सुश्री तृप्ती कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ होडी ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
तसं पावसाशी फार जीवाभावाचं नातं नसलं तरी काही गोष्टींसाठी पाऊस हवासा वाटतो. त्यातली एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्यात होड्या सोडणे. लहानपणी पावसाळ्यातल्या सुरुवातीच्या दिवसांची आतुरतेने वाट पाहायचे ते यासाठीच.
आम्ही चाळीत राहत होतो तेव्हा पहिल्या काही दिवसांत इतकं पाणी साचायचं की घराच्या मागे आणि पुढे अक्षरशः दुथडी भरून व्हायचं. आमचं घर मध्यावर होतं चढणीवरून पाणी हळूहळू उताराकडे वहायचं. तेव्हा त्या पाण्याला खूप जोर असायचा. मग घरात पावसामुळे अडकलेली आम्ही मुलं, कागदाच्या होड्या करून सोडण्यात दंग राहायचो.
राजा राणीची होडी, शिडाची होडी असे होडीचे वेगवेगळे प्रकार असायचे. एकमेकांशी स्पर्धा असायची. कोणाची होडी जास्त लांबपर्यंत जाते हा एक चर्चेचा विषय असायचा.
काही मुलं तर उत्साहाने छत्री घेऊन पळत पळत होडी कुठपर्यंत जाते ते बघायला जायची.
रस्त्यावर खड्डे असल्याने कुठे गोल खळगा तयार व्हायचा आणि त्यातलं पाणी असं गोल गोल फिरत राहायचं ते बघायला मजा यायची. पण एखादी होडी चुकून त्या खळग्यात अडकली किती तिथल्या तिथे गोल गोल फिरत राहायची. ज्याची तशी होडी अडकेल त्याला फार वाईट वाटायचं.
याशिवाय गंमत वाटायची ती कॉलनीमधल्या रस्त्यावरच्या दिव्याची. उंच उंच केशरपिवळ्या रंगाचा झोत टाकणारे ते दिवे… पावसाच्या पाण्यात थरथरतायत आहेत असा भास व्हायचा. त्यांच्या प्रकाशात खाली पडणार पाणी त्या रंगाचं वाटायचं. तेव्हा शॉवर हा प्रकार आम्हा मुलांना नुकताच माहीत झाला होता. अशा दिव्याखालून पडणाऱ्या पाण्यात रंगीत शॉवर खाली भिजण्यात मुलांना वेगळीच मौज वाटायची. मला खरंतर पावसात भिजणं हा प्रकार कधीच आवडला नाही. पण पाण्यामध्ये पडणारी लाईटची प्रतिबिंब किती वेगवेगळी दिसतात. ते बघण्यात मला कुतूहल वाटायचं. क्वचित कुणाची तरी दुचाकी असायची पण त्यातलं पेट्रोल पाण्यात पडलं की जे वेगवेगळे रंग उमटायचे ते बघण्यासाठी आमची गर्दी व्हायची.
पाण्यामध्ये उठणारे तरंग, त्यात कोणी खडा टाकेल… कोणी पाय आपटेल… त्यानंतर होणारे वेगवेगळे आकार… आपापलं प्रतिबिंब पाण्यात बघण्याची हौस… वेडे वाकडे चेहरे करून पाण्यात बघणं. एकमेकांना दाखवणं. एक फार वेगळी मौज असायची. या सगळ्यांमध्ये नेहमीचे मैदानी खेळ खेळता येत नाही याचं शल्य नसायचं.
चाळ असल्यामुळे आजूबाजूला झाडं नव्हती. पण घरांची, कौलांची प्रतिबिंब पाण्यात दिसायची. कौलातून निथळणारं पाणी झेलायला देखील मजा यायची. अगदी साधी राहणी आणि साध्या सुद्धा गोष्टी आणि त्यातून आनंद शोधणं असा साधाकाळ होता.
अलीकडे पाऊस पडल्यावर काय करायचं हा प्रश्न मुलांना पडतच नसेल कारण त्यांच्याकडे मोबाईल, टीव्ही असे भरपूर ऑप्शन्स आहेत. पण आमच्या वेळी हे काहीही नव्हतं आणि तेच बरं होतं असं आम्हाला वाटतं.
तर दोन दिवसांपासून पडणारा पाऊस बघून बालपणीच्या या अशा होडीच्या आठवणीं ओल्या झाल्या. मला एक छोटीशी साधीसुधी बालकविता सुचली...
तिकडून आला मोठा ढगुला
मला म्हणाला चल भिजूया
दोघे मिळून खेळ खेळूया
पाण्यामध्ये होड्या सोडूया
होड्या सोडल्या पाण्यात
वाहू लागल्या वेगात
आली लाट जोरात
मासोळी पडली होडीत
मी होडी उपडी केली
मासोळी चट सुटून गेली
ढगुल्याच्या डोळां पाणी
माझ्या ओठी पाऊसगाणी
☆
© सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈