सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – ४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टूडे)

वनिता

आज हे लेखन करत असताना माझ्या स्मृतीपटलावर अनेक चेहरे रेखान्वित होतात.  काळाच्या प्रवाहाबरोबर ते दूरवर वाहत गेले असतील पण आठवणींच्या किनाऱ्यावर ते पुन्हा पुन्हा हळूच अवतरतात.  पाटीवरची अक्षरं पुसली गेली,पाटी कोरी झाली पण आठवणींचं तसं नसतं धूसर झालेल्या आठवणी मनाच्या पाटीवर मात्र पुन्हा पुन्हा प्रकाशमय होतात.

शाळेजवळ राहणारी शारदा शिर्के आठवते.  तशी दणकटच होती.  तिच्या कपड्यांना मातकट वास यायचा पण ती आम्हा मैत्रिणींना आवडायची. तशी वागायला, बोलायला टणक होती कुणालाही पटकन धुडकावून लावायची. भीती तिला माहीतच नसावी.  अभ्यासात तशी ठीकच होती. गृहपाठ सुद्धा नियमितपणे करायची नाही आणि बाई रागावल्या तरी तिला काही वाटायचं नाही.  पण डबा खायच्या सुट्टीत कधी कधी ती आम्हाला तिच्या घरी घेऊन जायची  तिच्या घराच्या भिंती मातीच्या होत्या जमीन शेणानं सारवलेली असायची.  जमिनीवर कुठे कुठे पोपडे उडलेले असायचे. तिच्या घरातलं एक मात्र आठवतं! फळीवरचे चकचकीत घासलेले पितळेचे डबे आणि चुलीवर  रटरट उकळणारा कसलासा रस्सा आणि तिच्या घरी पत्रावळीवर खाल्लेला, तिच्या आईने प्रेमाने वाढलेला तो गरम-गरम तिखट जाळ रस्सा भात.  फार आवडायचा.  त्या उकळणाऱ्या आमटीचा वास आणि चव अजूनही गेली नाही असं कधी कधी जाणवतं आणि हेही आठवतं की त्या बदल्यात शारदा आमच्याकडून नकळत आमच्या पाटीवरचा गृहपाठ उतरवून घ्यायची. आता आठवण झाली की मनात येतं पुस्तकातलं गणित आपण अचूकपणे शिकलो पण जीवनातले असे give and take चे हिशोब आपल्याला मांडता आले का?  हे तंत्र शारदाला कसं काय लहानपणापासून अवगत होतं?

परिस्थिती…

परिस्थिती शिकवते माणसाला.

बारा नंबर शाळेच्या दगडी पायऱ्यावरून मी नाचत बागडत उड्या मारत पुन्हा माझ्या वर्गात जाते. वर्गाच्या भिंतीवर लावलेली बालकलाकारांची चित्रं, गुळगुळीत रंगीत पेपरच्या बनवलेल्या विविध बोटी… शिडाची बोट, बंब बोट पक्षी, प्राणी, फुले पुन्हा एकदा नजरेत भरून घेते.

या कलाकुसरीत तसा माझा भाग नसायचा.  क्राफ्टचा एक तास म्हणून मी काही केलं असेल तेवढंच पण तेही काही आवर्जून वर्गाच्या भिंतीवर लावावं असं नव्हतं पण एक आठवण आहे. निबंधाचा तास होता आणि कुलकर्णी बाईंनी सांगितलं,” आपल्या आजी विषयी पाच ओळी लिहा.”

 त्यावेळी मी पाटीवर लिहिलेली एक ओळ आठवते. 

“ कधीकधी आई खूप रागावते पण आजी मला कुशीत घेते. तिच्या लुगड्याचा वास मला खूप आवडतो.”

बहुतेक सगळ्यांनी आजीचं नाव, आजीचा वर्ण, उंच की बुटकी वगैरे लिहिलं होतं पण मी लिहिलेलं कुलकर्णी बाईंना तेव्हा खूपच आवडलं असावं आणि त्यांनी ते सर्वांना वाचूनही दाखवलं. त्याचवेळी  वनिता नावाची माझी एक मैत्रीण होती, तिने तिच्या पाटीवर फक्त एवढंच लिहिलं होतं, “माझ्यावर प्रेम करणारी आजीच मला नाही. देवा! माझे लाड करणारी आजी मला देशील का?”

सुखदुःख, मनोभावना कळण्याचं ते वय नव्हतं.  आपल्यापेक्षा कुणाकडे काहीतरी कमी किंवा काहीतरी जास्त आहे हेही कळण्याचं वय नव्हतं.  कदाचित मनाला जाणवत असेल पण ते शब्दांतून किंवा वाचेतून व्यक्त करायची क्षमता नसेल पण ज्या अर्थी आज इतक्या वर्षानंतरही वनिताने तिच्या पाटीवर लिहिलेले वाक्य मला आठवतंय त्याअर्थी मी त्यावेळी नक्कीच वनिताशी वेगळ्या प्रकारे कनेक्ट झालेच असणार.

वनिता खूप हुशार होती. तिचा नेहमी पहिला नंबर यायचा.  ती कविता, पाढे अगदी घडघड म्हणायची. पटपट गणितं सोडवायची.  खरं म्हणजे ती माझ्याच वर्गात आणि माझ्याच वयाची होती पण अंगापिंडाने थोडीशी रुंद असल्यामुळे मोठी भासायची.  ती परकर पोलका घालायची कधी कधी तिच्या पोलक्यावरच्या  ठिगळातले धागे सुटलेले असायचे.  रोजच ती  धावत पळत शाळेत यायची आणि शाळा सुटल्यावर पळत पळत घरी जायची. आमच्यासारखी  ती मैत्रिणींच्या घोळक्यात रेंगाळत कधीच राहिली नाही. खूप वेळा तिचे डोळे सुजलेले असायचे, चेहरा रडका असायचाा, तिच्या गालांवर मारल्यासारख्या लालसर खुणा  असायच्या, तिच्या हातावर भाजल्याच्या खुणा असायच्या,त्र तिची पाटी फुटकी असायची, पेन्सिलीच बुटुक असायचं पण तरीही ती इतकं नीटनेटकं सुवाच्च्य,सुंदर अक्षर काढायची!

शाळेच्या बाकावर मी नेहमी तिच्या शेजारीच बसायचे.  का कोण जाणे पण मला तिचा इतर मैत्रिणींपेक्षा जास्त आधार  वाटायचा. ती कुणाशीच भांडायची नाही. पण तरीही  मला ती अशी भक्कम वाटायची, फायटर वाटायची. मला असंही  वाटायचं आपल्यापेक्षा वनिताला खूप जास्त कळतं. जास्त येतं.  तिला स्वयंपाक करता यायचा, पाणी भरता यायचं, घरातला केरवारा करता  यायचा,  तिने आणलेली डब्यातली पोळी भाजीही तिनेच बनवलेली असायची.  तेव्हा मनात दोनच प्रश्न असायचे इतकं सगळं हिला कसं जमतं? आणि तिला हे का करावं लागतं? मला याचे उत्तर तेव्हा कळलं जेव्हा रत्नाने मला सांगितलं,

“वनिताला किनई  सावत्र आई आहे. ती तिला खूप छळते, मारते,  तिच्याकडून घरातली सारी कामं करून घेते.  तिला किनई एक सावत्र भाऊ आहे तो लहान आहे आणि त्यालाही तीच सांभाळते. बिच्चारी..” त्यादिवशी वनिता म्हणजे माझ्या मनात कोण म्हणून अवतरली हे सांगता येत नाही. पण मला ती हिमगौरी भासली. सिंड्रेला वाटली. माझं बालमन तेव्हा अक्षरशः कळवळलं होतं. मात्र  घरी आल्यावर मी माझ्या आजीला म्हटलं, “माझ्याबरोबर काबाड आळीत चल.” काबाड आळी आमच्या घरापासून जवळच होती. आजीने,” कशाला?” विचारल्यावर मी तिला म्हणाले होते, “काबाड आळीत वनिता राहते. तिची सावत्र आई तिला खूप छळते. तू तिला चांगला दम दे!”

 हे काम समर्थपणे फक्त माझी आजीच करू शकते याची किती खात्री होती मला!

त्या वेळी शाळेच्या दर्शनी भिंतीवर साने गुरुजींची वक्तव्ये लिहिलेली होती. 

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी 

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

त्या बालवयात असं काही ऐकलं, पाहिलं, अनुभवलं आणि सहजपणे त्याचा संदर्भ जेव्हा या ओळींशी लागला त्यामुळेच असेल पण ते भिंतीवरचं अनमोल अक्षर वाङमय मनात मोरंब्यासारखं मुरलं.

चौथीनंतर प्राथमिक शिक्षण संपलं आणि हायस्कूलचं जीवन सुरू झालं. कोणी कुठल्या कोणी कुठल्या शाळेत प्रवेश घेतला.

ठाण्याला तेव्हा थोड्याच प्रमुख शाळा होत्या. त्यातली एक मो.ह. विद्यालय आणि दुसरी  सरकारी ..गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल. माझं नाव गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलमध्ये घातलं. काही  मैत्रिणी पुन्हा याच शाळेत एकत्र आलो तर बऱ्याच जणी एकमेकींपासून पांगल्या.  दूर गेल्या.

चौथीनंतर वनिता कुठे गेली ते कधीच कळलं नाही. मी तिचा पत्ता काढू शकत नव्हते का? काबाड आळीत जाऊन तिचं घर शोधू शकत नव्हते का?  चौथीची स्कॉलरशिप मिळवणारी बारा नंबर शाळेतली ती एकमेव विद्यार्थिनी होती. तिनं पुढचं शिक्षण घेतलं की नाही? 

वनिताच्या आठवणीने कधी कधी अंगावर सरसरून काटा उभा राहतो. कदाचित तिच्या सावत्र आईने कुणा थोराड माणसाशी तिचं लग्नही लावलं असेल. तिच्या आयुष्याची परवडच झाली असेल. दुःखद, कष्टप्रद आयुष्य जगतानाच तिचा शेवटही झाला असेल.  कालप्रवाहात ती वाहून गेली असेल पण त्याचवेळी तिच्याविषयी दुसरं ही एक चित्र मनात उभं राहतं.

वनिता धडाडीची होती.  ती एक सैनिक होती, योद्धा होती.  तिच्यात एक उपजत शौर्य होतं, सामर्थ्य होतं.  तिने कुठे तिचं रडगाणं आपल्याला कधी सांगितलं होतं? उलट शाळेच्या मधल्या सुट्टीत ती सर्वांचे हात हातात घालून रिंगण करायची आणि मोठ्याने गाणी म्हणायला लावायची.

कधी “उठा उठा चिउताई सारीकडे उजाडले..”

तर कधी..

 “शाळा सुटता धावत सुटले

 ठेच लागुनी मी धडपडले

 आई मजला नंतर कळले

 नवी कोरी पाटी फुटली

आई मला भूक लागली..”

कुणी सांगावं अशा या वनिताने एखाद्या जिल्ह्याचे  कलेक्टर पद अभिमानाने भूषविले असेल.  ज्या ज्या वेळी सिंधुताई सपकाळ  सारख्या सक्षम स्त्रियांचा उल्लेख होतो त्या त्या वेळी त्यांच्या ठिकाणी मला हरवलेली माझी बालमैत्रीण  वनिता दिसते.  

आज मागे वळून पाहताना वाटतं बालपणीचा काळ सुखाचा किंवा रम्य ते बालपण असं म्हणताना आणि त्यातली वास्तविकता पडताळताना मला हमखास गोबऱ्या गालाच्या, सुजर्‍या  डोळ्यांच्या,  कोरड्या न विंचरलेल्या केसांच्या, फुटक्या पाटीवर सुरेख अक्षर काढणाऱ्या, मधुर गाणी गाणाऱ्या लहान  पण प्रौढत्व आलेल्या वनिताची आठवण येते. वाटतं कुठेतरी माझ्या जडणघडणीत तिचा अंशतः वाटा आहे. त्या संस्कारक्षम वयात तिने एक विचारांचा अमृत थेंब नकळत माझ्या प्रवाहात टाकला होता.

HARDSHIP DOES NOT KILL US, MAKES STRONGER!

HARD TIMES IN THE PAST MOTIVATE OUR PRESENT.

 – क्रमशः … 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments