सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ क्षणभर – लेखिका : सौ. कांचन दीक्षित ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
स्त्रियांना कधी कामं करताना पहाल, तर दिसेल की , त्या फिरत गरगरत कामं करतात, सतत उठताना बसताना दिसतात. कारण कामं चहूदिशेला असतात.एका सरळ रेषेतलं एकच एक मोठं काम नसतं, तर लहानसहान वेगवेगळी कामं असतात.म्हणूनच काय आणि किती केलं हे कधी मोजता येत नाही. दिवसाच्या शेवटी सगळं जागच्या जागी हेच उत्तर असतं आणि इतरांच्या यशात असणारा, पण न दिसणारा वाटा, हेच यश असतं. प्रत्येक खोलीत गेलं की कामं बोलवत असतात आणि स्वयंपाकघरातली कामं तर कधी संपतच नाहीत.
टाईम झोन अनुसार किंवा नैसर्गिक स्त्रीप्रकृतीचा विचार करता स्त्रीतत्त्व मुळात शांत आणि रिलॅक्सड प्रवृत्तीचं आहे. स्त्रीची कामं करण्याची पध्दत आक्रमकपणे फडशा पाडण्याची नसून आनंद घेत निर्मिती करण्याची आहे, पण आजच्या जीवनशैलीमुळे ती सतत अस्वस्थ धावताना दिसते. आतला न्यूनगंड भरुन काढण्यासाठी घरातल्यांना काही देत राहते. स्वतःलाच शिक्षा केल्यासारखी कामात बुडून राहते, स्वतःवरचं कमी झालेलं प्रेम तिला आणखी दु:ख देतं आणि त्या वेदनांपासून, त्या भावनांपासून पळण्यासाठी ती आणखी कामं करत बसते.
शांत बसलं की माणसाच्या मनातल्या भावनांची वादळं वर येतात. विश्रांतीची गरज आहे, स्वतःला वेळ द्यायचाय, स्वतःकडे लक्ष द्यायचंय अशी ओरड आतून येते, खरंतर त्याकडे लक्ष देऊन त्या वेदना हील करणं सोडून ती कामात बर्न आऊट होत रहाते, थकते दमते आणि तक्रार करते. या तक्रारींमुळे इतर आणखी लांब जातात. तिला टाळतात. मग ती आणखी एकटी पडते.
टाईम मॅनेजमेंट हा विषय स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळा आहे आणि तो वेगवेगळया पध्दतीनेच रिझल्ट देणारा आहे. स्त्रीची कार्यक्षमता आणि एकूण दिनक्रम याचा संबंध विश्रांतीशी आहे. स्त्रियांच्या विश्रांतीला आळस समजणं म्हणजे अक्षरशः अज्ञान आहे. निसर्ग संतुलन साधत असतो, यशासाठी जितकी धावपळ,गडबड,पळापळ गरजेची असते,तितकीच शांतता आणि विश्रांतीसुध्दा.
एक उपाय सुचवत आहे. अनेक घरात असेलही. पण ज्यांना माहीत नाही त्यांनी हा प्रयोग करुन पहा. आपल्या घरातल्या सगळया स्त्रिया जिथे जास्त वेळ उभ्याने काम करतात, जिथे जास्त वेळ घालवतात, तिथे एक लहानसा स्टूल बसण्यासाठी ठेवा. पटकन बसता येईल, टेकता येईल असा एक स्टूल ओट्यापाशी हवाच. चहा, दूध गरम होईपर्यंत, भाजी चिरताना, निवडताना ओट्यापाशी पटकन विसावता येईल.
स्टूल फार मोठा जागा व्यापणारा, अडचणीचा नको, लहानसा, हलका !
कोणी म्हणेल आमच्या किचनमधे डायनिंग टेबल आहे, पण कामात ती खुर्ची पटकन घेतली जात नाही. बायका उभ्यानेच खातात, चहा पितात आणि तासनतास बसत नाहीत. मग पाठदुखी कंबरदुखी मागं लागते.
हे स्टूल प्रतीक म्हणून काम करेल, विश्रांतीची आठवण करुन देणारं प्रतीक!
‘बस जरा. कामं पळून जात नाहीत. दोन मिनिटं शांत बस. पाणी पी,’
हे सगळं बोलणारं कुणी असायची गरज नाही. हे स्टूल बोलेल.
या क्षणभर विश्रांतीनं थकवा 50% कमी होईल. सगळं संपल्यावर एकदम कोसळायला होणार नाही आणि मनालाही शांतता मिळेल. किचनमधला असा हा कृष्णसखा क्षणभर विश्रांती देऊन कशी मदत करतो, हे खरंतर सवयीनं अनुभवण्याची गोष्ट आहे, बघा प्रयोग करुन!
लेखिका : श्रीमती कांचन दीक्षित
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈