श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “हेच तर ते देवदूत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

भर पावसात भिजत उभ्या असलेल्या तरूणास विचारले , “नुसताच भिजतो कश्याला?”

 तो उत्तरला “नही साब”.. त्याच्या डाव्या बाजूला जमिनीकडे बोट दाखवतं तो म्हणाला,

“इधर निचे बडा पाईपलाईन है. ढक्कन निकल गयेला है”

तो त्या मॅनहोलमध्ये कोणी पडू नये, म्हणून तिथे ऊभा होता!

रस्त्याखालचा पाईप पूर्ण भरला असावा, अन्यथा पाणी चक्राकार आत घुसताना दिसले असते. फुटभर ऊंचीचे पाणी वरून वेगाने जात होते. पायी चालणाऱ्याला वा दुचाकीवरून जाणाऱ्या कोणाला जाणवलेही नसते, की खाली खोल सांडपाण्याचा पाईप आहे!

मी अवाक झालो!

कोण होता हा? कोणासाठी हा असा पाण्यात ऊभा राहिलायं?

मी भरं पावसातं खाली ऊतरलो. त्याला म्हंटले, “बहोत बढिया, भाई!”

तो फक्त कसनूसं हसला आणि म्हणाला,

“बस, कोई गिरना नै मंगता इधर”

“कबसे खडा है?”

“दो बजे से”

घड्याळातं पाच वाजले होते..!

३ तास तसेचं ऊभे राहून याला भूक लागली असणारं. दुर्दैवाने माझ्याकडे काहीच नव्हते. सगळी दुकानेही बंदं. हा भूक लागल्यामुळे जागा सोडेल, असे काहीच चिन्ह नव्हते!

कुठल्या प्रेरणेने तो हे करतं होता? त्या घाण गुडघाभर ऊंचीच्या पाण्यात उभे राहून तो तीन तासांपासून कोणाला वाचवतं होता? आणि का? दोन वाजल्यापासून त्याने कित्येक  जणांना वाचवले असणार. कोणाला त्याची जाणीवही नव्हती. खुद्द याला तरी त्याची कुठे पर्वा होती?

ही अशी छोटी छोटी माणसें हे जग सुंदर करून जातात!

मागच्या डिसेंबरमध्ये दादरला फुटपाथवर एक आंधळा म्हातारा ‘कालनिर्णय’ विकतं बसलेला दिसला.

दुकानातून घेण्याऐवजी, याच्याकडून घेतलेले काय वाईट, असा विचार करून थबकलो.

“केवढ्याला ‘कालनिर्णय’, काका?”

“फक्त बत्तीस रूपये, साहेब” केविलवाणे तो म्हणाला. सकाळपासून एकही विकले  गेलेले दिसतं नव्हते. मी एक घेतले. पन्नासची नोट होती. ती त्याला दिली. हाताने चाचपडत तो ती नोट तपासतचं होता, की अचानक उंची कपडे घातलेला साठीतला एक देखणा गृहस्थ खाली वाकला.

“कितने का है ये?”

“बत्तीस रुपया”

“कितने है?”

“चौदा रहेंगे, साब”

ज्याला मराठी येतं नाही, असा हा माणूस मराठीतले कालनिर्णय कशासाठी विकत घेतोयं?

त्या माणसाने खिशातून साडेचारशे रुपये काढून त्याला दिले आणि ते सगळे कालनिर्णय बखोटीला मारले! 

मी आश्चर्यचकित..! छापील किंमतीत विकतं घेतोय, म्हणजे पुनर्विक्रीसाठी निश्चितच घेतं नाहीये. तसाही, कपड्यांवरूनही हा असले किरकोळ धंदा करणाऱ्यातला वाटतं नव्हता.

तो गृहस्थ थोडा पुढे गेला असेल. मला राहवलेचं नाही. मी थांबवून त्यांना विचारलेच!

हे मुळचें लखनौचे महोदय एअरइंडियातल्या मोठ्या पदावरून नुकतेचं निवृत्त झाले होते. शिवाजीपार्कात स्वत:चे घर होते. एकुलता एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता. लठ्ठ पेन्शन येत होती.

“वो बेचारा पंधरा कालनिर्णय बेचके कितना कमाता होगा? सौ, डेढसौ? वैसे भी बेचारे को सौ रुपये के लिए दिनभरं ऐसेही धुप मे बैठना पडता था. मैने ऊसका काम थोडा हलका करं दिया. बस इतनाही!”

मला काही बोलणेचं सुचले नाही! पण एवढ्या चौदा कालनिर्णयांचे तो करणारं काय होता?

“सोसायटी मे बहोत मराठी फ्रेंडस है, उन को बांट दूंगा!”

मी दिग्मूढ!

“तु एक मिनीट लेट आता, तो तुझे भी फोकट मे देता!” मला डोळा मारतं, हसतं तो लखनवी देवदूत रस्ता पार करून गेला सुद्धा!

माणूसकी याहून काय वेगळी असते? 

एखाद्या हॉस्पिटलबाहेर ‘तात्काळ रक्त हवे’ असा फलक वाचून, ऑफिसला वा घरात जायला ऊशीर होईल, याची तमा न बाळगतां रक्त देणारे कोण असतात? ते ही रांग लावून! 

कोण असतात हे? कुठल्या जातीचे? कोणत्या धर्माचे? ‘भैये’ असतात की ‘आपले’ मराठी?

मुंबईत रस्त्यावर चहा विकणारे लाखो ‘चायवाले’ आहेत. 

बहुतांश उत्तरेकडले. सकाळी चहा बनवल्यावर पहिला कपभरं चहा ते रस्त्यावर फेकतात.

दिवसाचा पहिला चहा रस्त्यावर न फेकता भिकाऱ्याला पाजणारा बांद्र्याचा एक ‘चायवाला’ मला माहिती आहे! सकाळी सकाळी भिकारी आलाचं नाही, तर एका भांड्यात तेवढा चहा बाजूला काढून, धंद्याला सुरूवात करतो!

“बर्कत आती है” एवढीचं कारणमिमांसा त्याने दिली होती.

डोळे ऊघडून पाहिले, तर असे असंख्य अज्ञात देवदूत आपल्याला ठायीठायी आढळतात, पण आपली नजरचं मेलेली असते.

परवा थायलंडमध्ये गुहेत अटकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी हजारो अनामिक हात मदतीस आले. 

गुहेतले पाणी पंपाने बाहेर काढावे लागले. ते पाणी कुठे फेकले?

ज्याच्या शेतातं ते पाणी फेकावे लागले, त्या शेतातलें तीन एकरातले ऊभे पिक या पाण्याने अक्षरशः वाहून गेले. एका छोट्या शेतकऱ्यासाठी हे प्रचंड नुकसान.

एका पत्रकाराने त्या शेतकऱ्याला या नुकसानीविषयी खोदून खोदून विचारले.

“नुकसानीचे काय एवढं? मुले वाचली ना? पेरणी परतं करता येईल. मुलांचे प्राण परतं आणता आले असते का?”

हे ऊत्तर ऐकूनचं डोळ्यात पाणी आल!

हे जग सुंदर आहे. ते सुंदर करणारे अनामिक देवदूत आजही या जगात आहेत आणि राहतीलही.

फक्त तो तिरस्काराचा, आत्मकेंद्री स्वार्थाच्या काळ्या काचांचा गॉगल डोळ्यावरून काढला पाहिजे!

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments