श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ मातृवंदना… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
(प्रथम पुरस्कार प्राप्त कविता)
☆
आज तुझ्या त्या पावन स्मृतीला त्रिवार हे वंदन
अमुच्यासाठी झिजलिस निशीदिनी होऊनिया चंदन
जीवन सरले दुःख सोसता
कधी न आटली माया ममता
गरिबीचा तर शाप भयानक
तुझ्या ललाटी लिहीला होता
या व्यवहारी जगात नडले तुजला साधेपण
अमुच्यासाठी झिजलिस निशीदिनी होऊनिया चंदन
पंचत्वामधी विलीन होऊन
आभाळाला गेलीस भेदून
तरीही अमुच्या हृदयी उरलीस
तू प्रेमाचा सुगंध होऊन
प्रसन्न होऊन देवाने तुज स्वर्ग दिला उघडून
अमुच्यासाठी झिजलिस निशीदिनी होऊनिया चंदन
चंद्र सूर्य अन् तारे देखील
तव त्यागाची किर्ती सांगतील
अंगणातील फुलझाडेही
तुझ्याचसाठी बहरुन येतील
लोचनातून आठवणींचा पाझरतो श्रावण
अमुच्यासाठी झिजलिस निशीदिनी होऊनिया चंदन
☆
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈