इंद्रधनुष्य
☆ डॉ. आनंदीबाई जोशी… भाग – २ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
३१ मार्च… भारताच्या पहिल्या एम. बी. बी. एस. महिला वैद्य अर्थात लेडी डॉक्टर म्हणून प्रचंड गाजलेल्या मराठमोळ्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्मदिन
जन्म: ३१ मार्च १८६५, पारनाका, कल्याण.
मंडळी, कल्पना करा आज आपण आपले अपत्य परदेशी जायला निघाले, विशेषतः मुलगी जात असेल तर किती चिंताक्रांत होतो? साधे पुण्याहून मुंबईलाही आज आपण मुलीला एकटे पाठवत नाही. १२५ वर्षापूर्वीचा हा इतिहास वाचा. मुलींना साधे प्राथमिक शाळेतही पाठवत नव्हते त्या काळी आनंदीबाईनी एवढे धाडस केले, काय सोपी गोष्ट आहे? त्यात आनंदीबाई पूर्ण शाकाहारी होत्या, नऊवारी पातळ हाच आनंदीबाईंचा पोशाख होता. जहाजावर देखिल आनंदीबाईची खूप उपासमार झाली. फक्त बटाटा वेफर्स आणि मिळाली तर फळे यावर आनंदीबाईनी दोन महिने काढले, कारण बाकी सर्व पदार्थात काहीना काहीतरी मांसाहारी पदार्थ मिसळल्याचा वास आनंदीबाईंना यायचा. यातच आनंदीबाईंना आजारपण आलं. पुढे अमेरिकेतसुद्धा ४ वर्षे आनंदीबाईंची उपासमारच झाली. भारतीय पद्धतीचं अन्न आनंदीबाईंना कधीच मिळालं नाही. परदेशी कपडे वापरायचे नाहीत म्हणून आनंदीबाई नऊवारी पातळ नेसून धाबळीचे जाड पोलकं घालत असत. अमेरिकेतली बर्फाळ थंडी आनंदीबाईचं शरीर चिरत होती. पुन्हा यात कठीण अभ्यास, स्वत:चा स्वयंपाक स्वत: करणे, समाज-नातलगांची दूषणं सहन करणे हे सर्व सोसून आनंदीबाई आपलं साध्य कार्य करत होत्या. अमेरिकेतही आनंदीबाईंना कुत्सित वागणूक मिळाली. तिथे फक्त कार्पेंटरबाई आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या अशा काही चांगल्या महिला सोडल्या तर बऱ्याच जणांनी आनंदीबाईना खूप त्रास दिला. प्रवासात सुद्धा जहाजावर पुरुषांच्या वासनेच्या नजरा आनंदीबाईना नकोसं करून टाकत असत. जिच्या सोबतीने आनंदीबाई हे सर्व साध्य करण्यास निघाल्या होत्या, त्या अमेरिकन बाईचं वागणंही ठीक नव्हतं. या सर्वाचा आनंदीबाईच्या मनावर व शरीरावरही दुष्परिणाम होत गेला. सतत अर्धपोटी राहिल्याने आजारपण आनंदीबाईंच्या पाठी लागलं. भारतातले कर्मठ लोक तर म्हणत असत की आता आनंदी ख्रिस्ती होऊनच येईल. हाडं चघळायला लागेल. अमेरिकेत आनंदीबाईच्या सहवासात येणाऱ्या मिशनरीज त्यांना ख्रिस्ती हो असा उपदेश करीत. पण स्वदेश, स्वपोशाख (नऊवारी पात्तळ-पोलकं), पूर्ण शाकाहारीपण, पूर्ण मराठी पद्धतीचं आचरण, उपास तापास याची घट्ट बांधिलकी हे सर्व आनंदीबाईंनी कधीच सोडलं नाही. हिंदू आणि मराठी संस्कृतीशी आनंदीबाईंनी कधीच प्रतरणा केली नाही. आज जे आनंदीबाईंचं छायाचित्र सर्वत्र प्रसिद्ध केलं जातं ते गुजराथी पद्धतीने नेसलेली साडी आणि दागिने घातलेलं चित्र दिसते. त्याबद्दल स्वत: डॉ. आनंदीबाईंनी लिहिलं आहे की इथल्या हवेत वारंवार फरक होत राहतो. नऊवारी कासोटा घातल्याने पाय थोडेसे उघडे पडतात. यासाठी पाचवारी गुजराथी पोशाख मी स्वीकारला. तो घातल्याने डोके व सर्व शरीर झाकले जाते. एकूणच पोशाखाबद्दल आनंदीबाईनी आपल्या पत्रात सविस्तर लिहिलं आहे. १६ नोव्हेंबर १८८६ दिवशी आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांना पहायला मुंबई बंदरात लोकांनी तुफान गर्दी केली होती. आनंदीबाईंचं स्वागत पुष्पवृष्टीनं करण्यात आलं. मुंबई बंदरात बोटीतून उतरण्यापूर्वीचं आनंदीबाईंच्या पोशाखाचं वर्णन असं आहेः नारायणपेठी काळी चंद्रकळा (नऊवारी), खणाचं पोलकं, कपाळावर चंद्रकळा, नाकात नथ, कानात कुडी, पायात बूट व स्टॉकिंग्ज असा थाट होता. आल्या तेव्हा आनंदीबाई आजारीच होत्या, परंतु हिंदुस्थानात घरी जायला मिळणार आणि घरचं मराठमोळं अन्न खायला मिळणार म्हणून आनंदीबाईची प्रकृती तात्पुरती सुधारली होती. आनंदीबाईंना अभिनंदनाच्या तारा, मानपत्रे येत होती. मानपत्रात आनंदीबाईंच्या उच्च शिक्षणाचा गौरव केला गेला. अमेरिकेत ११ मार्च १८८६ रोजी फिलाडेल्फिया येथे आनंदीबाईंना वैद्य विद्यापारंगत ही पदवी आणि पुरस्कार देण्यात आला. भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणून सर्व उपस्थितांनी आनंदीबाईंची उभे राहून जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात प्रशंसा केली होती. डॉक्टर होऊन आनंदीबाई स्वदेशी आल्या. पण एव्हाना आनंदीबाईंना क्षयाची बाधा झाली होती. बिगरगौरवर्णीय असल्यामुळे जहाजावर कुणाही परदेशी डॉक्टरने आनंदीबाईंना उपचारही दिले नाहीत. मायदेशी आल्यावर समुद्रोल्लंघन करून आलेली, त्यातून स्त्री डॉक्टर म्हणून इथले वैद्यही आनंदीबाईंचा दुस्वास करत होते,इथले डॉक्टर आनंदीबाईंना तपासूनही पाहात नव्हत. आनंदीबाईंना वयाच्या विशीतच क्षयरोग झाला. अमेरिकेत काॅर्पेंटर कुटूबियांनी आपल्या कुटुंबाच्या स्मशानात (ग्रेव्हयार्ड) आनंदीबाईंचे लहानसे थडगे बांधले. त्यावर आनंदी जोशी एक तरुण हिंदू ब्राह्मणकन्या, परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री अशी अक्षरे कोरून तिचे स्मारक केले. हे सगळे वाचल्यावर डॉ. आनंदीबाई जोशी किती थोर होत्या असं आपल्या मनात निनादत राहतं. आजही ते थडगे पहायला मिळते. काही राष्ट्रभक्त मराठी मंडळी आनंदीबाईंच्या थडग्याला आवर्जून भेट देतात, आदरांजली वाहतात. वयाच्या केवळ १८व्या वर्षी बोटीनं परदेशी जाणारी पहिली स्त्री, हालअपेष्टा सहन करीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारी पहिली स्त्री. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करीत हाती घेतलेले जीवित कार्य जिद्दीने पूर्ण करणारी स्त्री. भारतीय (मराठी) रीतिभाती, शुद्ध शाकाहारी आहार सांभाळणारी, तरीही इंग्रजी भाषा उत्तम आत्मसात करून वैद्यकीय शिक्षण प्रकृती स्वास्थ्य सांभाळीत अभ्यासक्रम पूर्ण करणारी तरुणी. या सर्वाबरोबर पती, नातेवाईक, सुहृद यांना सतत पत्र लिहून त्यांच्याशी संवाद साधणारी डॉ. आनंदीबाई यांच्यावर त्यांच्या समकालीन आणि लेखिका असलेल्या काशीबाई कानिटकर यांनी चरित्र लिहिले आहे. अंजली कीर्तने यांनी संशोधन करून आनंदीबाई या नावाचं एक चरित्र लिहिलं आहे. श्री.ज. जोशी यांनी आनंदीबाईंवर आनंदी गोपाळ ही कादंबरी लिहिली आहे. आनंदीबाईंवर आनंदीबाई हे नाटकही रंगभूमीवर आलं आहे १५०हून अधिक वर्षे झाली तरी डॉ. आनंदीबाई जोशींची वैचारिक संघर्षांच्या संदर्भात भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आजही वाचकांना, अभ्यासकांना, स्त्रियांना भुरळ पडते.
आनंदीबाई जोशी यांचे २६ फेब्रुवारी १८८७ रोजी निधन झाले.
आनंदीबाई जोशी यांना विनम्र अभिवादन.
– समाप्त –
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈