श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 181 – कुंठे शोधू विठूराया ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆
☆
कुंठे शोधू विठूराया
कशी लोपली रे माया।
म्हणे भोळ्या भक्तावरी
तुझी अविरत छाया ।
*
आई वडिलांची आज्ञा
शब्द जणू पर्वणीच।
कामामध्ये वसे राम
भान ठेव करणीचं।
*
रूपं सावळं शोधलं
शाळकरी बालकांत।
सारं आयुष्य रंगलं
गोड बोबड्या बोलात।
*
कुठे टाळ नि मृदुंग
नच चिपळ्यांची साथ।
नाचताना दिसला रे
गोपालात दिनानाथ।
*
दर सली मोहविती
तुझी अगणित रूपे।
अशा मोह मायेमध्ये
कुणा वारी आठवते।
*
सेवानिवृत्तीने केली
बंद दारं मंदिराची।
कुठे शोधू विठूराया
जपलेली छबी त्यांची ।
*
थकलेल्या तन मना
वारी घडणार नाही।
नको हेळसांड करू
आता वैकुंठास नेई।
☆
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈