सौ.अस्मिता इनामदार

? इंद्रधनुष्य ?

☆  उडुपी थाळी – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती  – सौ.अस्मिता इनामदार ☆

महाभारत हे त्या काळातील सर्वात मोठे महायुद्ध होते कारण त्या काळात या युद्धात भाग न घेतलेले क्वचितच एखादे राज्य असेल. कारण या युद्धात भारतासह अफगाणिस्तान आणि इराणचे सर्व राजे कौरव किंवा पांडवांच्या बाजूने उभे राहिले, परंतु एक राज्य असे होते जे या युद्धक्षेत्रात असूनही युद्धापासून दूर राहिले, ते म्हणजे दक्षिणेतील उडुपीचे राज्य.

जेव्हा उडूप्पीचा राजा या युद्धात भाग घेण्यासाठी आपल्या सैन्यासह कुरुक्षेत्रावर पोहोचला तेव्हा कौरव आणि पांडव दोघेही त्यांना आपापल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न करू लागले.

उडुपीचा राजा अत्यंत दूरदर्शी होता, त्यांनी श्रीकृष्णाला विचारले – हे माधव! दोन्ही बाजूंनी जो कोणी पाहतो तो या युद्धासाठी आतुर वाटतो, पण दोन्ही बाजूंनी उपस्थित असलेल्या एवढ्या मोठ्या सैन्यासाठी जेवणाची व्यवस्था कशी होईल याचा कोणी विचार केला आहे का?

त्यावर श्रीकृष्ण म्हणाले- महाराज! तुम्ही अगदी बरोबर शंका उपस्थित केली आहे, तुमच्या या शंकेवरून मला असे वाटते की तुमच्याकडे नक्कीच यासंदर्भात काहीतरी योजना आहे, कृपया ती योजना मला सांगावी.

यावर उडुपीचे राजे म्हणाले की – हे वासुदेव! भावा भावांमध्ये होणारे हे युद्ध मला उचित वाटत नाही त्यामुळे या युद्धात भाग घ्यायची माझी इच्छा नाही.

परंतु हे ही सत्य आहे की हे युद्ध आता टाळता ही येणार नाही, म्हणूनच मी असे ठरवले आहे की माझ्या संपूर्ण सैन्यासह येथे उपस्थित राहून लढणाऱ्या सर्व सैनिकांसाठी भोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे.

यावर श्रीकृष्ण आनंदाने म्हणाले – महाराज!  तुमची कल्पना खूप चांगली आहे, या युद्धात 50 लाख योद्धे सहभागी होतील आणि तुमच्यासारखा कुशल राजा त्यांच्या अन्नाचे व्यवस्थापन पाहणार असेल तर या बाजूने ही आम्ही निश्चिंत राहू.

मला हे सुध्दा माहीत आहे की या विशाल महासागराएवढ्या मोठ्या सैन्याच्या अन्नाचे व्यवस्थापन भीमसेन आणि तुमच्या शिवाय कुणालाही शक्य नाही.

भीमसेन या युद्धापासून लांब राहू शकत नाहीत, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या सैन्यासह दोन्ही सैन्याच्या भोजनाची जबाबदारी घ्या, अशा प्रकारे उडुपीच्या महाराजांनी सैन्याच्या भोजनाची जबाबदारी घेतली.

पहिल्या दिवशी त्यांनी उपस्थित सर्व योद्धांसाठी भोजनाची व्यवस्था केली, त्यांची कार्यक्षमता इतकी अफाट होती की दिवसाच्या शेवटी अन्नाचा एक कण ही वाया गेला नाही.

जसजसे दिवस सरत गेले तसतशी योद्ध्यांची संख्याही दिवसागणिक कमी होत होती आणि दोन्ही बाजूचे योद्धे हे पाहून आश्चर्यचकित होत होते की, प्रत्येक दिवसाच्या शेवटी उडुपीचा राजा कडून एक अन्नाचा कण ही वाया जात नाहीये तर. त्यांना हे कसे समजते की आज एवढ्याच सैन्याचे भोजन बनवायचे आहे?

खर तर तेथील उपस्थित असणाऱ्या सैन्याला एक प्रश्न पडत होता की उडप्पीचा राजांना हे कसे काय समजते की आज किती सैन्य मरणार आहे व ते रोज त्याच आधारे भोजन बनवतात.?

एवढ्या मोठ्या सैन्याच्या अन्नाचे व्यवस्थापन करणे हा खर तर एक चमत्कारच होता आणि अन्नाचा एक दाणाही वाया जाऊ नये अशा पद्धतीने नियोजन करणे हे सुध्दा एका चमत्कारापेक्षा कमी नव्हतेच.

अखेर युद्ध संपले आणि पांडव जिंकले.आपल्या राज्याभिषेकाच्या दिवशी शेवटी युधिष्ठिराने न रहावुन उडुपीच्या राजाला विचारले की – हे महाराज! समस्त देशांचे राजे आमची प्रशंसा करत आहेत की तुमचे लहानसे सैन्य असूनही तुम्ही अशा सैन्याला पराभूत केले की त्या सैन्याचे नेतृत्व स्वतः भीष्म, गुरू द्रोण आणि आमचा थोरला भाऊ कर्ण यांसारखे महापुरुष करत होते. परंतु मला असे वाटते की तुम्ही आम्हा सर्वांच्यापेक्षा जास्त कौतुकास पात्र आहात, कारण ज्यांनी एवढ्या मोठ्या सैन्यासाठी केवळ जेवणाची व्यवस्थाच केली नाही तर ती व्यवस्था अशा प्रकारे चोख पार पाडली की अन्नाचा एक कण ही वाया जाऊ दिला नाही. मला तुमच्याकडून या कौशल्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे.

यावर उडुपीचे राजे हसले आणि म्हणाले – “सम्राट! या युद्धात तुम्ही मिळवलेल्या विजयाचे श्रेय कोणाला देणार?”

यावर युधिष्ठिर म्हणाले – “याचे श्रेय श्रीकृष्णाशिवाय कोणाला देता येईल? जर ते नसते तर कौरव सैन्याचा पराभव करणे अशक्य झाले असते.”

तेव्हा उडुपीचे राजे म्हणाले,  हे राजा!  ज्याला तुम्ही माझा चमत्कार म्हणत आहात तो सुद्धा श्रीकृष्णाचाच महिमा आहे, हे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले.

मग उडूप्पीच्या राजांनी या रहस्यावरून पडदा उठवला व व म्हणाले “महाराज! श्रीकृष्ण प्रतिदिन रात्री शेंगदाणे (भुईमुगाच्या शेंगा) खात असे व मी दररोज त्यांच्या शिबिरात मोजून शेंगा ठेवत असे, व त्यांच्या शेंगा खाऊन झाल्या व ते तेथून निघून गेले की मी तेथे जाऊन ती टरफल बाजूला करून त्यांच्या किती शेंगा शिल्लक राहिल्या आहेत त्या मोजत असे.

ते जितक्या शेंगा खात असे दुसऱ्या दिवशी युध्दात १०००  गुणा सैन्य मारले जायचे , समजा त्यांनी ५० शेंगा खाल्या तर दुसऱ्या दिवशी युध्दात ५०००० सैनिक मारले जायचे व मी याच निकषावर दुसऱ्या दिवशी भोजनाची व्यवस्था करत असे आणि त्यामुळेच कधी अन्नाचा एक कण ही वाया जात नसे.

प्रभू श्री कृष्णाचा हा चमत्कार ऐकून उपस्थित असणारे सगळेच त्यांच्यासमोर नतमस्तक झाले, ही कथा महाभारतातील दुर्मिळ कथांपैकी एक आहे, ही कथा कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात असलेल्या कृष्ण मठात नेहमी सांगितली जाते, कर्नाटकच्या या मठाची स्थापना उडुप्पीच्या सम्राटाद्वारा केली गेली आहे.

प्रभू श्रीकृष्णानी स्वत: उडुप्पीच्या महाराजांना आशीर्वाद दिला होता की तुम्ही ज्याप्रकारे भोजनाची व्यवस्था केली होती आणि असे अप्रतिम सात्विक भोजन तयार केले होते, त्याबदल्यात मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमच्या राज्याच्या सर्व पुरुषांच्या हातात असा नैसर्गिक गुण असेल की ते सात्विक भोजन तयार करतील व ते संपूर्ण जगात सर्वोत्कृष्ट असेल, म्हणूनच आज उडुपीच्या लोकांनी जगभरात अनेक रेस्टॉरंट्स उघडली आहेत आणि त्यांच्या हातांनी बनवलेले जेवण आज जगभर प्रसिद्ध आहे.

भारतात ही असे एक शहर नाही जिथे एकही उडुपीचे रेस्टॉरंट नाही , भारता सोबतच  परदेशातही अनेक उडुपी रेस्टॉरंट आहेत.

आणि या उडुपी रेस्टॉरंट्सची एक खास गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या याच आशीर्वादामुळे ते आपल्या हॉटेलमध्ये फक्त सात्विक भोजन बनवतात.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अस्मिता इनामदार 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments