श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ ’गिली’ सूट ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
त्या भयाण वाळवंटात नजर जाईल तिथवर फक्त क्षितिजाला स्पर्श करणारी तापली वाळूच दिसत होती. आणि याच वाळूत तो मागील सोळा तासांपासून पालथा पडून आहे. त्याचे डोळे मात्र त्याच्या रायफलच्या नळीवरल्या दुर्बिणीमधून सतत समोर काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करताहेत. पापणी लवण्याच्या दरम्यानचा काळही त्याला नकोसा आहे. त्याच्या समोर शंभरेक मीटर्स अंतरावर एक पडकी भिंत आहे. त्या भिंतीच्या पलीकडे काय याचा त्याला अंदाज नसला तरी भिंतीच्या शेजारी आडोशाला आपल्या सारखीच रायफल,आपल्यासारखीच दुर्बिण डोळ्यांना लावून कुणीतरी आपल्याकडेच पहात आहे गेल्या सोळा तासांपासून याची त्याला स्पष्ट जाणिव आहे. या सोळा तासांच्या मध्ये एक संपूर्ण रात्रही संपून गेली आहे. पण याला जराही हालचाल करण्याची परवानगी नाही…कारण जराशी हालचाल म्हणजे शरीराची हालचाल कायमची संपून जाण्याची नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव दशांश टक्के खात्री…बाकी एक दशांश म्हणजे नशीब!
या गेल्या सोळा तासांमध्ये त्याच्या आजूबाजूला त्याचेच साथीदार असेच दूर कुठेतरी त्यांच्या त्यांच्या निशाण्यांकडे अक्षरश: डोळे लावून बसलेले असतीलही कदाचित. पण युद्धाच्या धुमश्चक्रीत इतकी चौकशी करीत बसायला वेळ आणि गरजही नव्हती म्हणा! याला एक लक्ष्य दिलं गेलं होतं…ते भेदायचं आणि पुन्हा शांतपणेच नव्हे तर अगदी पाषाणासारखं पडून रहायचं होतं..दुसरं लक्ष्य दिलं जाईल तोवर.
भिंतीपाशी कुठलीही हालचाल नव्हती गेल्या सोळा तासांपासून. आणि हे तास आता वाढतच चालले होते बेटे! तसं त्याला प्रशिक्षण आणि सराव होता कित्येक तास खरं तर दिवस एकाच जागी लपून बसायचा..त्याला छद्मावरण म्हणतात. म्हणजे जिथे आपण आहोत तिथल्या जमिनीशी,मातीशी,झाडांशी पूर्णपणे एकरूप होऊन जायचं. झाडं तरी हलू डुलू शकतात….पण यांच्याबाबतीत हालचाल म्हणजे मृत्यूला मिठी…स्वत: होऊन मारलेली मिठी!
असेच आणखी चार तास निघून गेले. कोण कशाला इतका वेळ लपून बसेल आपल्यावर गोळी डागायला? आणि तिकडून गोळी आलीच तर त्याचाच ठावठिकाणा नाही का लागणार आपल्या माणसांना? गोळी उडाली की ठिणगी उडतेच की…किमान धूर तरी दिसतोच दिसतो! शेवटी मनाचा खेळ! संयमाचा खेळ! जो हलला तो संपला या खेळात! आणखी साडेतीन तास गेले. एकूण साडेतेवीस तास उलटून गेलेत…हा खरा एलेव्हन्थ अवर सुरु आहे म्हणायचा. तो स्वत:शीच पुटपुटला आणि त्याने दुर्बिणीला लावलेले डोळे किंचित वर केले…त्याबरोबर त्याचे डोकेही अगदी एखाद्या इंचाने वर उचलले गेले…आणि…..थाड! एकच गोळी!…काम तमाम!
हा आवाज ऐकून त्याच्या शेजारील वाळूतही हालचाली झाल्या….रायफली धडाडल्या…आता लपून राहण्यात काहीही हशील नव्हता! पण यावेळी समोरच्यांनी लढाई जिंकली होती…यांच्यापेक्षा जास्त वेळ स्तब्ध राहण्यात अंतिम यश मिळवून !
समोरासमोरची हातघाईची लढाई करण्याचे दिवस बंदुकांच्या शोधाने संपवून टाकले. लपून बसून अचानक गोळीबार करण्याचेही दिवस असताना छद्मावरण धारण करून प्रतिस्पर्ध्याला बेसावध गाठून यमसदनी धाडण्याची कला विकसित झाली….स्नायपर्स! या शब्दाचं स्पेलिंग स्निपर असा उच्चार करायला भाग पाडतं काहीजणांना. खरं तर इंग्रजी भाषेत एका अगदी लहान,चपळ पक्षाला स्नाईप हे नाव आहे. याची शिकार करणं खूपच अवघड. जरा कुठं हालचाल झाली का हा पक्षी प्रचंड वेगाने उडून जातो. आणि याची शिकार करणारे मग स्नायपर या नावाने ओळखले जाऊ लागले.
युद्धात प्रतिस्पर्ध्याची अशा प्रकारे लपून शिकार करणा-यांना मग स्नायपर हे नाव पडले…१८२०च्या सुमाराचे हे वर्ष असावे. या प्रकारात अत्यंत दूर असलेल्या एकांड्या शत्रूला,त्याला दिसणार नाही अशा ठिकाणी लपून राहून गोळीने अचूक उडवणे हे स्नायपर्सचे काम. आणि इकडे स्नायपर असेल तर तो त्या विरुद्ध बाजूलाही असणारच. अशा स्थितीत जो आपले अस्तित्व शत्रूला जाणवू देणार नाही त्याची सरशी होणार,हे निश्चित. नव्या युद्धतंत्रात स्नायपरच्या जोडीला आणखी एकजण असतो..एकाने पहायचे…लक्ष्य निश्चित करायचे आणि दुस-याने रायफलचा ट्रिगर दाबायचा! हे तंत्र खूपच परिणामकारक आहे. सीमो हेह्या नावाचा फिनीश स्नायपर दुस-या महायुद्धात रशिया विरोधात लढला…याने पाचशेपेक्षा अधिक सैनिकांना एका एका गोळीत संपवून टाकल्याचा इतिहास आहे.
आसपासच्या वातावरणाशी मेळ असणारे किंवा तसा भास करून देणारे छदमावरण तयार करणे,तशी वस्त्रे अंगावर घालणे याला कॅमॉफ्लॉज असा शब्द आहे..camouflage!
यात झाडांच्या फांद्या,पाने,गवत आणि तत्सम गोष्टी अंगावर घातल्या जातात आणि अंग झाकले जाते. तोंडाला विविध प्रकारचे रंग फासले जातात…जेणेकरून शरीर सभोवतालच्या वातावरणाशी एकरूप होऊन जावे. या प्रकारच्या वेशभूषेला “ गिली सूट (Ghillie Suit) “असे नाव आहे. गिली हे एका बहुदा काल्पनिक वन्य व्यक्तिरेखेचे नाव होते. तो अंगावर असेच गवत,पाने लेवून जंगलात फिरायचा…आणि त्याला लहान मुलांविषयी अत्यंत प्रेम असे. असो.
तर भारतीय सैन्याने या कलेवर खूप आधीपासूनच पकड मिळवली आहे. कोणत्याही वातावरणात,हवामानात आपले जवान एका जागी कित्येक तास आणि दिवसही स्थिर राहू शकतात. झाडांसारखे, दगडांसारखे निश्चल राहू शकतात आणि कित्येक मीटर्सवर असलेल्या दुश्मनाच्या मेंदूच्या चिंधड्या उडवू शकतात. महत्त्वाच्या व्यक्तींच्या हत्येसाठी जसा परदेशात असे स्नायपर कार्यरत असतात, तसे आपल्याकडे अशा व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठीही स्नायपर्स असतात…फक्त ते सामान्य लोकांच्या नजरेस पडत नाहीत!
स्नायपर म्हणून प्रशिक्षण घेणं खूप अवघड. यात शारीरिक,मानसिक कसोटी लागते. एकांतात इतका वेळ,एकाच स्थितीत पडून,लपून राहणे काही खायचे काम नाही. यात पुरुष सैनिक आजवर मक्तेदारी राखून होते. पण मागील दोनच महिन्यांपूर्वी या स्न्यापर्समध्ये एक महिला सामील झाली…तिने आठ आठवड्यांचे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक प्रशिक्षण प्राप्त केले आणि आज ही महिला सैनिक स्नायपर्सना प्रशिक्षण देणारी एकमेव महिला सैनिक बनली आहे. या आहेत सीमा सुरक्षा दलात अर्थात बी.एस.एफ.(बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) मध्ये सब-इन्स्पेक्टर म्हणून सेवा करणाऱ्या सुमन कुमारी. त्यांच्या रायफलमधून ३२०० कि.मी.प्रति तास वेगाने लीलया गोळी सुटते आणि लक्ष्याचा अचूक वेध घेते…आणि गोळी चालवणारे हात जराही डळमळत नाहीत…गोळी कुठून आली हे कुणालाही समजत नाही. गिली सूट घालून या कुठे बसल्यातर अजिबात दिसून येत नाहीत…त्या स्वत: हलल्या तरच दिसतात! सुमनताईंचे वडील साधे इलेक्ट्रीशियन तर आई गृहिणी आहेत. हिमाचल प्रदेशातील मंडी या छोट्याशा खेड्यातून आलेल्या सुमन कुमारी २०२१ मध्ये बी.एस.एफ.मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाल्या आणि पंजाब मध्ये एका मोहिमेत एका तुकडीचे नेतृत्व करीत असताना त्यांना सीमेवरून अचूक गोळ्या डागणाऱ्या शत्रूच्या स्नायपर्सच्या भेदक ताकदीचा अंदाज आणि अनुभव आला..आणि त्यांनी स्नायपर होण्याचा निश्चय केला. ५६ पुरुष सैनिकांच्या तुकडीत या एकट्या महिला होत्या. इंदोरच्या सेंट्रल स्कूल ऑफ वेपन्स अॅन्ड टॅक्टीक्स मध्ये त्यांनी आठ आठवड्याच्या प्रशिक्षणात अव्वल स्थान मिळवत इन्स्ट्रक्टर म्हणून दर्जा हासिल केला!
सुमन कुमारींचा अभिमान वाटावा सर्वांना. इंग्रजीत असलेली ही माहिती जमेल तशी लिहून तुमच्यापर्यंत पोहोचवली..तुम्ही तुमच्या जवळच नका ठेवू. न जाणो आपल्यातल्या एखाद्या सुमनताईला स्फूर्ती मिळेल !
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈