सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ अत्रंगी… लेखक : रवीकिरण संत ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

तीन हा माझा अत्रंगी आतेभाऊ! वयाने माझ्याहून चार वर्षे लहान. बालपण त्याने आणि मी पुरेपूर एन्जॉय केले. आमची जाॅइंट फॅमिली नव्हती, पण घरे जवळ होती. त्यामुळे बरेचदा एकत्र रहाणे,जेवणे व्हायचे.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे त्याचे उद्योग आम्हाला चढत्या क्रमाने पहायला मिळाले. घरातील वातावरण बऱ्यापैकी धार्मिक. संध्याकाळी नितीन दिवेलागणीला हातपाय धुवून देव्हाऱ्यासमोर हात जोडून ‘शुभंकरोती’ म्हणायचा. कारण ह्यामुळे देव चांगली बुद्धी देईल, असे आत्याने त्याच्या मनावर बिंबवले होते.

नितीन अजिबात अभ्यास करत नसे. पहिलीत असताना सहामाही परीक्षेत नापास झाला, म्हणून आत्याने त्याला चांगलेच बदडले. त्यानंतर रात्री निजानीज झाल्यावर स्वयंपाक घरातून खलबत्त्याने कुटण्याचा आवाज येऊ लागला. आत्याने उठून, दिवा लावून पाहिले, तो काय, हा देव्हाऱ्यातल्या देवांना खलबत्त्यात घालून कुटत होता !

“अरे हे काय करतोस?” असे आत्याने विचारल्यावर ,” ह्यांचं इतकं केलं,पण काही जाण आहे का बघ! ” हे आत्याने नणंदाना कधीतरी उद्देशून बोललेले वाक्यच त्याने चपखलपणे तिला ऐकवले.

व्हा नितीन सात वर्षांचा झाला, तेव्हापासून जास्तच मस्ती करू लागला. माझी आत्या त्याच्या उपद्व्यापांनी हैराण व्हायची. त्यावरून त्याला ओरडाही मिळे. एकदा तो आत्याला म्हणाला,” आई, तूझ्या अशा आरडाओरड्याने चाळीत मला वेडीचा मुलगा म्हणतात!” ह्यावर आत्याला हसावे की रडावे हे कळेना.

तो चौथीत असताना, १९७० सालच्या १४ नोव्हेंबरला शाळेत बालदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा ठेवली होती. एकामागून एक मुले चाचा नेहरूंबद्दल भरभरून बोलत होती. पण नितीनचे भाषण हे स्वयंभू होते. नितीन बोल्ड तर होताच, पण सभाधीटही आहे हे मला त्यावेळी कळले. मी तेव्हा आठवीत होतो.        नितीन स्टेजवर उभा राहिला. एक नजर सर्वांवर फिरवून तो बोलू लागला –

“आज मी आपल्या सर्वांचे लाडके चाचा नेहरू यांच्याबद्दल चार शब्द सांगणार आहे.

चाचा नेहरूंचा जन्म १४ नोव्हेंबरला झाला. त्यांना मुले फार आवडायची. मुले दिसली की सर्व कामे सोडून ते मुलांत खेळत बसायचे. ते मोठे असल्यामुळे मुलेही त्यांना चाचा चाचा असे म्हणायची.

ते मुलांची खूप मस्करी करीत,” पुढे नक्कल करत नितीन सांगू लागला –

“चाचा त्यांना जीभ काढून वेडावून दाखवत.

त्यांचे केस ओढत.

त्यांचे गालगुच्चे घेत.

त्यांना टपला मारीत.

त्यांचे नाक ओढत.

त्यांच्या पोटाला चिमटे काढत.

त्यांच्या काखेत गुदगुल्या करत.

त्यांचे कान ओढून लांब करत.

त्यांना उचलून सूर्याची पिल्ले दाखवत.”

– – अशा रीतीने स्वतः करत असलेले सर्व चाळे तो नेहरूंच्या नावावर खपवू लागला तसतसे सर्व शिक्षक खो खो हसू लागले.हसण्याच्या गदारोळात आम्हाला पुढचे महत्त्वाचे मुद्दे ऐकूच आले नाहीत!

नितीनला बक्षीस मिळाले नाही, पण पुढचे बरेच दिवस ते भाषण आठवून सर्वजण, विशेषतः शिक्षक हसत होते.

त्यानंतर तो पाचवीत असताना १ ऑगस्टला टिळक पुण्यतिथीनिमित्त शाळेने वक्तृत्व स्पर्धा ठेवली होती. गतवर्षीच्या अनुभवानंतर एक अट ‘सांस्कृतिक शिक्षणा’च्या सरांनी स्पर्धेसाठी  घातली होती, ती म्हणजे कोणीही भाषणात शेंगा-टरफले आणि संत-स न त-सन्त हे शब्द जरी आणले तर याद राखा, इतर काहीही चालेल. याला कारण असे होते की बहुतेक सर्व मुले हेच किस्से अगदी अजीर्ण होईपर्यंत सांगत.

त्यामुळे प्रथमच मंडालेच्या तुरुंगात लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’सारखा अग्रलेख वगैरे नवी माहिती मिळाली.

मग नितीनचा भाषणासाठी नंबर आला. नेहमीच्या सहजपणे त्याने “लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली ह्या गावी झाला,”अशी दमदार सुरवात केली. – –  ” टिळकांची आई त्यांना रोज जेवणाचा डबा द्यायची. पण काही मुलांच्या आयांनी एकदा तो दिला नाही. मग त्या मुलांना खूप भूक लागली. शेवटी नाईलाजाने शाळेबाहेर गाडी लावून बसणाऱ्या भय्याकडून ते काही खाण्याच्या वस्तु घेऊन आले. त्या कोणत्या ते मी तुम्हाला सांगणार नाही.(असे म्हणून त्याने एकदा ‘सांस्कृतिक शिक्षणा’च्या सरांकडे पाहिले.) त्या वस्तू खाल्ल्यावर साहजिकच वर्गात कचरा झाला. सरांनी ‘हा कोणी केला’, असे दरडावले. कोणीच कबूल करेना, तेव्हा त्यांनी सर्वांना छडीने मारायला सुरवात केली. टिळकांपाशी येताच ‘मी तर डबा आणला होता’ असे म्हणून आपला रिकामा डबा त्यानी दाखवला व छडी घ्यायला नकार दिला. तसेच ‘इकडे तिकडे लक्ष न देता जेवण खाली मान घालून जेवावे अशी आईची शिकवण आहे म्हणून मी कचरा करणाऱ्यांकडे पाहिलेही नाही’ असेही ते म्हणाले.”

पुढे तो सांगू लागला, “एकदा मराठीच्या तासाला निबंध लिहीत असताना एकच शब्द तीन वेळा आला. तो कोणता हे मी तुम्हाला सांगणार नाही.( इथे पुन्हा एकदा नितीनने ‘सांस्कृतिक शिक्षणा’च्या सरांकडे पाहिले तर ते रागाने थरथर का कापताहेत हे त्याला कळेना ) पण टिळकांनी तीनही वेळेला तो वेगवेगळ्या प्रकाराने लिहिला. तेव्हा त्यांचे सर रागावले आणि त्यांनी फक्त पहिला बरोबर ठरवून पुढचे दोन शब्द चुकीचे ठरवले. पण टिळकांनी विक्रमादित्यासारखा आपला हट्ट सोडला नाही. ते म्हणाले, ” जर माझे पुढचे दोन शब्द चुकीचे असतील, तर माझ्या डोक्याची शंभर छकले होऊन माझ्याच पायावर लोळू लागतील.” यावर सरांनी पाच मिनिटे वाट पाहिली. पण तसे काही न झालेले पाहून पुढचे दोन्ही शब्द बरोबर ठरवले. तर मुलांनो, यातून आपल्याला खूप शिकण्यासारखे आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद.”

यावेळीही त्याला बक्षीस मिळाले नाही. पण त्यानंतर त्याच्या भाषणाला सर्व शिक्षक आवर्जून हजेरी लावू लागले.

नितीन नेहमी ऐकीव गोष्टीत आपला मालमसाला मिसळून ठोकून भाषण करीत असे. 

सातवीत असताना एकदा तर त्याने कहरच केला आणि त्यानंतर त्याची शाळेत मुख्याध्यापकांनी यथेच्छ धुलाई केली.

त्याचे असे झाले की २ ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त शाळेत वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती.

नितीनने, “अध्यक्ष महोदय, उपस्थित गुरूवृंद आणि वर्गमित्रांनो,” अशी छान सुरुवात केली.

महात्मा गांधींचा जन्म २ ऑक्टोबरला पोरबंदर येथे झाला. लोक त्यांना आदराने बापूजी म्हणायचे. ते अभ्यासात हुशार होते.  वकिली परीक्षा पहिल्या फटक्यात पास झाले.

त्यावेळी आपला भारत देश पारतंत्र्यात होता. इंग्रजांचे राज्य होते. इंग्लंडच्या कारखान्यात बनलेल्या वस्तूंनी बाजार भरले होते. अशावेळी बापूजींनी गावोगाव हिंडून स्वदेशीचा प्रचार केला. पॅण्ट- शर्ट घालणे सोडून ते फक्त पंचा वापरू लागले. एका हातात काठी आणि कमरेला पंचा अशी त्यांची मूर्ती पायी फिरून जनजागृती करू लागली. पंचाचा एक फायदा असा की प्रवासात सामानाचे ओझे नको. आंघोळ केली की आदल्या दिवशी घातलेल्या पंचाने अंग पुसायचे मग तो ओला झालेला पंचा वाळत टाकायचा आणि दुसरा वाळलेला गुंडाळला की झाले!   

लोकांना त्यांनी निर्भय होऊन इंग्रजांशी सामना करा, पण अहिंसा पाळा असे सांगितले. इथे लोक थोडे विचारात पडले, की मग काठी कशासाठी? बर्‍याच विचाराअंती लोकांच्या लक्षात आले की रात्री- अपरात्री फिरताना जर भटकी कुत्री मागे लागली तर त्यांना हाकलण्यासाठी ते योग्य साधन होते. 

बापूजी नेहमी बकरीचे दूध पित. कारण सतत बाहेर राहिल्यामुळे घरची गाय त्यांना ओळखेनाशी झाली. ते दूध काढण्यासाठी समोरून गेल्यावर ती शिंगे उगारू लागली व पाठीमागून गेल्यावर लाथा झाडू लागली. मग कंटाळून त्यांनी बकरीच्या दुधाचा पर्याय निवडला. 

आता भाषण ऐकणार्‍या शिक्षक वृंदात थोडी चुळबुळ सुरू झाली. मुख्याध्यापक अस्वस्थपणे ह्या हातातील वेताची छडी त्या हातात फिरवू लागले. आणि अचानक नितीनने बाॅम्ब टाकला !

” गांधीजींना दोन पत्न्या होत्या, एक कस्तुरबा आणि दुसरी विनोबा…” नितीनचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत चार ढेंगात मुख्याध्यापक त्याच्यापर्यंत पोहोचले. सपकन् वेताची छडी त्याच्या पायावर बसली. तसा तो कळवळून खाली बसला. पुढे त्याची यथेच्छ धुलाई झाली. पालकांना बोलावण्याचे फर्मान सुटले. 

नंतर त्याला कोणत्याही विषयावर भाषण करण्याची मनाई केली गेली, असे कळले.

पुढे मी SSC होऊन काॅलेजला गेलो. त्यानंतर इंजिनीअर होऊन नोकरीसाठी बाहेरगावी गेलो. नितीनच्या भेटी कमी झाल्या. माझ्या लग्नाला मात्र तो आत्यासह आला होता. पुढे तोही B.Com होऊन महाराष्ट्र बँकेत नोकरीला लागल्याचे कळले. 

एकदा गणपतीत १० दिवसांची सुट्टी घेऊन घरी आलो असता नितीनच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे कळले. मी लगोलग आत्याच्या घरी गेलो. तेथे आत्या चार- सहा मुलींचे फोटो व माहिती घेऊन बसली होती. ती शनिवारची दुपार होती. नितीनचे वडील ऑफिसातून घरी आले नव्हते. नितीनला सेकंड सॅटरडेची सुट्टी होती. घरात आत्या, नितीनची आजी आणि नितीन ह्यांच्याबरोबर मीही फोटो बघण्याच्या कार्यक्रमात सामील झालो.

त्यातील एक मुलगी फोटोवरून नितीन आणि आत्याला आवडली. तिची माहितीही चांगली वाटली. कुणास ठाऊक, पण नितीनच्या आजीला ती फारशी आवडल्याचे दिसले नाही. आत्या सांगू लागली, 

 “मुलगी गोरीपान आहे.”

 ” रंग काय चाटायचाय?”आजी उत्तरली.

” मुलीचे डोळे किती सुंदर आहेत!”

 “डोळे काय चाटायचेत ?” आजी नाक मुरडत म्हणाली.

 ” मुलीकडे फर्स्ट क्लास डिग्री आहे.”

” डिग्री काय चाटायचीय?” आजी तिरसटपणे म्हणाली.

आता मात्र नितीनचा संयम सुटला. वळून तो म्हणाला, ” आज्जी, नक्की काय चाटायचं असतं, ते जरा सांगशील का?” 

या अनपेक्षित प्रश्नाने आजी कावरीबावरी झाली.

पण लगेच माझ्या आत्याने पुढे सरसावत त्याच्या साटकन् कानाखाली वाजवली आणि तिथून चालते व्हायला सांगितले. 

मी हळूच काढता पाय घेतला. माझ्यामागून नितीनही गाल चोळत बाहेर पडला. रस्त्यात मला म्हणाला, ” दादा, पुढे बायकोसमोरही आई मला असेच मारेल का रे?” 

मी गंभीरपणे म्हणालो,

” पुरुषाची कधीही मारापासून सुटका नसते. शहाणा असेल तर शब्दाने, मूर्ख असेल तर व्यवहारात, नेभळट असेल तर समाजात आणि चावट असेल तर असाच कधीतरी मार तो खातो.”

“दादा, तू यातल्या कोणात बसतोस?” नितीनने मौलिक प्रश्न केला, पण मला उत्तर द्यायचे नव्हते !

लेखक :श्री. रविकिरण संत

©  सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments