डॉ. मुग्धा सिधये – तगारे
पुस्तकावर बोलू काही
☆ “तुरुंगातील सावल्या…” – मूळ लेखक : रूझबेह भरूचा – अनुवाद : सुश्री लीना सोहोनी ☆ परिचय – डॉ. मुग्धा सिधये – तगारे ☆
पुस्तक – तुरुंगातील सावल्या
लेखक – श्री रूझबेह भरूचा
अनुवाद – सुश्री लीना सोहोनी
परिचय : डॉ. मुग्धा सिधये – तगारे
भारतीय तुरुंगामध्ये शिक्षा भोगत असलेल्या वा खटल्याच्या सुनावणीच्या प्रतिक्षेत असलेल्या स्त्रिया व त्यांची लहान मुले या विषयावर रूझबेह भरूच्चा यांचं हे पुस्तक. पुणे, दिल्ली, भुवनेश्वर,श्रीनगर इत्यादी ठिकाणच्या तुरुंगाना भेटी देऊन तिथल्या स्त्री कैदयांच्या व मुलांच्या मुलाखती देऊन लिहिलेलं हे अनुभवस्पर्शी व आगळं वेगळं पुस्तक…!
मुळातच कैदी किंवा गुन्हेगार हा शब्द आला की आपली दृष्टी पूर्वग्रहदूषित असते. त्यांनी काही तरी वाईट काम केलं आहे म्हणून त्या शिक्षा भोगत आहेत. गृहितालाच काही वेळा धक्का बसतो हे पुस्तक वाचताना ! त्यांची ५ वर्षाखालील वयाची मुलं त्याच्याबरोबर तुरुंगात रहात असतात, वाढत असतात त्यांचा काहीही गुन्हा नसताना ! तुरुंगात बहुतांश वेळा त्यांच्यासाठी वेगळ्या काहीही सोयी नसतात. आणि त्यामुळे त्यांचं बालपण होरपळून जातं. ह्या बाबतीत संवेदनशीलपणे विचार व कृती केली. डॉ. किरण बेदी यांनी तिहार जेलची IG झाल्यावर त्यांनी इंडिया फाउंडेशन सारख्या NGO च्या मदतीने तुरुंगामधे मुलांसाठी पाळणाघर.गरोदर स्रियांसाठी बाळंतपणाची सोय. चांगला आहार इत्यादी अनेक अमूलाग्र बदल केले.माणूसकी व अनुकंपा,नेतृत्वगुण,सचोटी, वेगळा नाविन्यपूर्ण विचार, कल्पकता इत्यादी गुणांमुळे डॉ. किरण बेदींनी तुरुंगामध्ये इतिहास घडवला.ज्याची जगाने मॅगसेसे पुरस्कार देऊन दखल घेतली. दुदैवाने त्यांच्या बदलीनंतर सार काही तसंच राहिलं नाही.
हया कैंदीच्या स्त्रियांच्या व त्यांच्या मुलांच्या भावविश्वाची दखल लेखकाने खूपच संवेदनशीलतेने घेतली आहे. 5व्या वर्षानंतर त्या बिचाऱ्या मुलाला किंवा मुलीला दूरवर कुठे तरी अनाथआश्रमात पाठवण्यात येते. आई असूनही ममतेला आईच्या वात्सल्याला स्पर्शाला ती पारखी होतात, झुरत राहतात.
एकूणच लेखकाबरोबर जेव्हा आपला हा तुरुंगातल्या भेटीचा प्रवास मनाने होतो. तेव्हा, तुरुंगातल दाहक वास्तव पाहून धक्का बसतो. भारतीय न्यायव्यवस्था, पोलिस यंत्रणा ,तुरुंगाधिकारी, कैद्याविषयींचे कायदा या सार्यामधल्या त्रुटी समन्वयाचा अभाव, दुरावस्था पाहून यामध्ये अमूलाग्र सुधारणा व त्याच्या अंमलबणीची गरज जाणवते.
कित्येक निरपराध स्त्रिया नाहक (व्यवस्थेच्या बळी ठरून) जेलमधे वर्षानुवर्षे सडत राहतात. केवळ जामिन भरायला काही हजार रुपये नाहीत म्हणून・・・・ तर कधी व्यवस्थेशी पंगा घेतल्याबाबत सुशिक्षित सुसंस्कृत माणसांना हयात ढकलं जातं. हे वाचून मन विदीर्ण होते.
हया पुस्तकात शेकडो स्त्रियांच्या कहाण्या आपण वाचतो प्रत्येकीची कहाणी वेगळी असली तरी ” आईपणाचं दुःख तेच आहे. एक समाज म्हणून किती बदल घडायला पाहिजेत आणि हयाची सुरुवात व्यक्ति म्हणून आपल्यापासून हवी. आणि तसं झालं तर गुन्हायांचे प्रमाण कमी होऊन हे तुरूंग भरलेच जाणार नाहीत.जे आज क्षमतेपेक्षा दुप्पटीने भरून वाहत आहेत. लेखकानेही यासाठी काही ठोस उपाय पुस्तकात सुचवले आहेत. विषय कितीही गंभीर असला तरी केस स्टडीच्या अंगाने जाणाऱ्या हया पुस्तकात लेखकाने अधूनमधून विनोदाचा शिडकावा करून ताण हलका करायचा प्रयत्न केला आहे. सत्य , वास्तवदर्शी असं हे पुस्तक आहे. अनुवादिकेनेही सुंदर अनुवाद करून पुस्तकाची लय व मराठी भाषेचा लहेजा हे दोन्ही सांभाळले आहेत.
परीक्षण : डाॅ. मुग्धा सिधये – तगारे
बालरोगतज्ज्ञ. सांगली.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈