श्री प्रदीप केळुस्कर
☆ जांभळीचे झाड – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
मी गेली अंदाजे तीस वर्षे याच रस्त्यावरून जातो आहे. शाळेत असताना याच रस्त्यावरून सुरवातीला चालत, मग सायकलवरुन आणि हल्ली काही वर्षे स्कुटर वरुन किंवा गाडीतून.
शाळेत असताना मी आणि माझे मित्र आमच्या घरापासून अंदाजे दिढ किलोमीटर अंतरावर थोडी विश्रांती घयायचो.रस्त्याच्या आजूबाजूला काही आंब्याची, रतांब्याची, फणसाची झाडें होती, या ठिकाणी एक जांभळीचे झाड होते. माझे मित्र मोठया आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घ्यायचे पण मी मात्र या जांभळी खाली थांबायचो. त्या झाडाच्या सावलीखली दोन मिनिटे थांबून आम्ही पुन्हा चालू लागायचो किंवा सायकलवर पुन्हा बसायचो.
जाता येता त्या जांभळीच्या झाडाकडे का कोण जाणे पण माझे लक्ष असायचेच. जानेवारी महिना आला की झाडाला पालवी फुटायची, हिरवीचुटुक पालवी, मग हळूहळू लहान लहान हिरवी फळे मग ती तांबळी होतं, जासजस उन्हाळा वाढू लागला की तांबडी जांभळे काळी होतं.
या झाडाला घोसाने जांभळे लागत. जांभळे पिकली की काळिभोर जांभळे टपटप खाली पडत, मग खाली भटकी कुत्री जमत आणि जांभळे खात आणि मे अखेर पर्यत धस्थपूष्ठ होतं.
आम्ही मित्र पण जांभळी खाली जमायचो, आमच्यातील माझ्यासकट सर्व झाडावर चढायचे.पिशवीभर जांभळे काढायचो आणि घरी नेऊन घरच्याना दयायचो. जांभळीचे झाड अत्यन्त कोरम असते, त्याच्या फानदी वरुन आम्ही कधी ना कधी पडून हात, ढोपरे मोडून घेतली आहेत.
मी वकिली शिक्षण मुंबईमध्ये घेतले आणि पुन्हा आमच्याच या तालुक्याच्या गावी प्रॅक्टिस करू लागलो. पुन्हा घरून याच रस्त्यावरून जाऊ येऊ लागलो जातायेता या झाडावर माझे लक्ष असेच.
गाव वाढले, वस्ती वाढली, लोकांनी लांब घरे घेतली. त्या झाडाखाली आता भाजीवाली, फळवली बायका बसू लागल्या.मी मुद्दाम जांभळीखाली बसणाऱ्या मावशीकडून कधी भाजी, कधी शेंगा, कधी आंबे घेऊ लागलो. माझ्या बरोबर कधी कधी बायको असायची ती पण भाजीवल्या मावशीच्या ओळखीची झाली.
एक दिवस चांगल्या शेवग्याच्या शेंगा दिसल्या म्हणून मी थांबलो, तशी भाजीवाली मावशी मला सांगायला लागली
“भाऊंनू, आमका आता दुसरी जागा बघूची लकतली ‘
“कशाक?
“ह्या जागेची मोजणी सुरु आसा दोन दिवस, रस्त्याच्या रुंदीकरण सुरु होतला. ही झाडा पण तोडतले म्हणतात ‘.
“काय, झाडा तोडतले? म्हणजे ही जांभळी पण..
“होय तर, ह्या जांभळीवर पट्टे मारलेत ते काय, सरकारचे म्हणून ‘.
मला एकदम टेन्शन आले, गेली कित्येक वर्षे या इथे जांभळीला पहायची सवय, ते झाड तोडणार? मग या झाडावरची जांभळे खाणाऱ्या पक्षी, कावळे, कुत्री, आम्ही माणसे यांनी काय करावे? या झाडा पासून मिळणारी सावली, आमच्यापासून हिरावून नेणार?
मी दुसऱ्या दिवशी रस्ते बांधकाम विभागात गेलो आणि चौकशी केली. तेथल्या अधिकाऱ्याने मला तेंच उत्तर दिले
“वाहने खुप वाढली आहेत, सध्याचा रस्ता पुरा पडत नाही, रुंदीकरण करायला हवे, असे सरकारचे म्हणणे, मोजणी झाली आहे. पुढील महिन्यात काम सुरु होईल, त्यामुळे झाडें तोंडावीच लागतील,’.
मी दोन दिवसांनी जिल्हा कलेक्टरना भेटलो आणि या रस्त्याच्या रुंदीकरणाला विरोध करणारे पत्र त्यांच्या हवाली केले. कलेक्टरसाहेबांचे तेंच म्हणणे. त्या भागात आता वस्ती वाढली आहे. याच रस्त्यावरून हायवे कडे जाता येते, त्यामुळे रुंदीकरण करावेच लागेल.’.
कोणीच दिलासा देत नाही हें पाहून मी कोर्टात सरकार विरुद्ध दावा ठोकला. मी स्वतः वकील होतोच.कोर्टाचा निकाल लागेपर्यत रुंदीकरण थांबले.
शेवटी कोर्टात केस उभी राहिली. सरकारच्या वकिलांनी आपली बाजू मांडल्या नंतर मी कोर्टाला म्हणालो “रस्ता रुंदीकरण करणे आवश्यकच असेल तर करा पण झाडें का तोडता?
माननीय कोर्टाने मला विचारले “वाटेल आलेली झाडें तोडल्याशिवाय रुंदीकरण करणे शक्य आहे काय? तुम्हाला झाडें तोडू नये असे वाटतं असेल तर झाडें उचलून दुसरीकडे लावा’.
“हें कसे शक्य आहे? मी विचारले.
कोर्ट म्हणाले “शक्य आहे. काही देशात झाडें कुपळून दुसरीकडे लावतात आणि ती जगतात, तुम्ही हवे असल्यास माहिती घ्या ‘.
मी विचार केला आणि कोर्टाला विचारले “मला या रस्त्यावरील जांभळीचे झाड मिळाले तर मी ते माझ्या बागेत लावू इच्छितो, त्याची परवानगी द्यावी ‘.
कोर्टाने मला जांभळीचे झाड न तोडता दुसरीकडे लावायची परवानगी दिली.
मी कोर्टाचा निकाल हातात घेतला आणि आमच्या शहरातील कॉलेज मधील biology चे प्रोफेसर वर्दे यांना भेटायला गेलो.
वर्दे यांना विचारले “असे झाड जमिनीतून कुपळून काढून दुसऱ्या ठिकाणी लावणे शक्य होते काय?
“होय, हल्ली परदेशात मोठमोठे वृक्ष कुपळून ते दुसऱयाठिकाणी लावली गेली आणि ती जगली, अशी उदाहरणे आहेत.’
वर्देनी मला या संबधी माहिती असलेली पुस्तके दिली.
मी घरी आलो आणि बायकोला मी जांभळीचे झाड रस्त्यावरून काढून आपल्या आवारात लावतो आहे, असे सांगितले.
बायको माझ्यावर चिडली. असले नको ते धंदे का करता, अशी झाडें कधी जगत नाहीत ‘असे सांगून माझा हिरेमोड करू लागली. मी तिला सांगितले “लहानपणा पासून त्या जांभळीच्या झाडाला मोठे होताना, त्याला जांभळे लागताना, त्या झाडाची जांभळे खाताना मी पाहिले आहे. ते झाड तोडून त्याचे सरपण करावे, हें मला पाहवणार नाही.
माझा हा कदाचित वेडेपणा असेल कदाचित पण माणसाने कधीतरी वेडेपणा करायला हवा. मी तो करणार आहे. तुला पटत नसेल तर मला साथ देऊ नकोस पण मला या वेडापासून दूर नेऊ नकोस ‘
माझा स्वभाव माहित असल्याने बायकोने बडबड केली आणि ती गप्प बसली.
मग मी कामाला लागलो. माझ्या ओळखीच्या शिवा लमाणीला बोलावले आणि त्याला माझ्या घराच्या मागील जागा दाखवली. त्याच्या माणसानी जागा साफ केली आणि चार बाय चार खड्डा खणला. त्यात जुना पालापाचोळा, शेणखत आणि मुंगीची पावडर टाकली. सतत दोन दिवस पाणी त्या खड्ड्यात ओतले आणि माती भुसभूशीत केली.
मग आमचा मोर्चा रस्त्यावरील जांभळीच्या झाडाकडे वळवला. कुदली फवडीने झाडाभोवती खणत आणि कमीत कमी पाळे तोडून दहा कामगारांनी झाड बाहेर काढले आणि ट्रॉली मध्ये ठेवले.मग ट्रॉली आमच्या घराकडे निघाली.
घराच्या मागच्या बाजूला तयार केलेल्या खड्यात जांभळीचे झाड उभे केले आणि त्यात माती भरली, शेणखत भरले वर पाणी ओतले.
– क्रमशः : भाग पहिला
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर