सौ राधिका भांडारकर
कवितेचा उत्सव
☆ “पार…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(वृत्त – वनहरिणी :: मात्रावृत्त -८,८,८,८)
☆
हृदयामध्ये साठवलेली घुसमट सगळी काढून टाक
गोंधळलेल्या अविचारांचा सारा गुंता उसवून टाक…
*
संसाराचा डाव मांडला नकोच हेका हट्ट बावळा
उगा मनाला सतावणारी अढी आतली मोडून टाक….
*
सांगितले मी एक स्वतःला नीट जपावे अस्तित्वाला*
मुक्त मनाने पावलातल्या बंधन बेड्या तोडून टाक….
*
आशंकेला नकोच जागा कल्लोळ नको संदेहाचा
स्वच्छ शुद्ध त्या प्रेमाचा अन् बंध मनाचा जोडून टाक..
*
खूपच झाले खपणे आता परस्परांना जपुया सारे
कष्ट पुरे.. विश्रांतीसाठी पार एक तू बांधून टाक…
☆
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈