कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 224 – विजय साहित्य
☆ अबोला…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(मात्रा वृत्त)
☆
वेलीवरल्या, दोन फुलांनी,
कोण अबोला, धरला आहे
उडून गेले, रंग तरीही
गंध त्यातला,जपला आहे.
*
पानोपानी, खट्याळ खोडी
अजून त्यांचा, दंगा चालू
आहे खात्री, परस्परांना
लळा जिव्हाळा,उरला आहे.
*
येतो कोणी,जातो कोणी
देखभाल ती, नावापुरती
सोबत आहे, जुनी जाणती
वसंत देही, मुरला आहे.
*
आहे मैत्री,अतूट नाते
कुणी कुणाला,सांगायाचे
अनुभव खासा,अनुभूतीचा
मौनामध्ये, भरला आहे.
*
क्षिणली आहे, पिचली आहे
तरी घालते, कुणा साकडे
त्या वेलीचे, नाते हळवे
ऋतू बोलका,सरला आहे.
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈