसे आणि वन्स मोअर असे नाटक पहाटपर्यंत चाले माझ्या काकांनी… माझ्या मुलीला उद्या कामाला जायचे तिचे भाषण आटोपून घ्या असे सांगितल्यामुळे मला स्टेजवर बोलवण्यात आले माझे भाषण झाले माझ्या हस्ते काही बक्षीस वाटण्यात आली ती बक्षीसे वाटत असताना मध्येच एक फेटेवाले गृहस्थ उठले आणि त्याने अध्यक्षरू छलो भाषण माडिदरू अद्रसलवागे ऐद रुपये बक्षीsssस …..आणि टाळ्यांचा कडकडाट म्हणजे अध्यक्षांनी उत्तम भाषण केल्याबद्दल पाच रुपये बक्षीस मी कपाळावर हात मारून घेतला आज तागायत कुठल्याही अध्यक्षाला प्रेक्षकाकडून असे पाच रुपयाचे बक्षीस आले नसेल पण मला ते मिळाले आणि गावात ते नाकारता येत नसते तो त्यांचा अपमान होतो त्यामुळे मी मुकाट्याने ते घेतले अशा पद्धतीने नाटक रात्रभर चालायचे शिवाजी महाराज लढाई जिंकायचे तेव्हा अख्खा गाव जल्लोष करायचा त्यावेळेला हिंदू मुसलमान हे त्यांच्या डोक्यात येत नव्हतं आज मात्र हे सार दुर्दैवाने बदलले आहे
…नाटकाच्या मध्ये विश्रांती काळात रंगपटात चहा जायचा तिथे अध्यक्षाला ही चहा घ्यायला बोलवायचे पुरुष पात्र आपल्या झुपकेदार मिशा संभाळत चहा प्यायची तर तलफ आलेली स्त्री पार्टी थोडसं तोंड वळवून मस्त बिडीचा झुरका घेत बसलेले असायचे मला या सगळ्या दृश्याचे आजही हसू येते ….पण खर सांगू खेडेगावातल्या नाटकांनी आपली नाट्यकला जिवंत ठेवली तिचा आनंद उपभोगला आज सर्वत्र भव्य स्टेज भपकेबाज लाइटिंग विविध तंत्रज्ञानाचा उपयोग एसी थिएटर या सगळ्या सोयी मध्ये पाचशे रुपयाचे तिकीट काढून लोक नाटक पाहतात पण ही मजा नाही हा सर्व गावरान बाज माणसाला निखळ आनंद देऊन जात असे नाटक पहाटे संपायचं त्यावेळेला लहान लहान पोरं पालीवर कुठेतरी झोपलेली म्हातारी माणसं आडवी झालेली बाया बापड्या घराकडे परतलेल्या कार्यकर्ते मंडळी स्टेजच्या विझू पाहणाऱ्या बत्त्या मेंटल गेलं का रॉकेल संपलं याचा शोध घेत हिंडायचे मग स्टेज आवरलं की तिथेच मारुतीच्या देवळाच्या कट्ट्यावर मंडळी झोपून जायचे आणि मग या नाटकाचे पडसाद आणि गुणगान आसपासच्या गावागावातून कितीतरी दिवस चालायचे एखाद्या जत्रेतल्या फोटोग्राफरला बोलवून काढलेला फोटो त्यांच्या घराघरातून खांबाला लटकवलेले असायचे आणि त्या घराला वाटायचे की आपल्या घरात जणू नटसम्राट आहे घरातली माणसं फार भक्ती भावाने आणि अभिमानाने त्या फोटोकडे पाहत राहायचे आणि आल्या गेलेल्यांना त्या नाटकाची वर्णन सांगायची…. मंडळी खेड्यातलं असलं भन्नाट नाटक अनुभवायचे दिवस संपले. ज्यांनी ते अनुभवलं ते समृद्ध झाले या नाटकाची …त्याच्या तयारीची हजामत करणाऱ्या पासून सुरू झालेली त्याची तयारी ..ती बक्षिसे ते आहेर ती वाद्य …रंगपटात ओढल्या गेलेल्या बिड्या.. मिशी सांभाळत प्यालेला चहा ..ऐनवेळी म्यानातून न निघालेल्या त्यांच्या गंजक्या तलवारी सगळं काही अफलातून …..! याची मजा ज्यानी घेतली ते धन्य …!! हे सगळं आठवलं की आज म्हणावसं वाटतं ….असं असतं नाटक राजा … देखण सुरेख निरागस आणि सुंदर निखळ मनोरंजन करणार…….!!!!
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈