डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अशी पाखरे येती…!!! – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
(श्री अजय कटारिया सर यांना सादर समर्पित)
(भावनेच्या भरात हा “वेडा माणूस” स्वतःचं खूप नुकसान करून घेत आहे, याची मला मनोमन जाणीव होती.) – इथून पुढे
याच प्रेमाच्या भावनेतून, 2023 साली मी यांच्याकडे ऑर्डर दिली नाही, आप्पा बळवंत चौकातील दुसऱ्या एका नामांकित दुकानातून मी साहित्य विकत घेण्यासाठी ऑर्डर दिली.
लिस्ट नीट लिहून आणायची, अक्षर तुमचं तुम्हाला तरी कळतंय का ? बाजूला थांबा जरा, बाकीची गिऱ्हाईकं बघू देत … वेळ किती लागेल म्हणून काय विचारता ? इतकं एकच काम आहे का ? सामान काय आहे ते आत्ताच मोजून घ्या, पुन्हा कटकट करायची नाही…
ए यांना मराठी भाषा कळत नाही, दुसऱ्या भाषेत सांग रे यांना जरा…. असा स्वतःचा पाणउतारा करून घेतला…
यानंतर कॅरीबॅगचे सुट्टे पैसे देईपर्यंत आमच्या वस्तूंना त्यांनी आम्हाला हात सुद्धा लावू दिला नाही… !
हरकत नाही… जगात सगळेच कटारिया साहेब जन्माला आले तर मग अनुभव कसा मिळणार ?
असो… हा प्रकार पुढे कटारिया साहेबांना कसा कोण जाणे पण कळला
एके दिवशी शंकर महाराज मठाजवळ भीक मागणाऱ्या लोकांना मी तपासत असताना ते तावातावाने आले.
चेहऱ्यावरचा मृदुभाव आणि ओठांवरची मृदू वाणी यावेळी लुप्त झाली होती.
‘डॉक्टर तुम्ही स्वतःला समजता काय ? सेवा करण्याचा मक्ता काय तुम्हीच घेतला आहात का ? थोडीफार सेवा आम्ही करत होतो, आमच्या हातून हि सेवा काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?’
सेवा करणे हा माझा अधिकार आहे आणि तो तुम्ही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.
मी तुम्हाला माफ नाही करणार…
ते रागानं थरथर कापत बोलत होते…
या जमदग्नीपुढे मी नतमस्तक झालो… पायावर डोकं टेकवलं… आणि त्यांच्या प्रेमाचा राग माझ्या झोळीत मनसोक्त भरून घेतला !
तुम्हाला ऑर्डर न देण्यामागे माझी पण काय भावना आहे, हे सर्व मी त्यांना उलगडून सांगितले, क्षणात या जमदग्नीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले… !
स्वतःचे अधिकार मिळवण्यासाठी लोक आंदोलन, उपोषण, रास्ता रोको करतात… सेवा करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी हा माणूस आज माझ्याशी… माझ्याशी ??? भांडला… !!!
यानंतर पुढे दोन-तीन वेळा मोघम भेटी झाल्या.
आता साल उजाडले 2024.
यावर्षीची शैक्षणिक ऑर्डर “चॉईस” मध्ये देण्याशिवाय मला दुसरा कोणताही “चॉईस” नव्हता…!
मी 13 जून 2024 ला कटारिया साहेबांच्या फोनवर फोन केला. पलीकडून आवाज आला हॅलो मी चिराग बोलतोय… !
चिराग हे कटारिया साहेबांचे सुपुत्र, चार्टर्ड अकाउंटंट आहेत !
‘हॅलो चिराग सर, कटारिया साहेब कुठे गेले त्यांना फोन द्या ना..’
‘सर बाबा गेले’ पलीकडून मंद आवाज आला.
आमचा हा माणूस कोणालातरी मदत करण्यासाठी, कोणाच्यातरी पाठी धावतच असतो, सतत फिरत असतो, हे मला माहित होतं. त्याच भावनेने मी बोललो…
‘अच्छा गेले का ? बरं पुन्हा कधी येतील ?’ मी हसत बोललो.
‘बाबा गेले सर… परत ते पुन्हा कधीही येणार नाहीत … तुम्हाला माहित नाही ?’
माझ्या पायाखालची जमीन सरकली… मी सुन्न झालो… मी काय ऐकतोय यावर माझा विश्वास बसेना…
भानावर आलो, तेव्हा मात्र या माणसाची मला भयंकर चीड आली…
पलीकडच्या चौकात जाताना सुद्धा घरात आपण सांगून जातो… मग इतक्या मोठ्या प्रवासाला जाताना साधं आम्हाला सांगण्याची, निरोप घेण्याची सुद्धा तुम्हाला गरज वाटली नाही ?
भांडून सेवेचे अधिकार मागता आणि असं बेजबाबदारपणे सोडून जाता ?
आमच्या पोरांना पोरकं करून जाण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?
हे…हे… असं… काउंटरवर तबला वाजवत आम्हाला आशा का दाखवलीत ?
कटारिया साहेब, आता मी सुध्दा तुम्हाला माफ नाही करणार…!
‘सर काही काम होतं का ?’ फोन अजून चालूच होता, पलीकडून चिराग सरांचा आवाज आला.
‘शैक्षणिक साहित्याची ऑर्डर द्यायची होती…’ मी शांतपणे बोललो.
‘ठीक आहे सर, दोन दिवसात पाठवतो.’ तितक्याच शांतपणे उत्तर आले.
दोन दिवसांनी सामान आले, मी बॉक्स खोलले.
आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या होत्या, एक दप्तर मागितले तेथे पाच दप्तरे होते, पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे 25 होत्या…
मी चिराग सरांना फोन केला, म्हणालो, ‘चिराग सर, बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे… हि आमची लिस्ट नव्हे, काहीतरी चूक झाली असावी !
चिराग सर म्हणाले, ‘सर मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, आकड्यांच्या खेळात मी चुकत नाही, तुम्ही दिलेले सामान मी अत्यंत काटेकोरपणे मोजून मापून स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरलं आहे, चूक होणार नाही माझी…!’
‘अहो पण, चिराग सर… एका वस्तूच्या बदल्यात पाच पाच वस्तू आल्या आहेत आम्हाला…’
‘अच्छा… हां… हां…. त्या एक्स्ट्रा वस्तू का ? त्या मी नाही… बाबांनी पाठवल्या असतील कदाचित सर …’
फोन कट झाला …!!!
इतका वेळ धरून ठेवलेला बांध आता फुटून गेला… !
कटारिया साहेब चिरंतन प्रवासाला निघून गेले…
पण जाताना आपल्या विचारांची एक पणती मागे ठेवून गेले.
या पणतीला नाव सुद्धा काय दिलं आहे… ? चिराग… व्वा…!!!
यानंतर 15 जून 2024 ला सर्व चिल्ल्यापिल्लांना बोलावून शैक्षणिक साहित्य दिले.
नवीन वही, नवीन पुस्तक, नवीन दप्तर, नवीन कंपास पेटी पाहून या सर्व चिमण्या आनंदाने चिवचिवल्या… !
या चिवचिवणाऱ्या चिमण्यांना आता कोणत्या तोंडाने सांगू ….
बाळांनो, आज खऱ्या अर्थानं तुम्ही पोरके झालात रे….
आणि तुमच्या बरोबर मी सुद्धा… !!!
– समाप्त –
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈