सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ जुळले बंध नात्यांचे — ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

आज सकाळपासून देवयानीची धावपळ चालली होती. मावशी येणार होती ना आज तिची तिच्याकडे ! आपला हा आलीशान बंगला, नोकर-चाकर, दागदागिने, बघून केवढा आनंद होईल तिला, आणि हो ! तिच्यासाठी घेतलेली भारी पैठणी बघून किती खुश होईल आपली मावशी.आता माहेरच असं कुणी राह्यलच नाहीय्ये. हो एकुलता एक भाऊ, भावजय, भाची आहे म्हणा. पण आता काय त्याचं ? ती नाती तर केव्हाच तुटलीत. आपली आणि त्याची शेवटची भेट कोर्टात झाली होती. आई-बाबांच्या इस्टेटीची मागणी आपण केली, कोर्टात केस लढवली, आणि निकाल आपल्या बाजूने लागून आपण केस जिंकलो. तेव्हांपासून सबंध तुटले. भावाचं म्हणणं असं होतं की ‘ ताई जरा सबुरीने घे. सध्या मी अडचणीत आहे, त्यातून डोकं वर निघाल की,तुझा सगळा वाटा हिस्सा मी तुला नक्कीच परत करीन. ‘. पण देवयानीला आणि तिच्या मिस्टरांनाही दम नव्हता. हट्टाने वाटा हिस्सा हिसकावून घेतला होता, तिने आणि तिच्या नवऱ्याने. पण जाऊ दे आता काय त्याचं ? आपला वाटा, शिवाय आईची माळ, कर्णफुलं बाबांचे घड्याळ आणि अंगठी तर लाटली ना आपण. आणि आता भावाची, शंकरची परिस्थिती सुधारली असेलच की. मनांतले विचार झटकून तिने ड्रायव्हरला गाडी बाहेर काढायला सांगितली. क्षणभर लहानपणीचा शांत,समजूतदार शंकर तिच्या डोळ्यासमोर आला. आणि तिचं मन गलबललं. मनातला विचार झटकून मावशीला आणायला ती निघाली. मावशी आली.

आपल्या भाचीचा मोठा बंगला, नोकर-चाकर, सारं वैभव बघून मावशिला खूप खूप आनंद झाला. नंतरचे दोन दिवस अगदी मनसोक्त भटकण्यात गेले. रोज आवडीचे पदार्थ झाले. पंचपक्वान्ने झाली. आणि मावशीचा निघायचा दिवस उजाडला. दोन दिवसांपासून बोलू का नको, असा विचार करणारी मावशी आपल्या विचारांशी ठाम झाली. आणि देवयानीला जवळ बसवून म्हणाली ” हे बघ देवयानी, ताई आणि बाबासाहेब गेले तेव्हां मी परदेशात होते, त्यामुळे तुझ्यात आणि शंकर मध्ये कां दुरावा झाला, त्याबद्दल काहीचं माहिती नाही मला. पण एवढं मात्र कळलं की तुझ्या आईची आठवण म्हणून तू ताईचे बरेचसे दागिने हट्टाने शंकरकडून घेऊन आलीस. असं मला तिसरीकडून कळलं. मध्यंतरी शंकरची भेट झाली. तो खूप शांत आणि समजूतदार आहे गं ! त्याने आणि त्याच्या बायकोने काही म्हणजे काहीही तक्रार केली नाही माझ्या जवळ. तो फक्त एवढंच म्हणाला, ” “मावशी,आई बाबा, ताईचे तसे माझेही आई वडील होते. बाकी काही नाही पण, आई-बाबांची आठवण म्हणून आईचा फक्त एखादा दागिना, बाबांचं घड्याळ माझ्यासाठी ठेवलं असत देवयानीताईने, तर बरं झालं असतं. फक्त आई-बाबांची आठवण जवळ हवी म्हणून म्हणतोय. आणि आजीची आठवण असावी म्हणून वैदेहीच्या लग्नात तिला मी आईची माळ देणार होतो. वैदेहीवर फार जीव होता ना आजीचा “. देवयानी तुझ्याबद्दल शंकरनी आणि त्याच्या बायकोने काही म्हणजे काहीही तक्रार केली नाही. याचचं फार कौतुक वाटलं मला. तुझ्याबद्दल अजूनही आदर आहे त्यांच्या मनात. मावशी पुढे म्हणाली, ” देवयानी माझ ऐक, वैदेहीचं लग्न दोन दिवसावर आलं आहे. मदतीसाठी म्हणून मी आधीच इथून परस्पर शंकरकडे जायचं म्हणतेय. मोठं माणूस म्हणून कुणीतरी हवं ना त्यांच्या पाठीशी.. मला वाटतं हेवेदावे मागचं सगळं वैर विसरून तू पण यावंस माझ्याबरोबर”. देवयानी हट्टी होती.पण मनाने चांगली होती. तिच्या मनांत आलं बाई गं ! आपली लाडकी भाची इतकी मोठी झाली ? आपला शंकर तसा खूप हळवा आहे. लेकीच्या लग्नानंतर, तिच्या वियोगाने तो कासाविस होईल. आपल्या लग्नातच किती रडला होता तो. पाठवणीच्या वेळी आपण सासरी निघतांना तो दिसला नाही, म्हणून आपली नजर त्याला शोधत होती. आणि एका कोपऱ्यात हमसाहमशी रडत बसलेला आपला शंकर, आपला धाकटा भाऊ तिला दिसला. आणि मग एकमेकांच्या गळ्यात पडून अश्रूंचा बांध फुटला होता. सारं काही तिला आठवलं. तिचे ओघळलेले अश्रू पुसत शांता मावशी म्हणाली ” देवी तुझी चूक उमगून, तुला आता पश्चाताप झालाय हो नां ? अगं किती झालं तरी रक्ताचं नातं आहे तुमचं. असे सहजासहजी तुटणार नाहीत हे नात्याचे बंध. पश्चाताप झालाय ना तुला ? मग माझ ऐक बाळा! माझ्या बरोबर वैदेहीच्या लग्नाला चल. माझ्यासाठी भारी पैठणी घेतलीस ना, ती शंकरच्या बायकोला दे. मला एवढी जड साडी या वयात नाही ग पेलवत. शंकरला बाबासाहेबांचे घड्याळ दे. आणि तुझ्या लाडक्या भाचीच्या गळ्यात ताईची मोहनमाळ घाल. तुझ्याकडच्या अशा आहेराने खूप खूप आनंदित होतील गं ते तिघजण. तू चलच माझ्याबरोबर लग्नाला. ऐक माझं, देवयानी, ईर्षा आणि अहंकार यात जय शेवटी रक्ताच्या नात्यांचाच होतो, बरं का बाळ.!

आणि मग देवयानीला आपली चूक उमगली. ती ताडकन उठली.भराभर आहेराची तयारी झाली. आणि गाडी वेगाने धावत माहेरच्या वाटेने पळू लागली. माहेरच्या अंगणात मांडव सजला होता. सनईच्या सुरात गृहमखाची तयारी चालली होती. आणि कुणीतरी ओरडलं, “देवयानी आली ” सोवळं नेसलेला शंकर तीरासारखा धावला. आणि ताईच्या गळयात पडला. डबडबलेल्या आनंदाश्रूनी म्हणाला, “माझी ताई आली अहो बघा ! माझी ताई विसरली नाही मला. मुंडावळ्या सांवरत वैदेही पुढे झाली, आणि आत्याच्या कुशीत शिरत म्हणाली, “मला खात्री होती आत्त्या ! तू माझ्या लग्नाला येशील म्हणून”. प्रेमळ वहिनी तिला सोफ्यावर बसवत म्हणाली, ” उन्हातून आलात, दमलात नां वन्स ? हे सरबत घ्या बघू आधी. वहिनीच्या डोळ्यात तिला आईची माया,आईचं वात्सल्य दिसलं. आणि शंकर ! तो तर आनंदाने वेडाच झाला होता. आपल्या ताईला कुठे ठेवू अन् कुठे नाही असं झालं होतं त्याला. तो म्हणाला, “मावशिनी कोर्टापासून दुरावलेले आपल नातं जुळवून आणल. तिचे खूप उपकार आहेत माझ्यावर. देवीताई माय गेली आपली, पण माय सारखी माय माऊली मावशी, आई आपल्या साठी मागे ठेवून गेली आहे “. आणि मग दोघंही मावशीच्या पायाशी वाकले. मावशीने भरभरून आशिर्वाद दिला. “बाळांनो असंचं तुमचं बहीण-भावाचं नातं अतूट राहूं दे. अगदी शेवट पर्यन्त. एकमेकांना कधीही अंतर देऊ नका “.

— तर मंडळी.. असा झाला हा नात्यांचा गोड शेवट. रक्ताची काय आणि मानलेली नाती काय एकदा आपलं म्हटलं की कापलं तरी आपलंच असत. ह्या नात्याचे व्यवहाराच्या करवतीने कधीच दोन भाग करू नका. शेवट गोड झालेली अशी ही नात्यांची गुंफण नक्कीच तुम्हाला आवडेल हो नां ?

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments