प्रा. डॉ. सतीश शिरसाठ
☆ राजकन्येची आई… — ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆
गेल्या वर्षी इंग्लंडमुक्कामी असताना,आमच्या मुलीनं चार दिवस स्काॅटलंडला जाण्याचं नियोजन केलं होतं. एडिंबरो ह्या स्कॉटलंडच्या राजधानीत आमचा मुक्काम होता. समृध्द प्राचीन परंपरांचे अवशेष तिथे जपून ठेवले आहेत. ते पाहून झाल्यावर एक दिवस जवळच्या समुद्रकिनारी आम्ही फिरायला जाणार होतो.
सकाळीच तयार होऊन तिथल्याच एका हाॅटेलात नाष्टा करून आम्ही एका बसने समुद्राकडे जायला निघालो.
हवा थंड होती.पण तिकडच्या लोकांना सवय म्हणून बहुतेक लोक टी शर्ट आणि बर्मुडा घातलेले होते.
काही वेळ बसमधून बाहेर पहात होतो. निसर्गसौंदर्याची अनेक रूपं, बसच्या आत आणि बाहेर चकाचक स्वच्छता ,लोकांची सौजन्यपूर्ण वागणूक मी इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये नेहमीचं आहे. त्यामुळे त्यात नवीन वाटत नव्हते. मी बसमध्ये पाहिलं.सगळीकडं स्तब्ध शांतता होती.अनेकजण आपापल्या मोबाईलमध्ये दंग होते तर काही डुलक्या घेत होते.
माझ्या पुढच्या सीटवर एक जोडपं बसलं होतं. ते पाठमोरे होते. तरीही त्यांच्या खांद्यावरचा भाग स्पष्ट दिसत होता. दोघंही उंच होते. तरीही तिची शरीरयष्टी नाजूक होती. तिनं केसांचा बाॅबकट केला होता.
गडद निळ्या रंगाचा झिरझिरीत फ्राॅक तिनं घातला होता. ती राजकन्येसारखी आकर्षक दिसत होती.
कडेच्या खिडकीतून ती बाहेर पहात होती. तिच्या मानाने तो खूप दणकट वाटत होता.दाट मिशा आणि डोक्यावरचे उभे राहिलेले केस यामुळे मला तो हिंदी सिनेमातल्या व्हिलनसारखा वाटत होता. थोड्या वेळात त्या व्हिलननं राजकन्येच्या खांद्यावर आपला हात टाकून तो तिला हसवायचा प्रयत्न करू लागला.ती शांत होती.
मनात विचार करू लागलो; सुंदर मुलींवर जाळं टाकणं हा बलिष्ठांचा जगभर चालू असणारा धंदा दिसतो.
त्याच्या प्रयत्नाला ती फशी पडली वाटतं, कारण तिनंही त्याच्या खांद्यावर आपली मान ठेवली. मला तिची कीव आली तर त्याची चीड.
टिपीकल हिंदी सिनेमाची कथा मी मनात रंगवू लागलो. प्रवास कधी संपला ते कळलंच नाही. एका मैदानात बसच्या ड्रायव्हरने बस उभी केली.आमचं डेस्टीनेशन आलं होतं. समोर प्रचंड मोठा जलसागर पसरला होता.त्यावर अजस्र पूल होते.बाहेर आलो. थंडी बोचत होती. मीही पत्नी आणि मुलीसोबत थंडीचे कपडे घालून सगळेजण जात होते तो अथांग समुद्र पहायला गेलो.
सहज लक्ष गेले ते जोडपेही मला दिसले आणि धक्काच बसला.त्या सुंदर राजकन्येला उजवा हातच नव्हता. तिच्या बाॅबकटचे कारण समजून आले. मी पहात होतो. त्याने आपल्या अंगावरचं जर्कीन काढून अलगद तिच्या अंगावर ठेवलं. पाण्याला जोर खूप होता म्हणून ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय करून ठेवले होते.शिवाय अनेक सुरक्षारक्षकही लोकांना सूचना देत होते. तो तिच्या खांद्यावर हात ठेवून सगळी माहिती देत होता.
काही वेळात एक छोटीशी बोट येऊन उभी राहिली. त्याला फेरी म्हणतात. लोखंडी जिन्यावरून फेरीवर जायचं होतं. मी एका सीटवर बसून पहात होतो. तिला नीट चढता येत नव्हतं. तिला आधार देत त्याने तिला वर चढवलं. फेरीचा वेग वाढत होता. निसर्गाच्या आणि मानवी कर्तृत्वाच्या अनेक यशोगाथा आम्ही त्या स्फटिकशुभ्र जलाशयावर पहात होतो. फेरीवर जमलेली विविध रंगाची माणसं आनंदाने चेकाळली होती. मधूनच पाण्यात ती फेरी हिंदकळत होती. तेव्हा स्वतःला सावरण्याची कसरत करताना गमतीचे अनेक प्रकार घडून येत होते.
ती दोघं आमच्या जवळच्याच लाकडी बाकावर बसले होते.तिनं डाव्या हातानं फेरी पकडली होती,तरीही तिचा तोल जात होता.तो तिला आधार देत उभा होता.
फेरी शांत झाल्यावर त्याने आपली बॅग उघडून कसला तरी बिस्कीटचा पुडा काढून एक बिस्किट तिच्या तोंडात दिलं. फेरी हिंदकळली, तशी तिच्या तोंडातून बिस्किट खाली पडलं. मग त्याने एका हातानं तिला सावरत दुसर्या हातानं नवीन बिस्किट काढून तिच्या तोंडात दिलं……. एखादी पक्षीण आपल्या पिलाच्या चोचीत अन्न भरवते तसा मला तो आता वाटू लागला आणि त्याच्याविषयीचा राग जाऊन ती जागा आदराने घेतली.
© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ
सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈