चित्रकाव्य
ठराव / आखाडा – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर ☆
सुश्री नीलांबरी शिर्के
(१) ठराव
☆
कधी भुंकायचं !
किती भुंकायचं !
आताच ठरवून
लक्षात ठेवायचं
नंतर आपापला
एरिया सांभाळायचं
भुंकून भागलं नाही
तर चावे घेत सुटायचं
किती सज्जन असो
समोर लक्ष ठेवायचं
विरोधी आपला नसतो
आपण फक्त भुंकायचं
पोटाला तर मिळतंच
काळजी का करायची
संधी मिळाली की मात्र
तुंबडी आपली भरायची
आपल्या अस्तित्वाची
भुंकणं ही खूण आहे
पांगलो तरी जागे राहू
चौकस नजर हवी आहे
खाऊ त्याची चाकरी करू
म्हण जुनी झाली आहे
रंगानं, अंगानं वेगवेगळे
तरी काम आपलं एकच आहे
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
☆☆☆☆
श्री आशिष बिवलकर
(२) आखाडा
☆
गल्लीबोळातले जमलेत श्वान,
म्हणे एकत्र येऊन सर्व भुंकू |
आज नाही उद्या,
सिंहाशी आपण नक्कीच जिंकू |
*
सिंह फोडेल डरकाळी,
जराही विचलित नाही व्हायचे |
भुंकण्यापलीकडे आपण,
काहीच नाही करायचे |
*
आपले भुंकणे ऐकून,
इतर प्राणीही देतील साथ |
जंगलाच्या राजाला,
मारतील जोरात लाथ |
*
आपण एकत्र भुंकतो आहोत ,
येईल सहानुभूतीची लाट |
शेपटीवाले करतील मतदान,
लावतील सिंहाची वाट |
*
संख्याबळाच्या जीवावर,
आपल्यास मिळेल राजाचे पद |
सहा सहा महिने एकेकाने,
वापरून घ्यायचा सत्तेचा कद |
*
श्वानसभेचे जाणावे तात्पर्य एक,
अंगी कर्तृत्व जरी असले गल्लीचे |
एकत्र येऊन आज सगळे,
मनी बांधत आहेत आखाडे दिल्लीचे |
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈