वाचताना वेचलेले
☆ भोजन – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆
लहानपणी खूप पदार्थ नसायचे.
जेवणाच्या बाबतीत लाडही नसायचे.
आईचा स्वयंपाक होत आला की पाटपाणी घ्यायचे.
त्यात सुध्दा क्रम आणि जागा ठरलेली असायची.
पाट, पाण्याचे लोटी-भांडे ,ताट , वाटी (चमचा गरज असेल तर) , हातांनीच जेवायचे.
पान पद्धतशीर वाढायचे. घरात जेवायला केलेले सगळे पदार्थ अगदी थोडे थोडे वाढले जायचे. नैवेद्य दाखवल्यावर जेवायला सुरवात करायची. आधी श्लोक म्हणायचे. एका सुरात, एका तालात.
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म,
उदर भरण नोव्हे जाणिजे यज्ञ कर्म.
पानात पहिले वाढलेले सगळ्यांनी खायचेच.मग लागेल तसे परत घ्यायचे.
पानात काहीही टाकायचे नाही.आवड नावड नाही . पहिले वाढलेले सगळे खायचे.नको असेल तर परत घ्यायचे नाही. हा दंडक होता.ही शिस्त होती.नावडते पदार्थ पाण्याच्या घोटाबरोबर गिळायचे, पण पानात काही टाकायचे नाही. जेवणाला नावे ठेवायची नाहीत.पदार्थ कसाही झाला तरी खायचा.माऊली कष्टाने रांधून , प्रेमाने सगळ्यांना जेवायला वाढतेय.साक्षात अन्नपूर्णा आहे ती.कशालाही नावं ठेवायची नाहीत.पूर्वी स्टोव्हवर,चुलीवर, कोळश्याच्या शेगडीवर स्वयंपाक करायचा. कधीतरी पदार्थाला धुराचा किंवा रॉकेलचा, करपलेला वास यायचा. पण न बोलता जेवायचे. खूप कडक शिस्त होती.नसते लाड चालायचेच नाहीत.अन्नाला नावे ठेवायची नाहीत.
शाळेतही श्लोक म्हणूनच डबा खायचा.एकमेकांना वाटावाटी करुन खायचा.समजा कोणी आणला नसेल तर त्याचंही पोट भरायचे.हे संस्कार न कळत घडत होते.
जनी भोजनी नाम वाचे वदावे ,
अती आदरे गद्य घोषे म्हणावे
हरी चिंतने अन्न सेवेत जावे ,
तरी श्रीहरी पाहिजे तो स्वभावे ..
धुवा हात पाय चला भोजनाला
बसा नीट येथे तुम्ही मांडी घाला
नका मागू काही अधाशीपणाने
नका टाकू काही करा स्वच्छ पाने.
आई नेहमी म्हणायची, ‘खाऊन माजावे पण टाकून माजू नये.अन्नाचा शाप बाधतो.’ अर्थ फारसा कळायचा नाही.पण पानात वाट्टेल ते झाले तरी टाकायचे नाही, हा संस्कार सहज घडला.अन्नाचा कणही वाया जाता कामा नये,असा सक्त नियम होता.
मुखी घास घेता करावा विचार
कशासाठी हे अन्न मी सेवणार
घडो माझिया हातूनी देशसेवा
त्यासाठी मला शक्ती दे देवराया..
वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे
सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे
कृषीवल कृषीकर्मी राबती दिनरात
श्रमिक श्रम करुनी वस्तु या निर्मितात
करुन स्मरण तयांचे अन्न सेवा खुशाल
उदरभरण आहे चित्त होण्या विशाल.
अशा श्लोकांतून अन्नसेवनाचा संस्कार सहज घडतो.
आपल्यावर झालेला संस्कार पुढच्या पिढीवर रुजविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा.आज सगळं बदललं आहे तरी आपण सांगत राहायचे.ह्याचा परिणाम होतो.आधी विरोध होईल.वेळ नसतो आम्हांला, हे ऐकून घ्यावे लागेल.ही शाश्वत मूल्ये ,जीवनमूल्ये आपल्याला मिळाली, ती सांगत रहायची ,रुजवत राहायची.
नको तिथे लाड नाहीत.वेळच्या वेळी सांगायचे .त्यामुळे चांगली शिस्त, संस्कार मनात रुजतात.सगळ्या भाज्या, पदार्थ आवडीने खाल्ले जातात .पानात पडेल ते खायचे. टाकायचे नाही. हवे तेवढेच घ्यायचे .दोन घास कमी पोटात गेल्याने काही बिघडत नाही.हे विचार मिळतात.
गोष्ट छोटी असते.संस्कार महत्त्वाचा.
तेव्हा लग्नाच्या पंगतीतही ‘वदनी कवळ घेता’ हा श्लोक खणखणीत आवाजात म्हटला जात असे.
‘पार्वतीपते हर हर महादेव’च्या गजराने भोजनास प्रारंभ होत असे. लहान मुलांनाही पंगतीत बसून हवं नको विचारुन वाढले जात असे.पान स्वच्छ केल्याशिवाय उठता येत नसे.
लहान असताना बोडणाला कुमारिका म्हणून जेवायला एकटेच जावे लागे. बोलावणे आल्यावर ‘नाही’ म्हणत नसत.
लहान मुलांनाही बटू म्हणून जेवायला जावेच लागे. कळतनकळत पानात न टाकता सगळे व्यवस्थित जेवण व्हायचे.
बदल करायचा कालानुरूप पण शाश्वत जीवनमूल्यं सोडायची नाहीत. तोच आपल्या समृद्ध जीवनाचा पाया आहे. त्यातला भाव , मर्म समजून घ्यायचे अन्नदान हा संस्कार आहे.
अन्न वाया घालवणे हा माज आहे.
अन्नाचा त्या पूर्णब्रह्माचा अपमान करायचा नाही, हा संस्कार आहे.
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈