श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ अभी ना जाओ… ☆ श्री मंगेश मधुकर ☆
सर्वकाही ठरवल्याप्रमाणे होईल असं गृहीत धरून दिवसाची सुरवात करतो परंतु आयुष्य कधी,कुठं अन कसं वळण घेईल हे सांगता येत नाही.असंच काहीसं कर्नलच्या बाबतीत घडलं.रोजच्याप्रमाणे फिरायला गेलेल्या बायको नलिनीला कारनं धडक दिली.अंगावर चार-पाच ठिकाणी खरचटलं परंतु जोरात डोकं आपटल्यानं जागेवरच शुद्ध हरपली.मेंदूला जबर मार बसल्यानं दहा दिवस झाले तरी बेशुद्धच होत्या.त्या एका घटनेनं सगळंच बदललं.कर्नल,त्यांच्या दोन्ही मुली,जावई सगळेच प्रचंड तणावाखाली होते.
आयसीयूतला राऊंड संपवून डॉक्टर आले तेव्हा नातेवाईकांनी गराडा घातला.पेशंटविषयी माहिती दिल्यावर शेवटी डॉक्टर कर्नल बसले होते तिथं आले.हातातली काठी सावरत कर्नल उभे राहायला लागले.तेव्हा डॉक्टर म्हणाले“तुम्ही बसा”
“एनी गुड न्यूज..”कर्नलनी विचारलं तेव्हा डॉक्टरांनी नकारार्थी मान डोलावली.
“तब्येतीत काहीच फरक नाही.जैसे थे. वेंटीलेटर सुरू करूनही आता बरेच दिवस झालेत. एकूण परिस्थिती पाहता सुधारणा होण्याची शक्यता नाही. तुम्हांला खोट्या आशेवर ठेवत नाही.पेशंटला होणारा त्रास,वेळ आणि पैसा याचा विचार करता निर्णय घेण्याची वेळ आलीय.”डॉक्टरांचं निर्वाणीचं बोलणं ऐकून मुलींच्या डोळ्यात टचकन पाणी आलं तर दोन्ही जावई सुन्न.कर्नल मात्र बर्फासारखे थंड.
“काहीच करता येणार नाही का”थोरलीनं विचारलं.
“दुसऱ्या हॉस्पिटलला नेऊ”धाकटी.
“आपण शक्य ते सगळे प्रयत्न केलेत पण पेशंटकडून काहीच प्रतिसाद नाही.तुम्हांला सेकंड ओपिनीयन किवा शिफ्ट करायचं असेल तर हरकत नाही.पुन्हा सांगतो,नो होप्स,इट्स टाइम टु टेक फायनल कॉल.”कर्नलच्या हातावर थोपटत डॉक्टर पुढच्या राऊंडला गेले.अनपेक्षितपणे समोर आलेल्या वास्तवामुळे मुली बावरल्या.जावई भावूक झाले.एवढं होऊनही कर्नल जरासुद्धा विचलित न होता शांत बसलेले होते.
“पपा,”दोघी बहिणी वडिलांना बिलगून हमसून हमसून रडायला लागल्या.त्यांना धीर देताना कर्नलचे डोळे कोरडे तर चेहरा नेहमीसारखाच करारी,भावविरहीत.
“पपा,काहीतरी बोला”थोरली.
“काय बोलू!!आता बोलण्यासारखं काहीच राहील नाही.”कर्नल
“म्हणजे तुम्ही मान्य केलंत”
“दुसरा पर्याय आहे का?डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलंय.आता निर्णय आपल्याला घ्यायचाय.”
“काही निर्णय बिर्णय घ्यायचा नाही.ममाला दुसरीकडं शिफ्ट करू’”थोरली.
“येस,”म्हणत धाकटीनं बहिणीच्या बोलण्याला दुजोरा दिला.
“जागा बदलली तरी वास्तव तेच राहणार.डॉक्टरांचे प्रयत्न आपण पाहिलेत.नियतीनं वेगळाडाव टाकला.” कर्नल एकदम बोलायचं थांबले.
“इतक्या लवकर हार मानलीत.”
“हार नाही,वास्तव स्वीकारलयं.तुम्हीही ते मान्य करा.”
“अजूनही वाटतंय की काहीतरी चमत्कार घडेल आणि ममा सुखरूप बाहेर येईल.”
“चमत्कार वैगरे फक्त सिरियल,सिनेमात होतात.खऱ्या आयुष्यात नाही.बी ब्रेव्ह,भावनेपेक्षा वस्तुस्थितीचा स्वीकार करा.ममा असती तर तिनं हेच सांगितलं असतं.”
“पपा,काहीच वाटत नाही का? किती सहज स्वीकारलं.”
“ जेव्हा आपण काहीही करू शकत नाही तेव्हा समोर येईल ते निमूटपणे स्वीकारणं केव्हाही चांगलं!! आयुष्य म्हणजेच व्यवहार बाकी भावना,प्रेम,आपुलकी, जिव्हाळा हे मनाचे खेळ.रोजच्या आयुष्यात त्याचा काडीमात्र उपयोग नाही उलट त्रासच.ममाला आता जास्त त्रास द्यायला नको.तिला मोकळं करू” दोघीं बहिणींनी एकदमच वडिलांकडं पाहीलं तेव्हा त्यांची नजर शून्यात होती.
“ग्रेट,मानलं पपांना,एवढं मोठा दु:खाचा डोंगर कोसळला पण तरीही मनाचा तोल ढळलेला नाही.”जावई.
“पहिल्यापासून ते असेच आहेत.आनंद असो वा दु:ख ते नेहमीच बॅलन्स असतात.कधीच एक्साईट झालेलं पाहिलं नाही.नेहमीच प्रॅक्टिकल वागणारे.त्यांच्या मनातलं फक्त ममालाच समजायचं पण आता तीच…” धाकटीनं आलेला हुंदका दाबला.
“मी नलूला भेटायला जातोय.कृपा करून कोणाला आत येऊ देऊ नका.आय वॉन्ट टू स्पेंड सम टाइम विथ हर,सो प्लीज…”सावकाश पावलं टाकत कर्नल चालायला लागले.—-
थरथरत्या हातानं काचेचा दरवाजा ढकलून कर्नल आत आले.नर्सला थोड्यावेळासाठी बाहेर जाण्याची विनंती केली.बेडजवळ जाऊन उभे राहिले.गाढ झोपलेली नलिनी डोळे उघडून नेहमीसारखं प्रसन्न हसेल अन बोलायला लागेल अस क्षणभर वाटलं परंतु लगेच वास्तवाची जाणीव झाल्यानं वेदनेची जोरात कळ तळपायापासून मस्तकात गेली.हातपाय लटपटायला लागले.डोळ्यासमोर अंधारी आली.हातातली काठी जमिनीवर घट्ट रोवत तोल सावरला.भावनेचा भर ओसारल्यावर शांत झालेले कर्नल नलिनीच्या हातावर हात ठेवत म्हणाले “नलू,तुला असं बघायची सवय नाही.बास आता,हट्ट सोड,डोळे उघड.आम्हांला सोडून तू जाऊ शकत नाहीस. माझ्यासाठी,पोरींसाठी तुला थांबावं लागेल.आयुष्यभर समजूतदारपणे वागलीस.मग हे आत्ताच असं का वागतेयेस.तुझ्याशिवाय आयुष्य……बाप रे!!.तुला असं पाहून खूप असहाय्य वाटतंय,पूर्ण उद्ध्वस्त झालोय.मुलींना आधार देताना खंबीरपणाचा आव आणतो पण आतल्या आत ……..”इतका वेळ रोखलेला बांध फुटला.डोळे घळाघळा वहायला लागले.घशाला कोरड पडली.कर्नल स्टूलावर बसले.
“37 वर्षापूर्वी आयुष्यात आलीस.फार मोठी पुण्याई म्हणून तुझ्यासारखी जोडीदार मिळाली.माझ्या लहरी,विक्षिप्त वागण्याला कायमच सांभाळलं.खूप तडजोडी केल्या परंतू कधी बोलून दाखवलं नाहीस.सांभाळून घेतलंस.तक्रार न करता निमूट त्रास सहन केलास.सुखाचे दिवस केवळ तुझ्यामुळं पाहतोय.मुली आपआपल्या संसारात सुखी आहेत.मी देखील निवांत झालोय.तू खूप केलंस म्हणूनच आता तुला आनंद द्यायचा होता.नेहमी मी सांगायचं अन तू ऐकायच असं चालत आलं.हे बदलायचं होतं. तुझ्या आवडीच्या गोष्टी करायच्या.सगळा वेळ तुझ्यासाठीच.तू म्हणशील तसं वागून तुला हे सरप्राइज देणार होतो.अजून खूप बोलायचंयं राहिलंय, मन मोकळं करायचंय अन तू तर …….धिस ईज नॉट फेअर.ऐकतेयेस ना.तू चिडवायचीस तसा मी ‘इमोशनलेस माणूस’ नक्कीच नाहीये.स्वभावामुळे कधी बोललो नाही पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. नलू.. तुला माझी शपथ!!हे बघ,तुझ्या आवडीचं चाफ्याचं फूल आणलयं आणि ऐक,तुझं ऑल टाइम फेवरेट गाणं…..”मोबाईलवर रफीसाहेब गायला लागले अभी ना जाओ छोडके……के दिल अभी भरा नही” कर्नलनी सुद्धा भसाड्या आवाजात सुरात सूर मिसळला तेव्हा ट प ट प पडणाऱ्या डोळातल्या थेंबांनी मोबाईल भिजत होता.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈