सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ सुवर्णमध्य… — लेखिका : सुश्री माधुरी बापट ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

अलिकडेच लिहिलेल्या माझ्या एका ‘पोस्ट’ला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाल्याने ही ‘पोस्ट’ लिहायचं ठरवलं. काही वर्षापूर्वी माझ्या बहिणीच्या दहा वर्षाच्या नातवाने मला त्याच्या सायन्सच्या घरच्या अभ्यासात मदत मागितली. आता तो बारावीला आहे. 

..

विषय होता आधुनिक संशोधनाचे माणसावर होणारे वाईट परिणाम. माझ्या शिकवण्याचाच हा एक भाग असल्याने मी उत्साहाने त्याला मदत केली. विमाने, मायक्रोवेव्ह ओव्हन, मोबाईल फोन्स, वाय फाय, मेडिकल एक्स रेज, रेफ्रिजरेटर, प्रेशर कुकर, इलेक्ट्रिक कॅन ओपनर, कॅन फूड , कंप्यूटर मौस, वगैरे वगैरे. यातील प्रत्येकाचाच होणारा वाईट परिणाम ऐकून त्याची आई, माझी भाचे सून म्हणाली, ‘म्हणजे कुठल्याच गोष्टी सुरक्षित नाहीत का?’ माझे उत्तर होते, ‘कुठल्याही गोष्टीत चांगले वाईट असणारच. त्याचा उपयोग आपण मर्यादित ठेवला तर त्यापासून इजा व्हायची शक्यता कमी. त्याच्या आहारी गेलं तर धोका संभवतो.’

..

माझे वडील म्हणायचे माणसानं थोडं शहाणं नि थोडं खुळं असावं. प्लास्टिकचा त्यांना तिटकारा होता. प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी विशेषत: लूक वॅार्म, पिण्यानं त्यातील ॲस्ट्रोजेन सदृश मॅालिक्यूल रक्तात जातो. जो पुरुषांच्यात बायकीपणा व बायकांच्यात कॅन्सर निर्माण करू शकतो.

..

विमाने तीस चाळीस हजार फुटांवरून उडत असतांना नेहमीपेक्षा दहा वीस पटीने सूर्याकडून वा इतरत्र आलेली वाईट रेडिएशन्स ( गॅमा, एक्स रे, अल्ट्रा व्हायोलेट वगैरे) आपल्या शरीरात शिरतात. मी स्वत: एका फ्लाईटमध्ये गायगर कौंटर नेला होता व ३५,०००फुटावर असतांना नेहमीपेक्षा वीसपट रेडिएशन कौंट्स बघितले होते. ज्याने कॅन्सर होऊ शकतो. बहुतेक सर्व पायलट्स, एअर होस्टेसेस कॅन्सरने दगावतात. 

..

न्यूक्लिअर फिजिक्सचा कोर्स शिकवतांना मी विद्यार्थ्याना एक सर्व्हे भरायला देत असे. तुमच्या लाईफ स्टाईलवर आधारीत वर्षात किती रेडिएशन तुमच्या शरीरात जाते, हे अजमावण्यासाठी. यात तुम्ही कुठे रहाता म्हणजे समुद्रसपाटीपासून किती उंचीवर, सिगरेट ओढता का, विमानाने किती तास प्रवास करता, किती एक्स रे काढून घेता यासारख्या गोष्टीवरून ठरवता येते.माझी एक विद्यार्थिनी तीस वर्षापूर्वी कोसोव्हच्या युद्धात दर दोन आठवड्याने मिलिटरी विमानाने सैनिकांना औषधे वगैरे पोहोचवण्यासाठी जात असे. तिने तो सर्व्हे भरला नाही. म्हणाली, ‘मी कॅन्सरने मरणार हे मला माहीत आहे. पण आपल्या सैनिकांसाठी मी ते खुशाल सहन करीन.’

..

भारतात विमानाचा प्रवास तेवढा पॅाप्युलर नाही. पण अमेरिकेत काही लोक सतत विमानाने प्रवास करतात. दर तासाला १० मिलीरिम एवढे रेडिएशन शरीरात जाते. वर्षात ३६० मिलीरिमची मर्यादा घातलेली आहे. त्यातले अर्धे तर नैसर्गिक रीत्याच शरीरात घुसते. अगदी उन्हात रोज तासाभरापेक्षा जास्त वेळ घालवू नये. दर वर्षी अमेरिकेतून भारताच्या एक दोन वाऱ्या करणारी मंडळी आहेत. प्रत्येक वारीत ४०० मिलीरिम रेडिएशन शरीरात जाते. मी स्वत: सरासरी तीन वर्षात भारताची एक वारी करते.

..

मायक्रोवेव्ज ह्रदयाला वाईट असतात. एम. एस. साठी मी लाईव्ह मायक्रोवेव्ज वापरून माझा प्रॅाजेक्ट केला होता. तेव्हा माझ्या ॲडव्हयझरने मला सांगितले होते, ‘Don’t get pregnant while working on your project.’ शिवाय त्यात पदार्थ चांगले शिजत नाहीत. त्यामुळे त्यातील बॅक्टेरिया वगैरे मरत नाहीत. कारण पाण्याचा मॅालीक्यूल २.५ गीगॅ हर्ट्झ फ्रीक्वेन्सीने कंप पावून ते गरम होते. त्या वेव्ज हृदयाला हानिकारक असतात. म्हणून मायक्रोवेव्ह ओव्हनचा उपयोग कमीत कमी करावा.

..

कॅन फूड टाळावे. त्यातील प्रिझर्व्हेटिव्ज वाईट असतात व अलुमिनम रक्तातून मेंदूत जाऊन अल्झायमर होऊ शकतो. इलेक्ट्रिक कॅन ओपनर तर सर्वात वाईट. मायक्रोवेव्हपेक्षाही जास्त रेडिएशन्स त्याने शरीरात घुसतात.

..

मोबईल फोन्स रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालतात. ती जरी तेवढी घातक नसली तरी वर्षानुवर्षे वापरल्याने कॅन्सर होऊ शकतो. तीस वर्षापूर्वी ते टेस्ट करणाऱ्या मोटरोलातील एका शास्त्रज्ञाला कानाजवळ कॅन्सर झाला. भारतात मोबाईल व मायक्रोवेव्ह ओव्हन वापरायचे प्रमाण खूपच वाढलेले आहे, असं माझ्या लक्षात आलं.

..

केवळ इन्शुरन्स पैसे भरतो म्हणून सतत मेडिकल एक्स रेज काढून घेऊ नयेत. त्यानेही कॅन्सर उद्भवू शकतो. केवळ डॅाक्टर म्हणतात म्हणून दिलेल्या औषधाचा पूर्ण डोस घेण्या आधी वा एखादी सर्जरी करण्याआधी दुसऱ्या डॅाक्टर वा सर्जनचे मत अजमावावे. विशेषत: जनरल अनॅस्थेशिया द्यावा लागणार असेल तर. ॲंजियोप्लास्टीचे पण प्रमाण फार वाढले आहे. बहुतेकवेळा प्रॅापर डाएट, व्यायाम, वगैरेनी ती टाळता येते.

..

सतत फ्रिजमधील पाणी वा अन्न खाल्याने तसच प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्याने वजन वाढते. १९८४ सालापासून मी कंप्यूटरवर टाईप करत आहे. त्याने माझ्या दोन्ही मनगटातील नर्व्हज दाबल्या जाऊन दोन्ही हाताच्या बोटात नम्बनेस आलेला आहे. तो ॲार्थोपेडिक सर्जनकडून शस्त्रक्रिया करून बरे होईल असं डॅाक्टरचं म्हणणं आहे. टी. व्ही. व कंम्प्युटर स्क्रीनकडे सतत बघून डोळ्यांची वाट लागते हे सर्वश्रुतच आहे.

..

अर्थात कामासाठी नोकरीसाठी लोकांना काही गोष्टी कराव्याच लागतात. ते वेगळे. ही सगळी माहिती तुम्हाला घाबरवून टाकण्यासाठी दिलेली नाही तर तुमच्यात एक प्रकारची जाणीव, जागृती यावी म्हणून दिलेली आहे. जुनं ते सोनं म्हणून त्याला कवटाळून रहाणं जेवढं वाईट तेवढंच केवळ आधुनिक म्हणून त्याच्या फशी पडणंही बरोबर नाही. अति तेथे माती म्हटल्याप्रमाणे कुठलीही गोष्ट एका टोकाला जाऊन करू नये. आपणा सर्वांना सुवर्णमध्य शोधता यावा हीच सदिच्छा!

..

पंचवीस वर्षांपूर्वी एकदा माझे बी. पी. वगैरे एकदम पर्फेक्ट आलेले बघून माझ्या अमेरिकन डॅाक्टरने मला विचारले. ‘यावेळी तू वेगळं काय केलस?’ तेव्हा त्याला सांगितलं होतं, ‘काल आमचा उपास होता. (आषाढी एकादशीचा) मी फोनला हात लावला नाही, टी. व्ही. बघितला नाही की कारमध्ये बसले नाही. फक्त भक्तीगीते ऐकली, ध्यान धारणा केली.’ त्यावर तो म्हणाला होता, ‘असं दर रविवारी करत जा. तुला औषधाची कधी गरजच पडणार नाही.

लेखिका : सुश्री माधुरी बापट

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments