सौ. मंजुषा सुनीत मुळे
वाचताना वेचलेले
☆ “निबंध…” – कवी : एडवोकेट मंजित राऊत ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
एक निबंध लिहू का सर?
तुमच्या मेलेल्या मनावर,
पोटापुरत्या ज्ञानावर,
सोईच्या न्यायबुद्धीवर,
एक निबंध लिहू का सर?
शेठजींच्या रग्गड पैश्यावर,
बापाच्या आंधळ्या प्रेमावर,
पाळीव कुत्र्यांच्या शेपटांवर,
एक निबंध लिहू का सर?
धावत आलेल्या दलालांवर,
कोठडीतल्या पिझ्झा डिलिव्हरीवर,
बर्गरने उतरवलेल्या दारूवर,
एक निबंध लिहू का सर?
महागड्या गाडीच्या महत्वावर,
तुच्छ दुचाकीच्या अस्तित्वावर,
निराधारांच्या निरुपद्रवी मुडद्यांवर,
एक निबंध तुम्ही पण लिहा सर,
कुठल्या तरी नशेत,
तुम्ही चालवलेल्या लेखणीवर,
आणि चिरडू दिलेल्या माणुसकीवर !
(पुणे पोर्श कार अपघात, निरपराध बळी, पोलीस आणि न्यायाधीशांची भूमिका आणि तातडीचा जामीन प्रकरणावर सुचलेली कविता ! )
☆
कवी : ॲड.मंजित राऊत
9890949569
संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈