सौ. राधिका भांडारकर

? वाचताना वेचलेले ?

☆ वास्तवातली मूल्ये… लेखक : श्री ओंकार दाभोडकर ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆

काल लोकलमधे ३-४ मंडळींमध्ये रावणाचं कौतुक करणारं डिस्कशन सुरू होतं. प्रोपागंडा रुजत रुजत सार्वत्रिक मत कसं तयार होतं याचं लाईव्ह प्रात्यक्षिक बघितलं. खोटे हिरो निर्माण करण्याचा प्रकार हसून, गंमत म्हणून सोडून देण्यात आला की सामान्य माणूस कसा घडत जातो याची जाणीव अधिकच ठळक झाली. 

कथा कादंबऱ्या म्हणून प्रसिद्ध झालेली पुस्तकं गाजतात, चर्चा होतात आणि वास्तवाचा अन त्याहून महत्वाचं – मूलभूत मूल्यांचा – सगळा कचरा होऊन बसतो.

रावण त्याच्या गुणांमुळे आदर्श वाटावा असं बरंच काही होतंच त्यात. ज्ञानी, तपस्वी, कर्तबगार, योद्धा…बऱ्याच अनुकरणीय गोष्टी होत्या. रामायणात त्यांची दखल घेतली गेली आहेच. परंतु रावण समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्व होऊ शकत नाही. कारण त्याच्या दुर्गुणांमुळे सगळे सद्गुण मागे पडले.

अहंकारी, दुराग्रही, वासनांध – हेच रावणाचं खरं रूप आहे. हे रूप न ओळखता रावण ग्रेट वाटायला लागला तर ती फक्त सुरुवात असते. हळूहळू आपल्याला श्रीराम कमी महत्वाचे वाटायला लागतात. मग श्रीरामांचे गुण – ज्यांमुळे श्रीराम “श्रीराम” ठरतात – ते झाकोळले जायला लागतात. छत्रपती शिवराय याच श्रीरामाचं चरित्र शिकून स्वराज्य निर्मितीसाठी प्रेरित झाले हे आपण विसरायला लागतो. 

हळूहळू नाळ तुटत जाते.

रावणाने सीता मातेला तिच्या मर्जी विरुद्ध स्पर्श न करणे मोठं आदर्श वर्तन समजलं जातं. एका महिलेच्या अपहरणाचं समर्थन करायला “फक्त युद्ध टेक्निक म्हणून”, “बहिणीच्या अपमानाचा बदला म्हणून” वगैरे कारणं दिली जातात.

मग श्रीरामांनी सीतेची परीक्षा घेतली, प्रेग्नन्ट बायको जंगलात सोडली…हे सगळं खटकायला लागतं.

पण आपल्याला खरी स्टोरी माहितीच नसते. सांगितली गेलेली नसते. त्या स्टोरीचे पर्स्पेक्टिव्हच समजावून सांगितले जात नाहीत. प्रोपागंडा सशक्त होत जातो.

रावणाने सीता मातेला स्पर्श करण्यामागे त्याचं चरित्र नव्हे – हतबलता होती. 

रंभेवर केलेल्या बलात्कारा नंतर चिडून नलकुबेराने “यापुढे कुठल्याही स्त्रीला तिच्या इच्छेशिवाय स्पर्श जरी केलास तरी भस्म होशील” हा शाप दिला होता रावणाला. रावण “असाच” होता. विलासी, भोक्ता, बलात्कारी. राजा असणं, बलवान असणं रावणाने “असं” मिरवलं. वाट्टेल त्या स्त्रीचा, आसक्तीचा भोग घेऊन. (वाल्मिकी रामायणात, ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्यानंतर रावणाने त्रिलोकात माजवलेला हाहाकार स्पष्ट मांडला आहे. स्त्रियांच्या अपहरणासकट. सीतेला आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न करताना रावण हीच शेखी मिरवतो.)

दुसरीकडे राजपुत्र श्रीराम.

पत्नी अदृश्य झाली म्हणून “जाऊ दे!” म्हणून दुसरं लग्न न करणारा. तिच्यासाठी उद्विग्न होणारा. तिला शोधत भटकणारा. ३००० किलोमीटर पायपीट करून अपहरणकर्त्या बरोबर युद्ध करून तिला मुक्त करणारा. 

आणि आपल्या पत्नीवर अमर्याद प्रेम असूनही – स्वतःचं राजकीय, जबाबदार स्थान न विसरणारा.

जनतेचा आपल्या राणीवर विश्वास असायला हवा हे ओळखणारा.

सीता एका रामाची बायको नव्हती फक्त. ती महाराणी पदावर विराजमान होती. सिंहासनावर बसलेला राजा विष्णूचा अवतार मानून त्याला दिशादर्शक मानणाऱ्या समाजाचा काळ होता तो. तिच्या पोटी जन्मणारं अपत्य पुढे सिंहासनावर बसणार होतं. सीता त्या राज्याची माता होती.

जनतेचं मन मातेबद्दल कलुषित झालं असेल तर लोक पित्याला मानतील?

सिंहासनावर त्यांची श्रद्धा टिकून राहील? स्थैर्य असेल राज्यात? 

मुळात असं राज्य टिकेल?

जनतेला काही कळत नाही – असं म्हणून सोडून देता येत नसतं. सिंहासनावर बसलेल्या राजाला – जर तो रावणासारखा उन्मत्त, बेफिकीर, बदफैली नसेल तर – हा सगळा विचार करावा लागतो. तेच त्याचं पहिलं कर्तव्य असतं. तो नवरा नंतर असतो – सर्वात आधी तो जनतेचा राजा, प्रतिपाळ करणारा असतो.

म्हणून त्याने स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी अतिशय कठोर नियम पाळायचे असतात.

हे चूक नाही का? सीतेवर हा अन्याय नाही का? लव-कुशवर हा अन्याय नाही का?

आहेच. रामासकट – सीता, लव-कुश या स्वतंत्र व्यक्तींवर हा अन्याय नक्कीच आहे. पण राजा – राणी – राजकुमार यांचं हे कर्तव्य आहे. दुर्दैवी वाटेल कदाचित. पण स्वायत्त यंत्रणांची विश्वासार्हता टिकवायची असेल तर हे अत्यावश्यक आहे.

आधुनिक काळात हे कसंसंच वाटत असेल कदाचित. पण आजही इंग्रजीत जेव्हा Caesar’s wife must be above suspicion म्हटलं जातं तेव्हा कौतुकाने मान डोलावतोच आपण. सिझरच्या बाबतीत झटकन सहमत होणारे आपण, श्रीरामांनी स्वतःच्या आवडीनिवडीवर, स्वातंत्र्यावर, सुखावर सतत, जन्मभर पाणी सोडलं हे सहजच विसरून जातो.

महत्वाच्या राजकीय पदावर विराजमान असलेल्याना व्यक्तिस्वातंत्र्य एका मर्यादेतच असणार. त्यांच्यासाठी नैतिकतेचे नियम अधिक कठोर, अधिक अरुंद असणार.

पूर्वीही असंच होतं – आजही असंच आहे. (किमान असायला हवं!)

वाट्टेल तसं वागण्याचं स्वातंत्र्य सामान्य व्यक्तीला ठीकाय.

राजाला ते स्वातंत्र्य नाही.

सीझरला ही नाही, त्याच्या पत्नीला ही नाही.

हे भान श्रीरामांना होतं.

म्हणून ते श्रीराम होते.

सत्तेत धुंद झालेला, वाट्टेल तेव्हा वाट्टेल ते करणारा रावण – म्हणूनच – पंडित, महादेवाचा भक्त वगैरे असूनही – आपला आदर्श होऊच शकत नाही.

म्हणूनच – राम की रावण, अर्जुन की कर्ण – हा निर्णय कादंबऱ्या वाचून करू नये.

मूळ चरित्र वाचून, समजून मग करावा.

कारण मुद्दा राम की रावण या दोन व्यक्तींचा नाहीच.

तो तसा कधीच नसतो.

मुद्दा या दोन्ही नावांमागील मूल्यांचा असतो.

ती मूल्यं सर्वात महत्वाची.

म्हणूनच श्रीराम महत्वाचे!

जय श्रीराम!

लेखक : श्री ओंकार दाभोडकर

प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments