सुश्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ ज्ञानेश्वरीतील वसंतोत्सव… – लेखिका : सुश्री शालिनी लेले ☆ प्रस्तुती – सौ. मंजिरी येडूरकर ☆
ज्ञानेश्वर कोमल मनाचे ज्ञानी संत. त्यांचे दृष्टांत व उपमा विशेष करून नेहमीच्या व्यवहारातील व निसर्गातील आहेत. आपण वसंत ऋतू म्हणजे निसर्गाशी निगडित म्हणतो. वसंत म्हणजे निसर्गाचे सौंदर्य, तेज, झाडावेलींची टवटवी, नवी पालवी, फळांचा बहर असा अर्थ घेतो. ज्ञानेश्वरांच्या दृष्टीने वसंताचा अर्थ जास्त व्यापक आहे. तो निसर्गापुरता मर्यादित नाही. निसर्ग त्यांना आवडतोच, वसंत ऋतूचा उल्लेख ते माधवी असा करतात. एकच वस्तू पाच ज्ञानेंद्रियांनी पाच प्रकारची दिसते, पाच प्रकारे तिचा अनुभव घेता येतो. तसाच एकाच वसंत ऋतुचा वीस दृष्टीने ज्ञानेश्वर विचार करतात. वसंत ऋतुच्या रूपागुणांचा जेथे जेथे उत्कर्ष तेथे तेथे त्यांना वसंत दिसतो. म्हणून हा वसंत दोन महिन्याच्या काळापुरता मर्यादित नाही.
व्यासांच्या बुद्धीच्या तेजात, प्रतिभेत ज्ञानेश्वरांना वसंत दिसला. त्यामुळे महाभारताला वैभव प्राप्त झाले. अर्जुनाला ते वसंत आणि कृष्णाला कोकिळ म्हणतात. कारण अर्जुनाला पाहून कृष्णरुपी कोकीळ बोलू लागला. गीताख्यान सुरू झाले. तसेच ज्ञानी पुरुषातही त्यांना वसंत दिसतो. कारण वसंताचा प्रवेश जसा झाडाच्या टवटवीवरून कळतो तसेच ज्ञानी पुरुषाचे ज्ञान त्यांच्या हालचालीतून, वागण्या बोलण्यातून प्रकट होते. सद्गुरूंमध्येही ज्ञानेश्वरांना वसंत दिसला. म्हणून ते सद्गुरूंना म्हणतात ‘माझी प्रज्ञा रुपी वेल्हाळ। काव्ये होय सुफळ।तो वसंत होय स्नेहाळ। शिरोमणी।(१४/२१) माझ्या बुद्धीरुपी वेलीला काव्यरूपी सुंदर फळ देणारे कृपाळू वसंत तुम्ही व्हा.चेतनेला ते शरीररुपी वनाचा वसंत म्हणतात कारण त्यामुळे मन बुद्धी प्रसन्न राहते.
योग्य काळाचे महत्व सांगताना ते म्हणतात, माळ्याने कितीही कष्ट केले तरी वसंत ऋतू येतो तेव्हाच फळे लागतात. माधवी जसे मनाला मोहित करते तसे दैवी माया म्हणजे मोहरुपी वनातील वसंतच, कामरुपी वेल वाढवते. योग्य अपेक्षेविषयी सांगताना ते म्हणतात, वसंत असला तरी आकाशाला फुले येत नाहीत. अनासक्ती आणि निरपेक्षतेचे उदाहरण म्हणजे वसंत. ‘का वसंतांचिया वहाणी।आलिया वनश्रीचिया अक्षौहिणी। तेन करीतुची घेणी। निघाला तो।(१६/१६४) वनाच्या शोभेचे अनेक समुदाय आले तरी त्यांचा स्वीकार न करता वसंत निघून जातो. एवढेच नव्हे तर त्या फळाफुलांना, पालवीला हातही लावीत नाही. कर्मफलत्यागाचं हे उदाहरण!
वसंत ऋतूतील वाऱ्याला ते आईच्या प्रेमाची उपमा देतात. कारण त्याचा स्पर्श आईच्या प्रेमासारखा मऊ असतो. वसंत ऋतू प्राप्त झाला असता झाडांना अकस्मात पालवी फुटते. कशी ते झाडानाही कळत नाही आणि ती थांबवणे त्यांच्याही हातात नाही, स्वाधीन नाही. यातून भगवंताच्या स्मरणाने मी पणा कसा विसरतो हे दाखवून देतात. ‘वाचे बरवे कवित्व। कवित्वीं बरवें रसिकत्व। रसिकत्वी परतत्व। स्पर्श जैसा।'(१८/३४७ ) या आपल्या वचनाला आधार म्हणून ते वसंत ऋतूचे उदाहरण देतात. वसंत ऋतूतील अल्हाददायक बागेत प्रिय माणसाचा योग चांगला आणि त्यात इतर उपचारांची प्राप्ती व्हावी, तसाच वाचा, सुरस कवित्व आणि परमात्मतत्व यांचा संबंध. गीता आख्यानला तर ते भक्तरुपी वनातील वसंत म्हणतात .’वसंत तेथे वने। वन तेथे सुमने। सुमनी पालींगने। सारंगाची। (१८/१६३५)वसंत तेथे वने, वन तेथे सुमने आणि सुमन तेथे भ्रमरांचे समुह. याचाच अर्थ येथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी आणि जेथे लक्ष्मी तेथे सिद्धी व भक्तांचे समुदाय.याचाच मतीतार्थ येथे कृष्ण व अर्जुन तेथे विजय व इतर सर्व भरभराट. हाच गीतेचा मतीतार्थ.
वसंतावरील शेवटच्या ओवीत ज्ञानेश्वर म्हणतात ‘नाना गुंफिली का मोकळी।उणी न होती परिमळी। वसंता गमीची वाटोळी। मोगरी जैसी।(१८/१७४०) वसंत ऋतूतील मोगरीची वाटोळी फुले, ओवलेली असो वा मोकळी, वासाच्या दृष्टीने त्यात कमी जास्त पणा नाही. त्याचप्रमाणे संस्कृत गीता आणि त्यावरील मराठी विस्तृत टीका दोन्ही शोभादायकच. दोन्ही मोगऱ्याचीच फुले,भाषारुपी वसंतातील!
एकंदरीत विचार करता गीतेतील तत्त्वज्ञानच या 20 ओव्यातून ज्ञानेश्वर सांगतात. वसंतांचा इतका विविधांगी विचार करणारे एकमेव ज्ञानेश्वरच. वसंत म्हणजे दोन महिन्याचा सृष्टी शोभा वाढवणारा कालावधी आहेच पण त्याच बरोबर वसंताचे कार्य करणारी व्यक्ती, वस्तू किंवा विचार म्हणजे वसंतच. म्हणून म्हणावे वाटते ज्ञानेश्वर रुपी वसंत या भारत वर्षात बहरला म्हणूनच गीतारूपी वनाची शोभा, जी ज्ञानेश्वरी, तिचा आस्वाद आपल्यासारख्या सामान्य भ्रमरांना घेता आला.
धन्य ते ज्ञानेश्वर आणि धन्य त्यांच्या ज्ञानेश्वरीतील वसंत!अशा या प्रतिभावंत ज्ञानेश्वरांना शतशः प्रणाम।
ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे क्रमांक जेथे वसंताचा उल्लेख आहे.
१)१/४३, २)१०/१६९, ३)११/११३,४)१३/१३६, ५)१३/१७८, ६)१३/९९१, ७)१४/२१, ८)१४/२९५, ९)१६/१२६, १०)१६/१६४,
११)१६/१६९,१२)१८/१५ , १३)१८/११२, १४)१८/१२४,१५)१८/३४५,
१६)१८/१५१९, १७)१८/१६३५, १८)१८/१७४०, १९)११/३३७,२०)३/१००,२१)६/१४९.
☆
लेखिका : सुश्री शालिनी लेले
प्रस्तुती – सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈