श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

सूर्य नवा दिवस नवा- भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(महिन्याअखेरीस तू जमेल तेवढे पैसे माझ्या हातात टिकवले तरी चालतील. एवढंच वाटतं की माझ्या हातांची दानत शेवटपर्यंत टिकायला हवीय. आणि हे गुपित आपल्या दोघांतच असायला हवं.’) – इथून पुढे — 

वास्तविक सुमित्राकाकूंचा मुलगा मोठ्या कंपनीत आहे आणि काकूंची ही अगतिकता? मी लगेच म्हटलं, ‘ठीक आहे काकू, उद्यापासून या. मी तुम्हाला महिन्याला एक हजार रूपये देईन, चालेल?’

‘छे, अगं एखाद्या महिन्यात जास्तीत जास्त पाचशे रूपये लागतील. तेही मला लागले तरच घेईन नाही तर काहीच घेणार नाही. माझ्या लेकीसाठी काही करतेय या भावनेने मी स्वयंपाक करीन. मोबदला मिळतो म्हणून नाही. मला कधीही जेवायचा आग्रह करायचा नाही. बघ, तुला पटतंय कां, तर हो म्हण.’

शुभदा म्हणाली, ‘काकू मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. फक्त ही गोष्ट मला माझ्या नवर्‍यापासून लपवून ठेवता येणार नाही. त्यांना सांगावं लागेल, चालेल ना?’

‘बरं बाई, चालेल. आता मला शंभर रूपये देशील, सकाळी येताना काही भाज्या घेऊन येईन.’ असं म्हणत शंभर रूपये घेऊन काकू बाहेर पडल्या. किचनमध्ये गेल्यावर लक्षात आलं की काकूंनी पोह्यांची चव सुद्धा घेतली नव्हती.

एकीकडे सुमित्राकाकूंना मदत करतेय हा आनंद होता तर दुसरीकडे बॅंकेतून आल्यावर आता वेळ कसा घालवायचा हा मोठा प्रश्न शुभदासमोर होता. बॅंकेची शाखा जवळच असल्याने ती सव्वा पाचलाच घरी पोहोचायची.

थोड्या वेळाने सखूबाई आली. झाडलोट करून, कपडे धुऊन पदराला हात पुसत बाहेर येत म्हणाली, ‘ताईसाहेब, आमच्या बाळूला आठवीचं गणित आणि इंग्लिश जरा अवघड जातंय म्हणे. शिकवणी लावायची म्हणत हुता. अवं आता आम्ही गरीबांनी शिकवणी फी कुठनं आणायची? कमी पैशात शिकविणारा कुणी हाय का तुमच्या ओळखीत? असंल तर सांगा.’

मुलांचं हवं नको ते पाहण्यात शुभदा कधी प्रमोशनच्या भानगडीत पडली नव्हती. मुलं दहावीला जाईपर्यंत त्यांच्या सगळ्या विषयांचा तिने स्वत: जातीने अभ्यास घेतला होता. त्यामुळे आठवीच्या मुलांची दोन विषयांची शिकवणी घेणे ही शुभदाच्या दृष्टीने अवघड गोष्ट नव्हती. शुभदाने संधी साधली आणि बोलून गेली. ‘सखू आणखी पांच दहा मुलं भेटतात का बघ. संध्याकाळी साडेपांच ते साडेसहा या वेळेत मी विनामूल्य शिकवणी घेईन.’

दुसर्‍या दिवशी सकाळी शुभदा पहिल्यांदाच फिरायला म्हणून बाहेर पडली. अजून उजाडायला बराच अवधी होता. त्यामुळे थोडे अंधुकसे दिसत होते. चालत चालत ती जवळच्या टेकडीवर पोहोचली. गार वार्‍याची झुळुक येताच तिचे मन मोहरून उठले.

फिरून येताना नुकतेच फटफटू लागले होते. पूर्व क्षितिजावर केशरी सोनेरी रंग दाटून येत होते. त्या गडद रंगांतून तेजोनिधी लोहगोल तो सूर्य हळूहळू वर येत होता. सोनेरी किरणांनी टेकडीवरील झाडे उजळून निघाली होती. जाग आलेल्या पक्ष्यांचा किलबिलाट चैतन्य पसरवत होता. ते विलोभनीय दृश्य अनुभवताना शुभदा हरखून गेली. निसर्गाच्या या अलौकिक सौंदर्याकडे आपण कधीच कसं पाहिलं नाही? सूर्य जसा नित्य नवा असतो तसं आपणही मनांत कसलंही किल्मिष न बाळगता प्रत्येक दिवस नवा अन संधी नवी असं मानायला काय हरकत आहे, असा विचार करीत शुभदा घरी आली.

सकाळचे फिरून झाल्यावर सुमित्राकाकू सात वाजता हजर झाल्या. समोरच्याच सुपरशॉपमधून भाज्या, लिंबू, मिरची, कोथिंबिर घेऊन आल्या. खरेदीच्या रिसीट सोबत उरलेले पैसे परत देत त्यांनी शुभदाला आठवड्याचा मेनूही दिला. ‘काही बदलायचं असेल तर सांग,’ असं म्हणत किचनमध्ये शिरल्या. त्यात बदलण्यासारखे काहीच नव्हते. अगदी अर्ध्या तासात स्वयंपाक संपवून त्या बाहेर पडल्या.

साडेआठला सखूबाई आल्या. ‘ताईसाहेब, पंधरा मुलं तयार हायती. शिकवणीसाठी कम्युनिटी हॉल मिळतोय. दोन दिस थांबावं लागंल.’

शुभदाने होकार भरला आणि त्याच संध्याकाळी तिने आठवीचे गणित आणि इंग्रजी विषयाचे पुस्तक विकत घेतले.

संध्याकाळी साडेपाच वाजता बॅंकेतले काम आटोपून शुभदा डायरेक्ट कम्युनिटी हॉलवर पोहोचली. आधी या मुलांचं व्याकरण पक्कं करणं आणि गणिताचा विषय सोपा करून शिकवणे आवश्यक आहे हे तिच्या लक्षात आलं. मुलं शुभदाच्या शिकवणीत रमून गेली.

दिवसामागून दिवस सरत होते. सर्वच मुलांनी पुढच्या सहामाहीत चांगले यश मिळविले. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी सर्वच पालक झटत असतात पण निरपेक्षपणे इतरांच्यासाठी काही करण्यात किती आनंद असतो हे शुभदा पहिल्यांदाच अनुभवत होती.

घरी परत जाताना शुभदानं आकाशाकडे पाहिलं. उगवतीच्या सूर्यासारखे उमलत जाणार्‍या आपल्या मुलांच्याकडे पाहून किती प्रसन्न वाटायचं. आता आपलं वय ढळत चाललंय अगदी तसं दिवस मावळतीकडे झुकत चालला होता. आकाशात एक अनोखं चित्र साकारत होतं. क्षितिजावर निळसर प्रकाश रेंगाळत होता आणि क्षणार्धातच त्यात लाल, पिवळसर, सोनेरी रंग मिसळत चालले. ‌‌अख्खे सूर्यबिंब केशरी दिसू लागले. सर्वत्र संधिप्रकाश पसरत चालला. सूर्यास्ताचं देखणं दृश्य शुभदाच्या मन:पटलावर बिंबलं गेलं. सूर्योदयाच्या इतकीच संध्याकाळसुद्धा तितकीच मनोहारी वाटत होती.

सूर्योदय असो वा सूर्यास्त, निसर्ग मात्र तेवढ्याच सुंदरतेने प्रकट होतो. मग आपणच ‘संध्याछाया भिवविती हृदया’ असं कां म्हणावं? आयुष्याच्या संध्यासमयी आपणही निसर्गाप्रमाणे तेवढ्याच ग्रेसफुली प्रकट व्हावं. पावलापावलावर सुख आपल्याला साद घालीत असतं. त्या गोष्टीत लपलेले सुख मात्र आपल्यालाच शोधता आले पाहिजे. हळूहळू तिच्या मनावरचे मळभ दूर होत गेले.

घरी आल्यावर तिने रेडियो ऑन केला. जितेंद्र अभिषेकी समरसून गात होते. व्यथा असो आनंद असू दे / प्रकाश किंवा तिमिर असू दे / वाट दिसो अथवा ना दिसू दे / गात पुढे मज जाणे… माझे जीवनगाणे… जणू मंगेश पाडगावकरांचे शब्द पंडितजींच्या सुरांच्या हिंदोळ्यावर झुलत होते.

शुभदाच्या मुखातून ‘वा!’ शब्द उत्स्फूर्तपणे बाहेर पडला. एखादे गाणे ऐकणे हा देखील इतका अलौकिक अनुभव असू शकतो हे शुभदाला पहिल्यांदाच जाणवलं. सुख, समाधान हे आपल्याच मनोव्यापारांवर अवलंबून असतात हे तिला पटलं.

पंडितजी गातच होते. ‘गा विहंगांनो माझ्या संगे / सुरावरी हा जीव तरंगे…… माझे जीवनगाणे !’

– समाप्त – 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments