श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ “सी. डी.” ☆ श्री सुनील शिरवाडकर

दुपारची निरव शांतता..विस्तीर्ण हिरवळीवर दाट व्रुक्षांच्या छाया पडल्या आहेत.त्याला लागुनच ऐसपैस ग्रंथालय..त्याच्या ऊंचच ऊंच काचांच्या खिडक्या.. आणि त्या खिडक्यांजवळ असलेली टेबल्स,खुर्च्या. तेथे बसलेली एक एक अलौकिक व्यक्तीमत्वे.कधी अब्दुल कलाम.. कधी अम्रुता प्रीतम..कधी गुलजार.. तर कधी नरसिंहराव.

हो..अशी एक जागा आहे दिल्लीत.’इंडिया इंटरनैशनल सेंटर’. तेथे नजरेस पडतील फक्त आणि फक्त प्रतिभावंत. मग ती कुठल्याही क्षेत्रातील असो.

देशातील विविध क्षेत्रातील नामवंतांना म्हणजे शास्त्रज्ञ, साहित्यिक, कलावंत,पत्रकार, राजनितिज्ञ,विचारवंतांना  एकत्र येण्यासाठी.. विचार विनिमय करण्यासाठी एक जागा असावी ही मुळ कल्पना डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची.हे असे केंद्र प्रत्यक्षात उभे करायचे तर त्यासाठी तश्याच उत्तुंग व्यक्तीमत्वाची गरज होती.

१९६० च्या आसपासची ही गोष्ट. संयुक्त महाराष्ट्र प्रकरणात वाद झाल्यामुळे डॉ.सी.डी.देशमुख मंत्रीमंडळातुन राजीनामा देऊन बाहेर पडले होते. पं.नेहरुंमध्ये आणि त्यांच्यामध्ये काही बाबतीत  मतभिन्नता जरुर होती.पण पं.नेहरु ‘सिडीं’ ची विद्वत्ता, योग्यता जाणुन होते. त्यांनी या प्रकल्पाची संपुर्ण जबाबदारी ‘सी.डीं. ‘ वर सोपवली. त्यांच्या सोबत होते जोसेफ स्टाईन…. एक अमेरिकन वास्तुविशारद. यांच्या विचारांवर..किंवा एकूणच व्यक्तीमत्वावर रवींद्रनाथ टागोरांचा प्रभाव होता.

सर्वप्रथम जागा निवड… नवी दिल्लीत लोधी गार्डन परीसर आहे. पाचशे वर्षांचा इतिहास असलेल्या या निसर्गरम्य परीसरातील जवळपास पाच एकराचा भूखंड निवडण्यात आला.बांधकाम सर्वस्वी वेगळ्या पद्धतीने करायचे ठरले. प्री फैब्रीकेटेड बांधकाम साहित्य आणि जोडीला ओबडधोबड दगड असा एक प्रयोग करण्यात आला. आणि हळुहळु सिडींना अभिप्रेत असलेली साधेपणात सौंदर्य शोधणारी वास्तु आकार घेऊ लागली.

प्रशस्त हिरवळीच्या पार्श्वभूमीवर असलेली ही देखणी वास्तू .. .प्रवेशद्वारापासूनच त्याचं वेगळेपण जाणवतं.आत प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला ग्रंथालय आणि सीडींच्या नावाचे भव्य सभागृह. सीडींना अभिप्रेत असलेली बौध्दिक सौंदर्य खुलवणारी ही वास्तू उभी करतांना कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यात आली नाही.

पन्नास सदस्यांनी सुरुवात झालेल्या ‘आयसीसी’ चे आजची सदस्य संख्या सात हजारांपर्यंत पोहोचली आहे. येथील सदस्यत्व मिळणे तितकेसे सोपे नाही. मोठी वेटिंग लिस्ट असते. वर्षोनुवर्षे प्रतिक्षा केल्यानंतर योग्य व्यक्तीस तेथे सदस्यत्व बहाल केले जाते. पण तरीही केंद्रात सत्ता असलेल्या पक्षाच्या समर्थक व्यक्तीला तुलनेने प्राधान्य दिले जाते. आणि ते साहजिकच आहे.

येथील सदस्यसंख्या मोठी आहे.. पण त्यात स्वाभाविकच वयस्कर अधिक आहे. नवीन रक्ताला वाव मिळुन नवीन तंत्रज्ञान, आधुनिकीकरण व्हावे अशी भावना तेथील तरुण प्रतिभावंतांची आहे.

सध्या ‘आयसीसी’ अनेक उपक्रम सुरु आहेत.थिंक टँक.. चर्चासत्रे.. संमेलने..पुस्तक प्रकाशने हो आहेतच.लंच किंवा डिनर पार्टीच्या निमित्ताने विचार, कल्पनांची देवाणघेवाण होत असते.

साठ वर्षे उलटुन गेल्यानंतरही या वास्तुचे सौंदर्य तसुभरही कमी वाटत नाही. आजही राजधानीतीलच नव्हे तर देशातील बुध्दीमानांना आकर्षित करुन घेणारे हे ‘आयसीसी’..आणि त्याचे शिल्पकार आहेत डॉ.चिंतामणराव देशमुख. येथील प्रमुख सभागृहाला त्यांचे नाव देऊन त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यात आल्या आहेत.

यंदाचे वर्ष म्हणजे सीडींचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्ष. बरोब्बर १२५ वर्षापुर्वी जन्म झालेल्या डॉ. चिंतामणराव देशमुख यांचे राजधानीत असलेले हे स्मारक समस्त मराठी जनांना अभिमानास्पद आहे यात शंका नाही.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments