महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 182
☆ असे वाटले माझ्या मनाला… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆
☆
असे वाटले माझ्या मनाला
पुन्हा एकदा बालक व्हावे
सोडोनी सर्व कष्ट चिंता
आपल्यात, आपण रमून जावे.!!
*
असे वाटले माझ्या मनाला
मित्र जुने मज भेटावे
विटी दांडू गोट्या कबड्डी
खेळ लिलया मग खेळावे…!!
*
असे वाटले माझ्या मनाला
लपाछपी रंगून जावी
खोडकर वृत्ती खेळण्यातली
त्याची एकदा उजळणी व्हावी…!!
*
असे वाटले माझ्या मनाला
शाळेत पट्कन लगेच बसावे
कमरे खाली घसरणारी चड्डी
हाताचा आधार, पळत सुटावे…!!
*
असे वाटले माझ्या मनाला
उचलून मला कुणीतरी घ्यावे
रडूनी सुजले डोळे जर-तर
खाऊसाठी पैसे मिळावे…!!
*
असे वाटले माझ्या मनाला
बोबडे बोल पुन्हा बोलावे
सोडूनि सर्व, कामे हातातली
आईने मज, दूध पाजावे…!!
*
असे वाटले माझ्या मनाला
काळ पुन्हा मागे सरकावा
मुक्त विहार करतांना कधी
वडिलांचा, प्रसाद मिळावा…!!
*
असे वाटता माझ्या मनाला
स्वप्नातून भानावर आलो
क्षणभर स्तब्ध होतांनाच
गालातल्या गालात, मी हसलो…!!
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈