श्री सुहास रघुनाथ पंडित
पुस्तकावर बोलू काही
☆ “उमलत्या कळ्या” – (कविता संग्रह) – कवयित्री : सुश्री सुरेखा कुलकर्णी ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : उमलत्या कळ्या (काव्यसंग्रह)
कवयित्री : सुरेखा सुरेश कुलकर्णी.
प्रकाशक : लीना कुलकर्णी., सातारा
मूल्य : रु.१५०|-
संस्कारांच्या पाकळ्यांनी बहरलेल्या उमलत्या कळ्या….
श्रीमती सुरेखा सुरेश कुलकर्णी यांचा उमलत्या कळ्या हा दुसरा काव्यसंग्रह.हा कवितासंग्रह वाचून झाला आणि मग त्यांनी आपल्या मनोगतात सुरूवातीला जे लिहिले आहे ते प्रकर्षाने जाणवले.त्यांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच या संग्रहात बाल आणि युवावर्ग केंद्रस्थानी ठेवून केलेल्या कविता आहेत.कविता होत असताना त्यांचा तसा उद्देश नसेलही.परंतु अशा अनेक कविता त्यांच्याकडून रचल्या गेल्यामुळे त्यांना संग्रह करणे शक्य झाले आहे.पण याबरोबरच आपली संस्कृती ,परंपरा, निसर्ग आणि पर्यावरण, त्याचे जतन आणि संवर्धन अशा विविध विषयांवर त्यांनी आपल्या भावना दृढपणे व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे या उमलत्या कळ्या सर्वच वयोगटातील वाचकांना गंध देत आहेत.
बालकवितांचा विचार करताना एक गोष्ट जाणवते .ती म्हणजे बालकांना समजेल अशा सोप्या भाषेत त्यांनी रचना केल्या आहेत.काही वेळेला तर घरातील जबाबदार व्यक्तीशी आपण बोलत आहोत असे बालकांना वाटेल. गणपती, वाढदिवस, बालपण, घरातील मनीमाऊ, चिऊताई, प्राण्यांच्या कडून करण्यात आलेल्या तक्रारी, घराचे हरवलेले अंगण, नातवंडांशी असणारं नातं अशा अनेक विषयावर त्यांनी कविता केल्या आहेत.त्या त्या प्रसंगाला योग्य अशी भाषा,शब्द वापरले आहेत.
लहान मुले आणि किशोर तसेच युवा गटातील मुलांना त्यांनी अनेक कवितांमधून मार्गदर्शन केले आहे. धोक्याच्या सुचनाही केल्या आहेत.
आजकाल विसरत चाललेली संध्याकाळच्या प्रार्थनेची त्या आठवण करून देतात.आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर कोणत्या आदर्शांची मालिका बालकांसमोर , युवकांसमोर असली पाहिजे याची जाणीव त्यांनी एका कवितेतून करून दिली आहे.पुस्तके हीच आयुष्याची अमूल्य ठेव आहे.त्यांच्या जगात रमावे कारण वाचलात तरच वाचाल असा संदेशही त्या देतात.तरुणांच्या व्यसनाधिनतेने त्या व्यथित होतात.युवकांनी विवेकाने वागावे व मानवतारुपी संपत्ती जतन करावी अशी त्यांची अपेक्षा आहे.तारुण्याचा वसंत फुलत असतानाही बेभान न होता मोहाचे श्रण टाळावेत.म्हणूनच एका कवितेतून त्यांनी सेल्फीप्रेमींना इशाराही दिला आहे.यंत्रयुगात मानवाने कितीही प्रगती केली असली तरी आपण निसर्गापेक्षा मोठे नाही हे ही त्या बजावून सांगतात.एकंदरीत युवा पिढीचे हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लिहीलेल्या कवितांची संख्याही बरीच मोठी आहे.
याबरोबरच तिरंगा गीत,वीर जवानांसाठी केलेली कविता,ऑलिंपिक विजय, स्वातंत्र्य दिन,महाराष्ट्राचे गुणगान अशा देशप्रेमाचे दर्शन घडवणा-या कविताही त्यांच्याकडून लिहील्या गेल्या आहेत.
निसर्ग, पर्यावरण ,त्याचे महत्व व जतन याविषयी भाष्य करताना त्यांनी अचूकपणे काव्य केले आहे.वृक्ष लागवडीशिवाय सुख समृद्धी नाही.डोंगर जपले गेले तर आपलं आयुष्य उघडे बोडके होणार नाही.उदार निसर्गाचे आपण कृतज्ञ असले पाहिजे.त्याच्यासारखा दाता नाही.वनस्पती औषधींचे महत्त्वही त्यांच्या कवितेतून स्पष्ट झाले आहे. मानव आणि निसर्ग यांचे असणारे नाते त्यांनी साध्या शब्दांतून विषद केले आहे.
अनेक निसर्ग कवितांतून निसर्गाचे सुंदर वर्णन वाचावयास मिळते. उदाहरणार्थ: ‘ ऋतुरंग ‘ या कवितेत त्यांनी सहा ऋतुंची साखळी गुंफताना प्रत्येक ऋतुचे वैशिष्ट्य अगदी थोडक्यात पण नेमकेपणाने टिपले आहे.पाऊस,गुलमोहोर, रानफुले,औषधी वनस्पती या सर्वांचे वर्णन करताना त्यांच्या लेखणीला बहर येतो.मानव आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे याची आठवण करून देत पर्यावरण रक्षणासाठीही त्या जागरुक आहेत.
त्यांच्या काही कवितांत गेयता अधिक दिसून येते. सुप्रभात,निसर्ग, नमन स्वातंत्र्यवीरा , वीरजवान या कवितांतील गेयता उल्लेखनीय आहे.याशिवाय षडाक्षरी, शेलकाव्य असे वेगळे काव्यप्रकार त्यांनी हाताळले आहेत.
एखाद्या उद्यानात विविध प्रकारची फुले एकाच ठिकाणी पहावयास मिळावीत त्याप्रमाणे ‘उमलत्या कळ्या’ या काव्यसंग्रहात विविध विषयांवरील कविता वाचावयास मिळतात.पण कवितांची मांडणी करताना संमिश्र झाली आहे.त्याऐवजी विषयवार कविता एकत्र दिल्या असत्या तर मांडणी सुबक वाटली असती असे वाटते. बालकविता,संस्कार कविता,निसर्ग इ. असा काही क्रम ठरवून घेता आला असता.
तरीही काव्य लिहिण्यामागची तळमळ त्यामुळे कमी होत नाही.संस्कारीत समाज घडावा व देश बलसागर व्हावा हा मनातील भाव त्यांच्या लेखणीने अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे.आजच्या काळाचा विचार करता हे खूप महत्वाचे वाटते.त्यासाठी सुरेखाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈