श्री सुहास सोहोनी
इंद्रधनुष्य
☆ योग्य लेखन — लेखक : श्री अनिल विद्याधर आठलेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
बोलत असताना किंवा लिहिताना केवळ शब्दच नाही तर अंकदेखील आपण चुकीचे उच्चारतो. नक्की कोणता आणि कसा उच्चार योग्य आहे हेच अनेकदा माहीत नसतं त्यामुळे असं होतं.
उदाहरणार्थ –
१९ = एकोणवीस ❎❎❎
एकोणीस ✅✅✅
४४ = चौरेचाळीस ❎❎❎
चव्वेचाळीस ✅✅✅
७८ = अष्टयाहत्तर/अष्टयात्तर ❎❎❎
अठ्ठयाहत्तर ✅✅✅
८८ = अष्टयाऐंशी ❎❎❎
अठ्ठयाऐंशी ✅✅✅
९५ = पंच्यांण्णव ❎❎❎
पंचाण्णव ✅✅✅
(संदर्भ : महाराष्ट्र शासन, ०६ नोव्हेंबर २००९ च्या आदेशानुसार )
क्रमवाचक संख्याविशेषणांच्या बाबतीत एक महत्त्वाचा उल्लेख –
पहिली चार क्रमवाचक संख्याविशेषणे अनियमित आहेत –
– पहिला/ली/ले/ल्या
– दुसरा /री/रे/र्या
– तिसरा/री/रे/र्या
– चौथा/थी/थे/थ्या
पाच अंकापासून मात्र पुढील सर्व अंकांना ‘वा’ हा प्रत्यय लागतो.
उदाहरणार्थ – पाचवा, सातवा, बारावा इ.
#महत्त्वाचा उल्लेख –
ज्या अंकात उपान्त्य ( सोप्या भाषेत – शेवटच्या अक्षराच्या आधीचं ) अक्षर दीर्घ (‘ई’) तर उपान्त्य अक्षर म्हणजेच ‘ई’ स्वर असणारे अक्षर र्हस्व होईल.
उदाहरणार्थ –
एकोणीस – एकोणिसावा
वीस – विसावा
बावीस – बाविसावा
(संदर्भ – मराठी शब्दलेखनकोश, प्रा. यास्मिन शेख)
तसे साधेच नियम आहेत, पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
मराठी आपली मातृभाषा आहे असं आपण म्हणतो. ती अभिजात भाषा म्हणून घोषित झाली पाहिजे अशीही आपली अपेक्षा असते, पण आपल्याच भाषेतील अशा छोट्या-छोट्या चुका टाळण्याच्या दृष्टीने आपण काही खास असे प्रयत्न करतो का?
बघा, विचार करा.
लेखक : श्री अनिल विद्याधर आठलेकर
प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈