सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ एक थेंब पावसाचा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
एक थेंब पावसाचा
धरतीच्या अंगावर
रत्नखाण झाली तिची
धन्य सारे खरोखर॥
*
एक थेंब पावसाचा
डोंगराच्या माथ्यावर
स्वर्ग लोकातील गंगा
दरी घेई कडेवर॥
*
एक थेंब पावसाचा
कुसुमाच्या पाकळीत
सव्वा लाखाचा हा हिरा
जणू जपला मुठीत॥
*
एक थेंब पावसाचा
बळीराजाच्या कपोली
डोळ्यातील एक थेंब
उराउरी भेट झाली॥
*
एक थेंब पावसाचा
प्रेमिकांच्या कायेवर
चेतावली तने मने
येई प्रेमाला बहर॥
*
एक थेंब पावसाचा
अडव ,जीरव आता
मानवा कल्याण करी
होसी सृष्टीचा तू त्राता॥
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈