श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

पुनरावृत्तीचे सवाल ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

लोक ताटकळले होते. अशावेळी यावं लागतं, लोक रीत आहे. उद्या आपल्यावरही ही वेळ आहेच की. म्हणून लोक आले होते. किमान आपल्या बिरादरीतलं कुणी गेलं तर जावंच. कारण बिरादरीतलेच लोक काहीही करून हजर राहतात….निदान शेवटच्या वेळेला तरी!

गेलेला त्यांच्यात सर्वच बाजूंनी उजवा होता. त्याच्या शब्दांची सर यांच्या शब्दांना यायला आणखी चार दोन जन्म घ्यावे लागले असते कित्येकांना. मनातून अतीव दु:ख झालेले काही जण होतेच या जमावात, नाही असं नाही! पण ब-याच जणांना, किंबहुना सर्वांनाच घाई होती. आपण अंत्यविधीला उपस्थित होतो हे किमान चार दोन लोकांनी तरी पाहिले असले पाहिजेच असाच अनेकांचा प्रयत्न होता. त्यातील काहीजण तर स्मशानापर्यंत न येता रस्त्यातून मध्येच सटकून आपल्या कामाधंद्याला पळणार होते. कुणी गेलं म्हणजे व्यवहार का थांबून राहतो? नाही. व्यवहार करणारा थांबला की त्याच्या त्याच्यापुरता व्यवहार थांबतो. हे असंच चालतं जगात. 

पण दिवंगताची पत्नी पतीच्या शवापासून तसूभरही हलायला तयार नाहीत. त्या देहातून चैतन्य पुढच्या प्रवासाला कधीचंच निघून गेलेल्याला तसा आता बराच वेळ लोटून गेला आहे. आप्तांनी कर्तव्यभावनेने सारी तयारी कधीच पूर्ण केलीये. आता फक्त उचलायचं आणि चितेपर्यंत पोहोचवायचं…बस्स! 

बाईंनी त्यांच्या पतीचा, नव्हे त्यांच्या पतीच्या निष्प्राण देहाचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवलेत. कुणी जाणता माणूस पुढे झाला. “वहिनी….जाऊ द्या दादांना…त्यांच्या प्रवासाला!” त्यावर बाई त्यांच्यावर एकाएकी बरसल्या. म्हणाल्या, “तुम्ही असाल मोठे कवी! पण तुम्हांला बाईच्या हृदयीची पीडा नाही समजणार!”

— तो बिचारा सभ्य सदगृहस्थ आधीच आपल्या परमप्रिय मित्राच्या देहावसानाने  भांबावून गेला होता. तो मागे सरकला. वहिनी त्याच्याशी बोलताना जणू आपल्या पतीच्या काही समजण्यापलीकडे निघून गेलेल्या निष्प्राण देहालाच प्रश्न विचारू लागल्या…बोलू लागल्या.

… “एकटेच आला होतात मला बघायला आणि माझ्या वडीलांकडे माझा हात मागायला. जातपात एकच आणि त्यात पगारी नोकरी. लेक सुखी राहील. बाप दुसरा कोणता विचार करतो? आणि बालविधवा मुलीचा बाप तर कशालाही तयार झाला असता…नव्हे अनेकांना हो सुद्धा म्हणून बसला होता. माझं पहिलं लग्न अकराव्या वर्षी झालं. कपाळावरचं कुंकू अजून माझ्या आणि इतरांच्याही सवयीचं होण्याआधीच,काळाच्याच भाषेत बोलायचं झालं तर, तीनेक एक महिन्यात पुसावं लागलं. कपाळावर कुंकवाचा मागमूसही राहिलेला नव्हता. आणि तुमचं लग्न तुमच्या पिताश्रींनी तुमच्या नकळत्या वयात लावून दिलं होतं. तुमची आई देवाघरी गेल्यावर तुमच्या वडिलांनी स्वत:च्या संसाराचा दुसरा डाव मांडलेला. तुम्ही आणि तुमची ती दुसरी आई. शंभरात नव्याण्णव जणांच्या नशिबी असलीच सावत्र आई येते…मानवी स्वभाव दुसरं काय? म्हणून मग तुम्हांला वडीलांनी लवकरच बोहल्यावर चढवलं होतं.

तुमची पत्नी तशी तुमच्यापेक्षा वयाने मोठी..खानदानी श्रीमंत…लाडावलेली….आई-वडिलांचा लळा अजून न सुटलेली. ती सारखी माहेरी जाण्याच्या तयारीत आणि मन:स्थितीत…बायकोच्या भूमिकेत असली तरी ती बालिकाच की.  लवकरच तुमचे वडीलही परलोकी गेले. तुम्ही बाहेरगावी शिक्षणासाठी असताना तुमच्या सावत्र आईत आणि पत्नीत काहीतरी कुरबूर झाली तर या सूनबाईंनी चक्क स्वत:चाच जीव घ्यायचा प्रयत्न केला. तुम्ही तिच्यावर रागावलात तर ती जी माहेरी गेली ती गेलीच.

आणि मग तुम्ही ठरवलंत…लग्न करायचं ते बालविधवेशीच. या विचाराला हिंमत लागते. ती तुम्ही दाखवलीत. अगदी वडीलांना आधी न विचारता तुम्ही माझ्या वडीलांना तुमची पसंती त्वरीत सांगितली होतीत आणि वडीलांनी दिलेली नाममात्र वरदक्षिणा स्विकारून विवाह निश्चितही करून टाकला. 

केवळ तुमच्यासाठी मी माझं वैधव्य खंडित केलं होतं….वैधव्याचा पदर माझ्या डोईवरून मागे घेतला होता….आणि कपाळी तुमच्या नावाचं कुंकू रेखलं होतं. आणि तुम्ही आता मला तोच पदर पुन्हा तोंड झाकण्यासाठी पुढे ओढून घ्यायला सांगताय….मी बरं ऐकेन? तुम्ही मला मागे टाकून एकटे जाऊच कसे शकता? तुमच्या कित्येक कथांमध्ये मी तुमच्याशी साधलेल्या संवादांचं प्रतिबिंब पाहून मला मनातून सुखावून जायला व्हायचं. तुमच्या लेखनावर कुणी केलेली टीका मला सहन व्हायची नाही. पण तुम्ही ती टीका मला मोठ्या चवीने वाचून दाखवायचात..! पण तुम्ही साहित्यनिर्मितीसाठी लिहीत नव्हताच मुळामध्ये…तुम्ही फक्त स्वत:ला व्यक्त करीत होतात…स्वत:ला मोकळं करीत होतात. तुम्ही भोगलेलं,अनुभवलेलं शब्दांच्या रूपांत पुस्तकांत जाऊन बसायचं….पानांपानांत दडून बसायचं! ” 

देह ऐकू शकत नव्हता आणि आता काही करूही शकत नव्हता. पण इतर जिवंत माणसांच्या काळजाला त्यांच्या या शब्दांनी घरं मात्र पडत चालली होती. सर्व उरकून घरी जाण्याच्या मन:स्थितीतली माणसंही आता मनातून वरमली असावी. सारेच स्तब्ध झाले होते! 

संवादामधला हा अवकाश जीवघेणाच असतो. पण त्यातूनही ते गृहस्थ दुस-या एकाला म्हणाले…बघ! तुला वहिनींना समजावता येतंय का ते!” आणि ते तेथून दोन पावलं मागे सरून खाली मान घालून उभे राहिले! 

बाईंचा विलाप हस्तनक्षत्रातल्या पावसासारखा घनघोर…अविरत.पण तरीही ही नवी जबाबदारी शिरावर अकस्मातपणे आलेला माणूस पुढे झाला….आणि अत्यंत कोमल स्वरांत म्हणाला….” ही तर केवळ माती उरलीये! या मातीत आता तुमचं माणूस उरलेलं नाही ! ”

…एक प्रदीर्घ हंबरडा उमटला आणि बाईंनी शवाच्या छातीवर टेकवलेलं आपलं मस्तक वर उचललं….त्यांच्या कपाळावरचं कुंकू सैरावैरा होऊन कपाळावरून उतरू लागलं होतं !

(हिंदी साहित्याच्या मालेतले मेरूमणि प्रेमचंद निवर्तले तेंव्हाचा हा प्रसंग. त्यांचे स्नेही आणि जीवलग कवी परिपूर्णानंद वर्मा यांनी ‘बीती यादें’ नावाच्या पुस्तकात वर्णन केला आहे. प्रेमचंद यांच्या अर्धांगिनी शिवरानी देवी पतीनिधनाने अति व्याकुळ झाल्या होत्या. प्रेमचंद यांचे सर्वात घनिष्ठ कवी मित्र जयशंकर ‘प्रसाद’ शिवरानी देवींना प्रेमचंद यांचे शव अंत्यविधीसाठी घेऊन जाण्याची विनंती करण्याचा प्रयत्न करीत असताना शिवरानी देवींनी दु:खावेगाच्या, अगतिक रागाच्या भरात ‘तुम्ही कवी असू शकता…पण एका स्त्रीचं हृदय तुम्हांला समजणार नाही’ असे उद्गार काढले होते. त्या प्रसंगाचं मी हे स्वैर भाषांतर आणि गांभिर्यपूर्वक स्वातंत्र्य घेऊन स्वैर रुपांतर केलं आहे. प्रेमचंद आणि त्यांच्या पत्नी शिवरानी देवी यांचं भावजीवन मूळातूनच वाचण्याजोगं आहे. असो. प्रेमचंद यांचे वर उल्लेखिलेले मित्र कवी,कथालेखक श्री. जयशंकर प्रसाद यांना कुणी या प्रसंगानंतर हसलेलं कुणी पाहिलं नाही..इतके ते आपल्या या मित्राच्या जाण्याने दु:खी झाले होते…त्यानंतर अवघ्या सहाच महिन्यांत तेही परलोकी गेले.. प्रेमचंद यांचे हिंदी साहित्य वाचकांच्या भावजीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत हे तर निर्विवादच.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments