सौ. रेखा दयानंद हिरेमठ
पुस्तकावर बोलू काही
☆ ‘कथास्त्री’ – संपादक : श्री अशोक लेले / श्री प्रकाश पानसे ☆ परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆
पुस्तक – कथास्त्री
संपादक – श्री अशोक लेले / श्री प्रकाश पानसे
परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ
कथास्त्री हे पुस्तक म्हणजे कथाश्री या दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या जेष्ठ लेखिकांच्या कथांचा संग्रह आहे. वसुंधरा पटवर्धन,गिरिजा कीर,विजया राज्याध्यक्ष,ज्योत्स्ना देवधर,शैलजा राजे, मंदाकिनी गोगटे, मंगला गोडबोले,अनुराधा वैद्य व प्रमोदिनी वडके-कवळे यांच्या कथा या पुस्तकात आहेत.या पुस्तकातील सर्व कथा स्त्री आणि तिचे भावविश्व याचे प्रभावी वर्णन करणाऱ्या आहेत. प्रवाही लेखन शैली आणि सर्वच कथा वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या आहे
वसुंधरा पटवर्धन यांच्या आसरा या कथेमधील गंगाबाई या वयस्क स्त्रीचे देवळात भेटलेल्या अनोळखी स्त्री बरोबराने हक्काने वागणे सुरुवातीला खटकते पण स्वतःचा मुलगा आणि सून असताना देखील त्या वयस्क स्त्रीला एका अनोळखी स्त्रीमध्ये भावनिक आसरा का शोधावा लागतो हे वाचून मन सून्न होते.या कथेमध्ये एका वयस्क सासूची हातबलता अधोरेखित केली आहे.
गिरीजा कीर त्यांची त्याची चाहूल ही कथा वेदवती या अनाथ मुलीची आहे.तिचे आई वडील कोण होते तिला हेही माहित नसल्याने अनाथपणाच्या ओझ्याखाली दबून गेलेली ती आपल्या आयुष्याचे बरे वाईट करून घेण्या आधीच तिला सत्य समजते आणि अघटित कसे टळते. आपले वडील युद्धात शहीद झालेले असून समाजाच्या विरुद्ध जाऊनही आपली जिद्दी आई आपल्याला जन्म देते हे समजल्यानंतर वेदवती मध्ये अक्षरशः उत्साह संचारतो.या कथेत त्याची चाहूल म्हणजेच अचूक वेळी काही दैवी संकेत मिळणे व त्याचा अर्थ उलगडणे हे कसे घडते ते विस्तृत पणे मांडले आहे.
मंगला गोडबोले यांच्या ताजवा या कथेत विषम आर्थिक परिस्थितीतील मैत्रिणींची कथा खूप विचार करायला लावणारी अशी आहे.आपल्यापेक्षा आर्थिक स्थिती उत्तम असणाऱ्या मैत्रिणी च्या घरी गेल्यानंतर दुस-या मैत्रिणीला खूप अवघडलेपण येते व जेव्हा त्या मैत्रीणीची दुखरी बाजू तिच्या मैत्रिणीला समजते तेव्हा तिचे ते अवघडलेपण कमी होऊन पुन्हा त्यांचे नाते पूर्वपदावर येते. अशा आशयाची ही कथा मनाला सुन्न करून जाते.
एखाद्याचं सर्वच बाबतीत चांगलं कसं असू शकतं याचं मानवाला पडणारं कोडं आणि त्या माणसाची दुखरी नस सापडल्या नंतर होणारे समाधान ही भावना या कथेत मांडली आहे.
खरे तर मंगला गोडबोले यांची कथा आहे म्हणजे विनोदी वाचायला मिळेल असे मला वाटले होते.पण मनाला चटका लावून जाणाऱ्या भावनेला लेखिकेने खूप सुंदरपणे गुंफले आहे
अनवाळ अनवाळ या शब्दाचा अर्थ उनाड असा आहे.ही कथा अगदी आजच्या काळातीलच वाटते. आई-वडील खूप प्रयत्न करून मुलाला शिकवतात पण मुलगा शिक्षणाला खूप महत्त्व न देता वायफळ वेळ दवडतो.जेव्हा त्याला आपल्या आई-वडिलांना सोडून शिक्षणासाठी परगावी जावे लागते तेव्हा त्याला आपली चूक व आई-वडिलांची किंमत कळून येते. ही कथा आई वडीलांची काळजी व मुलांची बेफिकिरी यावर भाष्य करते.
भैरवी या कथेत लेखिका मंदाकिनी गोगटे यांनी एका प्रख्यात गायिकेच्या मुलाची चुकीचे करिअर निवडल्याने संपूर्ण कुटुंबाची कशी फरफट होते हे वर्णन केले आहे मालिनीताई,शमा, व्रजेश,अभंग ही पात्रे यांनी खूप उत्तम रीतीने रेखाटली आहेत.
माणकांचं तळं ही कथा देवयानी नावाच्या अत्यंत बुद्धिमान व कर्तबगार स्त्रीची आहे.खरे पाहता स्त्रियांना आपल्या सौंदर्यावर खूप अभिमान असतो पण स्वतः च्या सौंदर्यामुळे देवयानीच्या अंगभूत कलागुण जसे की कर्तबगारी, बुद्धिमत्ता, समंजसपणा,धैर्य अशा एक न अनेक गुणांना दुय्यम दर्जा मिळत असतो. असे झाल्याने स्वतःच्या सौंदर्याचाच राग येणारी देवयानी ची व्यक्तिरेखा लेखिका प्रमोदिनी वडके-कवळे यांनी खूप सुंदर पण रेखाटली आहे अशा या तिच्या सौंदर्याला लेखिकेने माणकाचं तळं असं संबोधलं आहे.इतरांना हेवा वाटणाऱ्या सौंदर्यामुळे देवयानी ची कुचंबणा क्लेशदायी तर आहेच तसेच एक नवल निर्माण करणारी आहे.
या कथासंग्रहातील सर्वात कथा शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवतात. अशा या सिद्धहस्त लेखिकांची स्त्रियांचे भावविश्व उलगडणारी लेखन शैली मनाला भावते तसेच विचार करायलाही उद्युक्त करते.
© सौ. रेखा दयानंद हिरेमठ
सांगली – मो.नं 9552298887
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈