श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ धन्य मी – कृतार्थ मी  श्री सुहास सोहोनी ☆

चार विभूती जन्मा आल्या

माझ्या भूमीवरती …

दु:खे पाहुनी त्यांची, मीही

अश्रु ढाळले किती …

*

विश्वोद्धारक रूपे त्यांची

आता दिसती मला…

भाग्यशालि मी आता झाले

मान मला लाभला

*

आनंदी मी आळंदी मी

भरून आले नेत्र …

ईश कृपेने झाले माझे

पवित्र तीर्थक्षेत्र ….!!

*

तृप्त मने आळंदी वदते

काहिच नाही कमी …..

धन्य मी अन् कृतार्थ मी …..

धन्य मी अन् कृतार्थ मी …..

☘️ 

अंगांगी रोमांच उमटला

इंद्रायणिच्या जळी …..

काय जाहले काहि कळेना

झाली सरिता खुळी …..

*

कसला झाला, कोणी केला

दिव्यत्वाचा स्पर्श …..

आनंदाचे तरंग उठले

मनि मावेना हर्ष …..

*

तुकयाने जव जळी बुडविली

पवित्र अभंग गाथा …..

त्या गाथेचा स्पर्श अलौकिक

सरिता टेकी माथा …..

*

इंद्रायणिची सखी जाहली

तुकयाची गाथा …..

वाळवंटी या अखंड चाले

निरुपण, कीर्तन, कथा …..

*

इंद्रायणिच्या कणाकणातुन

अजून उमटे ध्वनी …..

धन्य मी अन् कृतार्थ मी …..

धन्य मी अन् कृतार्थ मी …..

☘️

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments