श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ शापित गंधर्व आणि देवदूत ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

गायन-वादन कलांमध्ये अत्युत्कृष्ट श्रेणीचे कलाकार असलेले स्वर्गस्थ गंधर्व त्यांच्या हातून घडलेल्या काही प्रमादांमुळे मृत्यूलोकात पदावनत केले जातात,किंवा ते स्वत:च त्यांच्या काही कार्यासाठी खाली येतात आणि विविध रूपं धारण करतात, असं आपण ऐकत आलेलो आहोत.

पृथ्वीवर मराठी भाषेला लाभलेल्या बाल,छोटा,कुमार या गंधर्वांबद्दल आपण जाणतोच. 

देवांचा दिव्य परिचारक असणारा, तसेच अडचणीच्या प्रसंगी तातडीने येऊन उद्धार करणारा, त्यास देवदूत म्हणतात. जसे गंधर्व देवांचे तसेच देवदूतही देवांचेच! 

धारदार तरवारीसारखा लखलखता,पहाडी,भरदार आणि तरीही सुस्पष्ट  आवाज लाभलेला (आणि आता परलोकी गेलेला) असाच एक गंधर्व काही मराठी गाण्यांतून आपल्यासमोर साक्षात उभा राहतो….अजून आठवे ती रात्र पावसाची, अरूपास पाही रुपी तोच भाग्यवंत, अरे कोंडला कोंडला देव राऊळी कोंडला, कोण होतीस तू काय झालीस तू, घबाड मिळू दे मला, धरमशाळेचं देऊळ झालं…देव माणूस देवळात आला, क्षणोक्षणी रात्रंदिन तुला आठवीन आणि निसर्गराजा ऐक सांगतो! आणि अष्टविनायका तुझा महिमा कसा? विचारणारा कंठ म्हणजे चंद्रशेखर गाडगीळ! आणि त्यांनी, ‘कानाने बहिरा मुका परी नाही! हे मुंबई दूरदर्शनसाठी मूक-बधिर मुलांसंदर्भात गायलेलं गाणं कोण विसरेल? 

खुदा का बंदा असं विशेषण ज्यांना लाभलं ते स्वर्गीय महंमद रफी साहेब संगीताच्या क्षेत्रातच नव्हे तर प्रत्यक्ष व्यवहारातही देवदूतापेक्षा कमी नव्हते.

‘चंद्रशेखर’ गंधर्वाला ‘महंमद रफी’ नावाच्या देवदूताचा नकळत आशीर्वाद लाभला त्याचा हा किस्सा…अनेक ठिकाणी लिहिला गेला,सांगितला गेला. तो स्मरणरंजन म्हणून पुन्हा एकदा ऐकण्या,वाचण्यासारखा.

लेखक,दिग्दर्शक चेतन आनंद १९८० मध्ये कुदरत नावाचा हिंदी चित्रपट बनवत होते. मजरूह सुल्तानपुरी यांची गीते होती आणि संगीत देत होते राहूल देव बर्मन. परवीन सुल्ताना यांनी गायलेलं हमे तुमसे प्यार कितना हे गाणं तर कुदरतची ओळखच जणू. लतादीदी,किशोरदा,आशाताई,सुरेशजी वाडकर यांनी कुदरतची गाणी गायली. मात्र कुदरतचं शीर्षक गीत (टायटल सॉंग) कतील शिफई या कवींकडून लिहून घेतलं गेलं. शब्द होते…सुख दुख की हरेक माला कुदरतही पिरोती है! (आरंभी या गाण्याचे सुरूवातीचे शब्द वेगळे होते..नंतर गरजेनुसार त्यात बदल केला गेला!) हे गाणं महंमद रफीसाहेबांकडून गाऊन घ्यावं, असं चेतन आनंद यांचे मत होतं. आणि यावर दुमत असण्याचं कारण नव्हतं.  

राहुल देव बर्मन यांना मात्र या गाण्यासाठी चंद्रशेखर गाडगीळांचा आवाज चपखल बसेल असा विश्वास होता. त्यांनी सतत आग्रह करून चेतन आनंद यांना गाडगीळांच्या नावाला पसंती मिळवली. त्यानुसार त्यांनी चालही बांधायला घेतली होती. वादक,गायक,गीतकार अशा सर्वांच्या उपस्थितीत मुंबईत गाण्याचं काम सुरू होतं. या गाण्याची पहिली चाल आर.डीं.नी आधी अन्य एका चित्रपटात वापरली आहे हे आर.डी.ने चंद्रशेखर गाडगीळ यांच्या चेह-यावरील भाव पाहून ताडले होते. आणि मग मोठ्या त्वेषाने दुसरी चाल बांधली….! चंद्रशेखर यांच्या गळ्याला साजेल अशी. आणि चंद्रशेखर यांनीही या चालीला,शब्दांना सुरेल आणि पहाडी न्याय दिला! गाण्याचं ध्वनिमुद्रण करणा-या तंत्रज्ञांनाही हा नवा आवाज भावला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत मंगेशकर,भोसले,वाडकर या मराठी नावांमध्ये आता गाडगीळ या आडनावाची भर पडणार होती…पण…कुठे तरी माशी शिंकली आणि चेतन आनंद यांनी या गाण्यासाठी महंमद रफी साहेबांना बोलवण्याचा आदेशच आर.डीं.ना दिला! हे समजल्यावर चंद्रशेखर गाडगीळ यांचा किती प्रचंड हिरमोड झाला असावा, हे रसिक समजू शकतात! 

रफी साहेब आले. आर.डीं.ना त्यांना चाल ऐकवली. गाडगीळ यांनी गायलेल्या चालीपेक्षा ही नवी चाल वेगळीच आणि काहीशी संथ,खालच्या पट्टीमधली होती. अर्थात रफी साहेबांनी या चालीला सुरेख वळण दिले. एकूण चार कडव्यांपैकी तीन कडव्यांचे ध्वनिमुद्रण पूर्ण झाले होते. चौथ्या कडव्याआधी रफीसाहेबांनी क्षणभर विश्रांती घ्यायचं ठरवलं. ते रेकॉर्डींग रूम मध्येच बसून होते. तिकडे स्टुडिओमधील तंत्रज्ञ आपापसात चर्चा करीत होते…तो आवाज रफीसाहेबांच्या मायक्रोफोनमधूनही ऐकू जात होता….कुणी तरी म्हणत होतं…हेच गाणं त्या पुण्याच्या दाढीवाल्यानंही खूप सुरेख गायलं होतं! हे शब्द रफीसाहेबांच्या कानांवर पडले आणि ते उभे राहिले!. त्यांनी ताबडतोब आर.डी.बर्मनला बोलावून घेतले….साहेबांसमोर कुणाची खोटं,अपुरं बोलण्याची छाती नव्हती….खरा प्रकार रफीसाहेबांना सांगितला गेला! 

  माझ्या हातून का एखाद्या नव्या गायकाचं भवितव्य उद्ध्वस्त करतोस? असं म्हणून रफी साहेबांनी मायक्रोफोन बाजूला ठेवला आणि ते स्टुडिओतून तडकाफडकी निघून गेले! एका अर्थाने शापित गंधर्वाच्या शिरावर एका देवदूतानेच वरदहस्त ठेवला होता! 

सुख दुख की हरेक माला हे गाणं तांत्रिकदृष्ट्या आता ख-या अर्थाने चंद्रशेखरगंधर्वाचं झालं होतं. हिंदी चित्रपट संगीताच्या आभाळात एक मराठी नाव चमकण्याची वाट मोकळी झाली होती. चेतन आनंद यांच्या आग्रहाखातर चित्रपटात रफीसाहेबांनीच म्हणलेली तीन कडवी ऐकवली गेली. मात्र चित्रपटाच्या गायक श्रेयनामावली मध्ये चंद्रशेखर गाडगीळ हेच नाव झळकले. एच.एम.व्ही. ने ध्वनिमुद्रीत केलेल्या ध्वनिमुद्रिकेसाठी आणि ध्वनिफीतीसाठी चंद्रशेखर गाडगीळ यांचाच आवाज घेतला गेला!.

पुढे हरजाई नावाच्या हिंदी चित्रपटात रफी साहेबांसोबत एका गाण्यात चंद्रशेखर गायले…तेरा नूर सितारों में…तेरा रंग बहारों में…हर जलवा तेरा जलवा…हो… मीरक्सम! हे गाण्याचे शब्द होते. त्यांनीच आरंभीचा आलाप घेतला होता आणि गाण्याची सुरूवातही आणि शेवटही केला होता! 

मात्र हिंदी चित्रपट सृष्टीतली स्पर्धा, आधीच सुस्थापित असलेल्या गायकांच्या आवाजाशी साधर्म्य अशा काही कारणांनी हा गंधर्व या मुख्य प्रवाहापासून काहीसा दूर पडला…हे या गंधर्वाचं प्राक्तन! असो. आर.डी.बर्मन यांनी चंद्रशेखर यांना नंतर काही गाणी दिली. पण चंद्रशेखर यांची हिंदीतली ठळक ओळख म्हणजे…सुख दुख की हरेक माला…कुदरत ही पिरोती है! सुख-दु:खाची माला ओवणारा निसर्ग,दैव त्याला हवी तशी माला गुंफतो! या मालेत चंद्रशेखर गाडगीळांसारखं वेगळं,टपोरं फुल दीर्घकाळ राहू शकलं नाही! एका दर्जेदार कलाकराच्या आयुष्यात हे बाब टोचणी लावणारी असते. चंद्रशेखर यांनी आपल्या आत्मचरित्राचं नावच मुळी ठेवलं होतं…शापित गंधर्व! प्रा.प्रज्ञा देशपांडे यांनी शब्दबद्ध केलेलं हे आत्माचरित्र प्रकाशित होण्याआधीच हा गंधर्व २०१४ मध्ये मृत्यूलोक सोडून निघून गेला ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments