सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “तुपाची धार…” ☆ सुश्री शीला पतकी 

सोलापूरपासून जवळच असलेल्या एका खेड्यामध्ये आमचा कार्यक्रम होता कार्यक्रमानंतर आम्ही एका ब्राह्मण कुटुंबाकडे जेवायला गेलो ते वडिलांचे मित्र होते …सोबत आणखीन गावातली दोन ब्राह्मण माणसे होती घरातल्या बाईंनी खूप सुंदर स्वयंपाक केला होता अगदी छोट घर.. परिस्थिती अत्यंत सामान्य… चार माणसांना जेवायला बसता येईल इतकीच जागा आणि थोड्याशा उंचावर बाईंचं स्वयंपाकघर.. त्या मला म्हणाल्या “तु सगळ्या लोकांना वाढशील का म्हणजे मी गरम गरम पोळ्या करेन…” मी तेव्हा सातवीत होते म्हणजे बारा वर्षाचे वय असेल आणि मी म्हंटले हो… मी पानं घेतली. मीठ चटणी लोणचं एक भाजी आमटी भात भातावर वरण हे सगळं मी वाढलं त्या बाई पोळ्या करायला बसल्या! हे सगळं चुलीवर चाललं होतं.  तेव्हा लाईट वगैरे काही नव्हते जेवणाऱ्या मंडळीसमवेत एक कंदील होता आणि बाई स्वयंपाक करत होत्या तिथे एक चिमणी होती .मी सगळं वाढल्यावर त्यांना विचारलं भातावर तूप वाढायचं का? तर त्या म्हणाल्या हो आणि त्यांनी माझ्या हातात एक पितळेची वाटी दिली ज्यामध्ये दूध होतं आणि एक चमचा होता …मला वाटलं त्यांना बहुतेक अंधारात दिसल नव्हत ..मी म्हणाले काकू हे दूध आहे तूप नाही.. त्यांनी हळू आवाजात मला सांगितलं तूप नाहीये , संपले आहे.  दुधाचा एक एक चमचा भातावर वाढ म्हणजे ती मंडळी जेवायला बसतील. त्याप्रमाणे मी दुधाचा एक एक चमचा भातावर वाढला …

मंडळी जेवण करून उठले. माझ्या तोंडावरच प्रश्नचिन्ह त्यांना दिसत असाव बहुधा !मग मी आणि त्या जेवायला बसलो तेव्हा त्या म्हणाल्या.. “ खेडेगावात परिस्थिती खूप बिकट असते. त्यात आमच्या वाटण्या झाल्या.  तूप दररोज जेवणात आता जमत नाही, पण आपला ब्राह्मण धर्म आहे ना ..  भातावर तूप वाढल्याशिवाय कोणी जेवत नाही.. असे जेव्हा असते ना तेव्हा थोडेसे दूध वाढावे ..!” मला त्या फारसं  न शिकलेल्या बाईचं मोठं कौतुक वाटलं …

तेव्हा काही कळत नव्हतं पण तो प्रसंग माझ्या मनात कोरला गेला होता आणि आता त्याचा विचार करताना वाटतं की खरंच आपल्या स्त्रियांनी धर्मसंस्कार संस्कृती आणि आपली असणारी परिस्थिती याच्याशी किती उत्तम सांगड घातली होती आपल्या घरचे न्यून कधीही कोणाला दिसू दिले नाही ती प्रत्येक वेळ साजरी करत होत्या म्हटलं तर चुकीचं होणार नाही.. म्हणूनच स्त्री ही शक्ती आहे तिची भक्ती केल्याशिवाय संसार चालत नाही अडचणीतून मार्ग कसा काढावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्त्री… प्रत्येक प्रश्नाला सोल्युशन कसे मिळवावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्त्री ..किती प्रश्नांची ती सहज सोडवणूक करते आणि ते कुणाला कळतही नाही. आजही मी त्या बाईला मनापासून नमन करते आणि खूपदा गंमत म्हणून वरणभातावरती दूध घेऊन  पाहते त्या प्रसंगाची आठवण म्हणून—–!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments