श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 242
☆ अमर्ष ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
अधी तुझ्यातलाच तू अमर्ष आज नष्ट कर
तुला कसे जगायचे रिवाज आज स्पष्ट कर
*
अजन्म कष्ट पाठिशी शरीर धष्टपुष्ट कर
प्रसन्नता फुलावया स्वतःस तूच तुष्ट कर
*
प्रसंग पाहुनी कधी स्वतः स्वतःस दुष्ट कर
समोर सिंह पाहता नको दया वितुष्ट कर
*
मनात मोद जागता अमूर्तता वरिष्ठ कर
वनाप्रती अखंड तू सुजान भाव निष्ठ कर
*
मिठातल्या खड्यातुनी पदार्थ तू चविष्ट कर
असेल कारले घरी तरी तयास मिष्ट कर
*
विभागलीत माणसे स्वतःस तू विशिष्ठ कर
दुही नकोस वाढवू स्वतःस एकनिष्ठ कर
*
विचार दूरचा नको मितीस याच कष्ट कर
कुटुंब, दुःख, वेदना स्वतःस तूच द्रष्ट कर
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈